computer

महागाईला तोंड देण्याची तयारी ठेवा !! शेवटी युक्रेनवर रशियाने लष्करी हल्ला केलाच !

रशियाने आज युक्रेनवर हल्ला सुरु करून,युध्दाचा आरंभ केला आहे. या लढाईची बातमी जगाला देताना व्लादिमिर पुतीन काही चलाखीचे शब्द वापरले आहेत.त्यांच्याच शब्दात सांगायचे तर त्यांनी युक्रेनवर 'लष्करी कारवाई' करण्याची सुरुवात केली आहे ? सोबतच होणार्‍या रक्तपाताची जबाबदारी युक्रेनचीच असेल असे सांगून पुतिन यांनी 'रक्तपात होणारच' अशी खात्री दिली आहे. आमच्या राड्यात येऊ नका नाहीतर तुम्हाला पण ..... अशी गर्भित धमकी त्यांनी NATOच्या सहभागी राष्ट्रांना दिली आहे.त्यात अमेरिका आलीच! थोडक्यात व्लादिमिर पुतिन यांनी आक्रमणाची एकतर्फी सुरुवात केली आहे. पण हा सगळा राडा करण्याचे कारण तरी काय आहे ते समजून घेऊ या !
 

हे युध्द सुरु होणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरजच नव्हती.गेली अनेक वर्षे युक्रेनने अमेरिकेच्या प्रभावाखाली जाऊ नये यासाठी रशिया खटपट करतच होती.तुलनात्मक दृष्टीने युक्रेन रशियासमोर फारच छोटा देश आहे.युध्द झालेच तर नुकसान युक्रेनचेच होणार आहे.असे असूनही युक्रेन रशियाच्या मर्जीने वागत नाही याचे कारण काय असेल ?  त्याचे कारण असे आहे की रशियन सरकारवर अविश्वास आहे. या अविश्वासाची  कारणेही तशी ऐतिहासिक आहेत.

बोभाटाचा युक्रेनच्या दुष्काळावरचा लेख तुम्ही वाचलाच असेल तर ते स्पष्ट होईलच.


 बरं, युक्रेन इतका छोटा देश असेल तर रशिया तरी या देशाला का महत्व देते आहे ? या मागे व्लादिमिर पुतिनच्या यांचे दिर्घ पल्ल्याचे धोरण आहे.' एनर्जी मार्केट' म्हणजे जागतिक उर्जा क्षेत्र गेल्या काही वर्षात पुतिन यांनी काबिज केले आहे.मध्यपूर्वेतील उर्जा व्यापार सतत चाललेल्या लढायांमुळे आणि तेलसाठे संपत आल्याने दुय्यम स्थानावर फेकला जाणार आहे.अणुऊर्जेचा विचार केला तर सैबेरियातील युरेनियमच्या साठ्यामुळे वर्चस्व रशियाचेच राहणार आहे. 'ज्याची एनर्जी त्याचीच मर्जी'जगात चालणार आहे. तो

युरोपियन देशांची समस्या वेगळीच आहे. त्यांचं प्रेम अमेरिकेवर आहे पण त्यांना लागणारी उर्जा रशियाकडून स्वस्त मिळते आहे.

ही उर्जा त्यांना युक्रेनच्या मार्गे मिळते. रशियातून बाहेर जाणारा गॅस युक्रेनच्या हद्दीतल्या पाईपलाईन मधून जातो. थोड्क्यात युक्रेन रशिया आणि इतर युरोपिय देशांच्यामधला 'जंक्शन बॉक्स' आहे.अनेक वर्षं  रशियाकडून पाईपलाईनचे भरभक्कम भाडे आणि इतर अनेक सवलती मिळवून युक्रेनची गाडी मस्त चालली होती. पण काही वर्षांपूर्वी त्यांना अवदसा आठवली , त्यांनी रशियन पाइपलाइनमधून चोर्‍या करायला सुरुवात केली.या चोर्‍यातून मिळणारी उर्जा 'ब्लॅक मार्केट'च्या माध्यमातून ऑइल माफीयाला विकायला सुरुवात झाली.  त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध हळूहळु बिघडत गेले.
 यादरम्यान युक्रेममधील असंतुष्ट गटाना रशियाने पाठींबा द्यायला सुरुवात केली आणि आता त्यांना स्वतंत्र अस्तित्व असल्याचे मान्य करून युक्रेनच्या आत दुफळी माजवली आहे.

खरे सांगायचे झाले तर युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांची अवस्था तुझे माझे जमेना -तुझ्यावाचून करमेना अशी आहे. पण या देशांच्या बखेड्याची जगातल्या अनेक देशांना झळ पोहचणार आहे.कच्चे तेल महागणार आहे. युरोपातील बंदरांचा व्यवसाय ठप्प पडणार आहे, सोने आणि इतर धातू महागणार आहेत. आंतराराष्ट्रीय चलन बाजार वरखाली होत राहणार आहे.

आज रात्रीपर्यंत या लढाईची खरी दिशा आपल्याला कळेलच पण येत्या काही दिवसात वाढणार्‍या महागाईला तोंड देण्याची तयारी ठेवा इतकेच आम्ही आता सांगू शक

सबस्क्राईब करा

* indicates required