computer

सगळ्यांना वाटलं,या बाई काही टिकत नाहीत.पण जागातिक राजकारणात या १६ वर्षे सगळ्यांना पुरुन उरल्या. जर्मनीच्या राष्ट्र्प्रमुख अँजेला मर्कल यांची कारकीर्द तर जाणून घ्या.

"ती आली, तिने पाहिले, आणि तिने जिंकले'' हे वर्णन जर्मनीच्या चॅन्सेलर म्हणजे राष्ट्रप्रमुख अँजेला मर्कल यांना अचूक लागू होते. जगाच्या राजकारणाच्या पटलावर त्यांना सुरुवातीला क्षमता असूनही कमी लेखले गेले. मात्र नवखी, अननुभवी म्हणून एकेकाळी सर्वांनी हिणवलेल्या याच अंजेला मर्कल यांनी सलग सोळा वर्षे सत्तेत राहून आपल्या क्षमतेने भल्याभल्यांना चकित केले आहे. या सोळा वर्षांत उर्वरित जगात अनेक देशांत सत्ताबदल झले. युकेचे पाच पंतप्रधान, फ्रान्सचे चार राष्ट्राध्यक्ष आणि इटलीचे सात पंतप्रधान या काळात होऊन गेले. पण इतकी वर्षे मर्कलबाई या सगळ्यांना पुरून उरल्या आहेत.

जगात चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीचे चॅन्सेलरपद स्वीकारल्यानंतर अँजेला मर्कल यांचा बराच वेळ स्वतःला सिद्ध करण्यातच गेला. स्वतःच्या देशातून असलेला विरोध आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मानहानीचे प्रसंग त्यांना सहन करावे लागले. त्यांना कुत्र्याची भीती वाटते ही गोष्ट माहिती असूनही रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन एकदा त्यांना भेटायला येताना मुद्दाम आपल्या लॅब्रॅडॉर कुत्र्याला घेऊन आले होते.

इटलीचे पंतप्रधान सिल्व्हियो बेर्लुस्कोनी यांनीही एकदा त्यांना पंधरा मिनिटे तिष्ठत ठेवले होते. त्यावेळी ते चक्क फोनवर गप्पा मारत बसले होते! याचे कारण म्हणजे २००५ मध्ये त्यांनी पद स्वीकारले तेव्हा अनेकांना मर्कल यांच्यामध्ये काही दम नाही असेच वाटले होते. त्यांची नेमणूक तात्पुरती आहे असाच सगळ्यांचा समज होता. त्यांच्या पक्षातील अनेक सहकारी भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकल्याने नेतेपदाची माळ आपोआप त्यांच्या गळ्यात येऊन पडली होती. एकदा का चौकशीचा ससेमिरा संपला, की सत्ता योग्य व्यक्तीकडे जाणार असा अंदाज होता. ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षात वर चढत गेलेल्या मर्कल यांच्याकडे फक्त एक 'रिप्लेसमेंट' म्हणून पाहिले जात होते. मात्र झाले उलटेच. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल सोळा वर्षे मर्कल यांच्याकडे जर्मनीची सत्ता कायम राहिली. त्या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे आजही जर्मनीने युरोपातल्या अनेक देशांना मागे टाकत विविध क्षेत्रांमध्ये आपली घोडदौड कायम ठेवली आहे.

त्यांनी घेतलेला असाच एक गाजलेला निर्णय म्हणजे निर्वासितांना आपल्या देशात आश्रय देणे. जगात सर्वत्र निर्वासितांकडे दूषित नजरेनेच पाहिले जाते. जणू त्यांचा आपल्याला काही उपयोग नसतो. परंतु मर्कल यांनी हा प्रश्न वेगळ्या प्रकारे हाताळून संवेदनशीलता, व्यवहारचातुर्य, आणि मुत्सद्दीपणा यांचे दर्शन घडवले. सीरियामधल्या राजकीय परिस्थितीला आणि सततच्या युद्धांना कंटाळून तेथील हजारो नागरिकांनी इतर देशांमध्ये आसरा मागितला. त्यावेळी अनेकांनी त्यांना थारा देण्याचे नाकारले. अंजेला मर्कल यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी या स्थलांतरित निर्वासितांना आपल्या देशात आश्रय तर दिलाच, पण त्यांच्या पुनर्वसनाची आणि रोजगाराचीही सोय केली. यापुढे जाऊन युद्धे, लढाया यांना कंटाळून आपला देश सोडून येणाऱ्या सर्वांचे जर्मनीत स्वागत आहे असेही म्हटले. जर्मनी हा कणखर देश आहे आणि सर्व आव्हानांचा सामना आपण करू शकतो असा त्यांच्या ठायी रास्त आत्मविश्वास आहे. प्रश्न निर्माण झाल्यावर हातपाय न गाळता त्यावर उत्तर शोधण्याची, त्याचा दुसऱ्या बाजूने विचार करण्याची त्यांची पद्धत आहे. अँजेला मर्कल यांना फिजिकल केमिस्ट्री विषयात डॉक्टरेट मिळाली आहे. असा मूळचा पिंड संशोधकाचा असल्याने उत्तरे शोधतानाही ती तर्कसंगत असण्यावर त्यांनी भर दिला. म्हणूनच त्यांनी या निर्वासितांच्या प्रश्नावर वेगळ्या दृष्टीकोनातून विचार केला. त्यापूर्वी इतर युरोपीय देशांप्रमाणे जर्मनीलादेखील एक संकट भेडसावत होते, ते म्हणजे काम करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता, आणि निवृत्त लोकांचे वाढते प्रमाण. अंजेला यांनी निर्वासितांचा चातुर्याने उपयोग करून घेतल्यामुळे देशाला मनुष्यबळ उपलब्ध झाले, अनेकांना रोजगारही मिळाले आणि त्याचा थेट फायदा जर्मनीची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी झाला. जोडीला आलेल्या निर्वासितांपैकी २०% लोकांसाठी त्यांनी सशुल्क अभ्यासक्रम आणि इंटर्नशिप्स यांसारखे उपक्रम राबवले. त्यातूनही आर्थिक विकासाला चालना मिळाली.

