computer

११८७ अंश सेल्सियस तापमान असलेल्या लाव्हा रसावरून तिने प्रवास कसा केला?

अनेकजणांना साहसी खेळ करायला आवडतात. मग कोणी उंच शिखर चढतं, कोणी हेलीकॉप्टर मधून उडी मारते तर कोणी थंड बर्फावर तासनतास झोपते. परंतु कोणाला लाव्हा रसावरुन प्रवास करताना पाहिले आहे का? विचार करा जिवंत ज्वालामुखीच्या अतिशय उष्ण लाव्हावरून कोणी माणूस जात आहे. तुम्ही म्हणाल तो माणूस जिवंत तरी राहील काय? पण एका धाडसी महिलेने हेच धाडस करून दाखवले आहे आणि त्यासाठी तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही समाविष्ट झाले आहे. पाहुयात कोण आहे ही महिला?

त्या महिलेचं नाव आहे करीना ओलियानी. ती ब्राझिलची वन्यजीव डॉक्टर आहे. तिने करून दाखवलेला हा प्रवास आजवरचा सर्वात लांब म्हणजे १००.५८ मीटर अंतर होता. याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. करिनाने इथिओपियातील अफार वाळवंटातील एर्टा अले (Erta Ale) नावाच्या ज्वालामुखीच्या लाव्हा रसावरुन प्रवास केला. ह्या लाव्हारसाचं तापमान तब्बल ११८७ अंश सेल्सिअस एवढे होते. लाव्हाच्या तप्त ज्वाळापासून वाचण्यासाठी तिने विशेष उष्णता सूट (heat suit) घातला होता. ह्या प्रवासाला टायरोलॅन ट्रॅव्हर्स  (Tyrolean Traverse) म्हणतात. म्हणजे दोन उंचावरच्या ठिकाणांना दोरीच्या सहाय्याने पार करणे.

महिलादिनानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने एक ट्विट शेअर केले होते, “करिना ओलियानी पृथ्वीच्या सर्वात उष्ण लाव्हा तलावावरून टायरोलॅन ट्रॅव्हर्स करणारी धाडसी महिला! हे महिलादिनी सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे. ”

 

करीना ओलियानीबद्दल सांगायचं झालं तर वयाच्या १२ व्या वर्षी तिने तिचा प्रथम स्कूबा डायव्हिंग क्लास घेतला होता आणि त्याचे प्रमाणपत्र मिळविले होते. तिच्याकडे पायलटिंग (विमान चालवायचे) लायसन्स देखील आहे.

लाव्हा रासावरून टायरोलॅन ट्रॅव्ह करण्यापूर्वी तिने 'के २' शिखरावर चढाई केली होती. असं करणारी ती ब्राझीलची पहिली महिला आहे. कमी झालेले किंवा धोक्यात असलेले वन्यजीव वाचविण्यासाठीही ती खूप काम करते. अ‍ॅनाकोंडासह समुद्रामध्ये बुडी मारण्यापासून ते विमानात विंग वॉक पर्यंत साहस दाखवून ती ब्राझीलमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. साहसी खेळांमध्ये तिचा कोणीही हात धरू शकत नाही. या नव्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमुळे तिचे नाव जगभर झाले आहे. 

आपले मनोगत व्यक्त करताना करीना म्हणते, "मी खूप लहान असल्यापासून मला नेहमीच निसर्ग आणि धाडसी खेळ खेळायला आवडायचे. मी दोन वेळा एव्हरेस्ट चढण्यासह समुद्र, पर्वत, जंगल आणि वाळवंटात असंख्य मोहिमेमध्ये भाग घेतला आहे.  याहून मोठे आव्हान शोधताना पृथ्वीवरील सर्वात मोठ्या लाव्हा तलावावरुन जाण्याचे  मोठे आव्हान मी स्विकारले आणि यशस्वी करून दाखवले.” 

खतरों की खिलाडी करीना ओलियानी ही आज सर्वांसाठी प्रेरणा ठरली आहे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

 

आणखी वाचा :

कॅमेरा लाव्हारसात बुडूनही सुखरूप वाचला..काय काय रेकॉर्ड झालंय पाहा.

सबस्क्राईब करा

* indicates required