computer

अल्पकालीन कर्णधारपद भूषवलेले पण उत्कृष्ट विजयी कामगिरी केली असे सहा कर्णधार!!

भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. क्रिकेटमध्ये मिळालेली हार असो वा जीत, चाहत्यांसाठी खूप महत्वाची ठरते. त्यावरून खूप चर्चा होते. क्रिकेटमध्ये कर्णधार हे पद खूप मानाचे! खेळाडूसाठी कर्णधार म्हणून देशाचे नेतृत्त्व करणे अभिमानास्पद असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा खेळ नेहमीच अव्वल राहिला आहे. भारत हा एकमेव देश आहे ज्याने 20-षटके, 50-षटके आणि 60-षटकांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. आजवर काही महान कर्णधारांनी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. काही खेळाडूंनी कर्णधार म्हणून नेतृत्व करताना यशाचे झेंडे रोवले, तर काही दिग्गज खेळाडूंना कर्णधारपद तितकेसे मानवले नाही. आज आपण असे कर्णधार पाहूयात ज्यांनी अगदी थोडा काळ कर्णधारपद भूषवले पण त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ कधीही एका विशिष्ट फॉरमॅटमध्ये सामना हरलेला नाही.

गौतम गंभीर (एकदिवसीय सामने)

भारतीय क्रिकेट संघ गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय सामन्यात कधीही हरला नाही. डावखुरा आक्रमक फलंदाज असलेल्या गंभीरने फलंदाजीत आपली छाप सोडली आहे. २०११ च्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध गौतम गंभीरने भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. तो एक उत्कृष्ट कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएल चॅम्पियनशिप जिंकली होती. भारताकडून खेळताना त्याला सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. २०१० साली गंभीरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडचा ५-० असा पराभव केला. डिसेंबर २०११ मध्ये गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ३४ धावांनी पराभव केला.
 

रवी शास्त्री (कसोटी)

रवी शास्त्री सध्या भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. जेव्हा रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघात खेळत होते तेव्हा ते अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते. त्यांनी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कारकिर्द गाजवली. त्यांना एका कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून संधी मिळाली आणि त्या सामन्यात भारताने त्या काळी बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजचा २५५ धावांनी पराभव केला. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर हा सामना रंगला होता. रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाचे तेव्हा कौतुक झाले.
 

अजिंक्य राहाणे (कसोटी किंवा एकदिवसीय)

भारतीय क्रिकेट संघाला अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वाखाली कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यात अद्याप एकही पराभव पत्करावा लागला नाही. अजिंक्य राहाणे सध्याचा भारतीय कसोटी उपकर्णधार आहे. त्याच्या संयमी खेळाने तो चाहत्यांचे मन जिंकतो. फिल्डिंगमध्ये ही तो उत्कृष्ट आहे. विशेष म्हणजे राहाणेचा कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून नाबाद रेकॉर्ड आहे. कसोटीत त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पाच सामन्यांत चार विजय आणि एक बरोबरी नोंदवली आहे. वनडे फॉरमॅटमध्ये राहाणेच्या नेतृत्वाखाली खेळलेले तीनही सामने भारताने जिंकले आहेत.
 

वीरेंद्र सेहवाग (टी -20)

भारताचा आक्रमक फलंदाज म्हणून वीरेंद्र सेहवाग हे नाव खूप वरती असेल. फलंदाज म्हणून त्याने केलेले अनेक रेकॉर्डस् आजही मोडले गेले नाहीत. सेहवागने खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. टी -20 फॉरमॅटमध्ये तो अपराजित कर्णधार आहे. सेहवागने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाविरुद्धच्या पहिल्या टी -20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आणि तो सामना जिंकला.

अनिल कुंबळे (वनडे)

मोठ-मोठ्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या चेंडूंनी गुडघे टेकण्यास भाग पडणारा अनिल कुंबळे हा भारताचा सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता. तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. धोनीच्या आधी अनिल कुंबळे एकेकाळी कसोटीत भारताचा कर्णधार होता हे अनेक चाहत्यांना आठवत असेल. पण कदाचित हे माहित नसेल की २००२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान कुंबळेने वनडेचे नेतृत्व केले होते. चेन्नईने मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना आयोजित केला. कुंबळेच्या नेतृत्वाखाली खेळताना भारत चार गडी राखून विजयी झाला. ती ६ सामन्यांची मालिका ३-३ अशी बरोबरीत संपली.

सुरेश रैना (टी-20)

सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ कधीही टी -20 सामना हरला नाही. सुरेश रैनाने तीन टी -20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यापैकी दोन २०१० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध आणि शेवटचा सामना २०११ मध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध होता. तीनही सामन्यांमध्ये भारत विजयी झाला. यात रैनाने केलेल्या सुरेख खेळीमुळे दुसऱ्या टी -20 मध्ये तो सामनावीरही होता. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध जबरदस्त धावा करून झिम्बाब्वे गोलंदाजांना जेरीस आणले होते.

आता लवकरच T20 वर्ल्ड कपची टीम निवडली जाणार आहे. विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे. पण मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अजूनही कोहलीला पूर्ण करता आले नाही. कर्णधार म्हणून T20 वर्ल्डकप एक मोठे आव्हान असणार आहे. तुमचे काय मत आहे?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required