अँजेला मर्कल यांनी त्यांच्या कार्यकाळात चीनबरोबर संबंध प्रस्थापित केले. आज अख्ख्या जगाचा चीनवर राग असला तरी रोजच्या वापरातल्या अनेक वस्तूंसाठी सगळे जग प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या चीनवरच अवलंबून आहे, हे सत्य नाकारता येत नाही. परफेक्शनसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला जर्मनी हा चीनचा व्यापारातील महत्त्वाचा साथीदार आहे. चीनबरोबर हात मिळवल्याने जर्मनीला एक प्रकारे संपूर्ण जगाची बाजारपेठ खुली होऊ शकते, आणि त्यासाठी कारणीभूत आहे या मर्कलबाईंची दूरदृष्टी. कोविड महामारीच्या काळातही त्यांनी कठोर निर्णय घेऊन ते अमलात आणले. मुळात त्या शास्त्रज्ञ असल्याने त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच महामारीच्या संकटाकडे पाहिले. गरज पडली तेव्हा प्रसंगी लोकांचा विरोध पत्करून कठोर टाळेबंदी लागू केली.
 

अँजेला मर्कल यांनी हाताळलेला अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे युरोपियन डेट(Debt) क्रायसिस. काय होते हे संकट?

ग्रीस या देशाने युरोपीय समूहाचे सदस्यत्व मिळविण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे भासवण्यासाठी कोणतीही पत नसताना गोल्डमन सॅच या वित्तीय संस्थेच्या मदतीने आंतरराष्ट्रीय कर्ज मिळवले, पण ते फेडण्यात त्याला अपयश आले. ग्रीसने दाखवलेल्या उत्पन्नाच्या स्रोतातून फारसे उत्पन्न होत नसल्याचे लक्षात आले. असाच पेचप्रसंग स्पेन, पोर्तुगाल, इटली यांच्या बाबतीतही निर्माण झाला. त्यातून युरोप आर्थिक संकटात सापडला. यावेळी युरोपमधील बलाढ्य देशाच्या प्रमुख म्हणून अँजेला मर्कल यांनी कठोर प्रशासकाची भूमिका घेतली. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. आर्थिक शिस्त, सरकारी खर्चात कपात, करवाढ असे उपाय सुचवले. ग्रीसला कर्जमाफी देण्यासही तीव्र विरोध दर्शवला. पुढे कठोर आर्थिक उपायांचा अवलंब केल्याने ग्रीस दिवाळखोर होण्यापासून वाचू शकला.

जर्मनीचे सर्वाधिक स्थिर नेतृत्व म्हणून लौकिक मिळवलेल्या अँजेला मर्कल आता पायउतार होत आहेत. पण तेही दिमाखात. त्यांनी जे काही करून दाखवले ते जर्मनीच्या इतिहासाच्या पानांवर कायम कोरले जाईल असे आहे. त्यामुळे त्या सत्तेवर नसल्या तरी लोकांच्या स्मरणात कायम असणार हे नक्की.

गेल्या वीसएक वर्षांत अनेक साध्यासाध्या गोष्टी करण्यातला आनंद त्या उपभोगू शकलेल्या नाहीत. त्या गोष्टी करणे आणि उर्वरित आयुष्य सुखासमाधानात घालवणे हे त्यांचे स्वप्न आहे. तूर्तास त्यांच्या बकेट लिस्टमध्ये प्लम केक आणि पोटॅटो सूप हे आवडीचे पदार्थ तयार करणे टॉप प्रायॉरिटीला आहे.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required