डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे: अमरावतीचा पठ्ठ्या ठरलाय स्कॉटलंडच्या राजकारणात प्रवेश करणारा पहिला भारतीय !!
जगभरात अनेक देशांत भारतीय वंशाचे लोक राजकारणात मोठ्या पदांवर काम करत आहेत. अमेरिकेच्या संसदेत बरेच भारतीय वंशाचे नेते आहेत. मोठमोठ्या जबाबदाऱ्या ते मोठ्या हुशारीने पेलताना दिसतात. कॅनडाच्या तर सर्वच क्षेत्रांत आपल्या पंजाबचा मोठाच दबदबा आहे. एवढंच नाही तर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी आपल्या कोकणचे 'लिओ वरडकर' विराजमान होते. याचप्रकारे आणखी एका देशात भारतीय माणसाने तिथल्या राजकारणात प्रवेश करून एक इतिहास रचलाय. हा देश म्हणजे स्कॉटलंड.
स्कॉटिश संसदेत नुकत्याच आपल्या अमरावतीच्या डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत. डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांच्या यशाने महाराष्ट्रासह अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. संदेश हे मूळचे अमरावती शहरातले. भाजी बाजार या परिसरात त्यांचे घर आहे. प्रकाश आणि पुष्पा गुल्हाणे हे त्यांच्या आईवडिलांचे नाव. त्यांचे वडील प्रकाश लंडनमध्ये एका खाजगी कंपनीत अभियंता होते. लंडनमध्येच डॉ. संदेश यांचा जन्म झाला. ते २०११ साली लंडनहून स्कॉटलंडला स्थायिक झाले. सात वर्षे त्यांनी ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून काम केले. ते ग्लासगो येथे जनरल प्रॅक्टिशनर आहेत. त्यांनी कोव्हीड काळातही फ्रंट लाईनवर काम केले होते. ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या जनरल प्रॅक्टिशनर ट्रेनी कमिटीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. वैद्यकीय सेवेसोबतच त्यांना स्पोर्ट मेडिसिन या विषयात खूप आवड आहे. ते सध्या स्कॉटलंडच्या क्विन्स पार्क फुटबॉल क्लबचे मेडिसिन आणि सायन्स प्रमुखही आहेत.
डॉ. संदेश यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला. २०२१ मध्ये त्यांना स्कॉटलंडच्या संसद निवडणुकीत ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह आणि युनियनिस्ट पार्टीकडून ते खासदार म्हणून उभे राहिले आणि जिंकलेही. नुकतेच त्यांनी स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथही घेतली. स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार ठरले आहेत. वयाच्या ३९व्या वर्षी त्यांनी हे साध्य केले आहे.
संपूर्ण अमरावतीसह महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. डॉ. संदेश यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
लेखिका: शीतल दरंदळे




