computer

परदेशी पाहुण्यांच्या शिष्टाचारातल्या गंमतीजंमती.. हिना रब्बानी ते बोरित्स येल्त्सीन.. वाचा एकाहून एक अफलातून किस्से..

विदेशी पाहुण्यांची सरबराई आणि पाहुणचार हा एक गहन विषय आहे. पावलोपावली राजकीय शिष्टाचार मोडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. विदेशी राष्ट्रप्रमुख आपल्याकडे आल्यापासून रवाना होईपर्यंत  विदेश मंत्रालयाचा मुख्य शिष्टाचार अधिकारी आणि उपमुख्य शिष्टाचार अधिकारी यांच्या डोक्यावर दिवसरात्र टांगती तलवार असते. यात जरा कुठे माशी शिंकली की संपलंच सगळं!   

सध्या आज जपानचे राष्ट्रप्रमुख भारत भेटीला आले आहेत. या दौऱ्याच्या गमतीजमती एखाद-दोन दिवसात पेपरात येतीलच. तरी सध्या मोदी, आणि आबे दांपत्याचा पहले आप, पहले आप करण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर फिरतोय..   तोपर्यंत आपण आधी घडलेले किस्से बघू या!

"I request prime minister to step down!!"

आता कितीही काळजी घेतली तरी काही तरी गडबडी होतातच! काहीवेळा त्या सुखद असतात, तर काही वेळा अडचणीत टाकतात. काही वर्षांपूर्वी फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा भारत भेटीस आले तेव्हा त्यांनी एक शीख अधिकारी सोबत असावा असा आग्रह केला होता. त्यांच्या पहिल्या भेटीत हेच अधिकारी त्यांच्या सोबत होते आणि त्यांच्यावर ते फारच खूश होते. परत जाताना त्यांचे तोंडभरून कौतुक करायलाही ते विसरले नाहीत.

शेख हसीना, बांगला देशाच्या अध्यक्षा भारत भेटीवर असताना एक विनोदी किस्सा घडला. शेख मुजीबूर रहमान यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा सोहळा होता. या प्रसंगी प्रोटोकॉल ऑफिसरने  पंतप्रधानांना मंचावरून खाली उतरण्याची  विनंती करताना असं म्हटलं की, "I request prime minister to step down "  (म्हणजेच  "पंतप्रधानांनी आपले पद सोडावे.")  आणि प्रचंड हशा झाला. 

२०१३ चा दौरा..

ब्रिटनचे युवराज चार्ल्स जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांच्यासोबत कॅमिला पार्कर पण आल्या होत्या. पण त्या प्रिन्सेस म्हणून न येता डचेस ऑफ कॉर्निवॉल म्हणून आल्या होत्या.  भारतीय शिष्टाचाराच्या नियमांप्रमाणे फ़क्त पत्नीला राजशिष्टाचाराचा  मान मिळतो. कॅमिला पार्कर ही युवराज चार्ल्स यांची धर्मपत्नी नसल्याने त्यांना सर्वसामान्य पाहुण्याचा दर्जा आणि मान मिळाला.  ब्रिटनमध्ये या बातमीने बरीच खळबळ माजली होती.

आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात दरवर्षी एका परदेशी राष्ट्रप्रमुखाला आपण ख़ास पाहुणा म्हणून बोलावलं जातं. काही वर्षांपूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना पाहुणे म्हणून बोलावाल्यावर एक पेचप्रसंग उभा राह्यला. त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण कार्ला ब्रुनी आली होती. ती पत्नी नसल्यानं आपल्या नियमानुसार सर्वसामान्य पाहुण्याचा दर्जा मिळाला.  पण अधिकारी वर्गाला जर पाहुण्याने नाराजी व्यक्त केली तर काय करावे? असा प्रश्न दौरा संपेपर्यंत छळत होता. 

जेव्हा सारकोझी मिटिंग्जना हजर राहात होते, तेव्हा कार्लांना दिल्लीच्या हॉटेलातच थांबावं लागलं होतं.  मात्र त्यानंतर पाच वर्षांनी जेव्हा फ्रान्सचे प्रेसिडेंट मि. हॉलंड त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत भारत भेटीला आले, तेव्हा तिला हा अडचणी सोडवण्यासाठी पत्नीचा मान देण्याचं ठरवण्यात आलं. 

याहून मोठी समस्या उभी राहते जेव्हा येणारा पाहुण्याला एकापेक्षा जास्त बायका असतील तर काय करायचे हा! बरं,  या परदेशी पाहुण्यांचा भारतात आल्यावर कुठे जायचे असे विचारले, तर उत्तर एकच असते आग्र्याचा ताजमहाल! रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांनी पण एक रात्र आग्र्यातच व्यतित केली होती आणि ताजमहालाच्या पार्श्वभूमीवर एक फ़ोटो काढून प्रकाशित केला होता. या फ़ोटोमुळे त्यांची लोकप्रियता रशियात खूप वाढली असं म्हणतात.

हिना रब्बानी खार आणि एस. एम. कृष्णा

याहूनही मोठी समस्या उभी राहते टी मिडीया कवरेजमुळे! शिष्टाचारच्या नियमाला मिडीया बांधील नसतो.  त्यामुळंच पाकिस्तानच्या विदेश मंत्री हिना रब्बानी-खार जेव्हा भारतात आल्या, तेव्हा त्या मिडियावर फारच नाराज झाल्या. माध्यमं इतकी चेकाळली होती की सगळ्या चर्चा बाईंच्या दिसण्यावरच होत होत्या.   हिना रब्बानी भारतात आल्या तेव्हा त्यांची बिर्किन पर्स, रॉबर्ट कॅविओ गॉगल आणि त्यांचा डिझायनर पेहेराव यावरच इतकी चर्चा झाली, की राजनैतिक पाहुणी म्हणून त्यांना कोणी गांभिर्याने घेतलेच नाही. एस. एम. कृष्णा तेव्हा विदेश मंत्री होते. संयुक्त वार्ताहर परिषदेत हिना रब्बानींच्या फॅशनेबल लूक्सबद्दलच जेव्हा प्रश्न आला, तेव्हा त्या रागारागाने परिषदेतून निघून गेल्या.

आंतरराष्ट्रीय पातळीवर याची इतकी प्रसिध्दी झाली की वॉल स्ट्रीट जर्नलने पण त्याची दखल घेतली. त्यांनी लिहिलं, “From her blue tunic pants ensemble to her Roberto Cavalli shades, everything grabbed Indian eyeballs, with media coverage of her accessories practically overshadowing the India-Pakistan dialogue...,” 
 

गार्ड ऑफ़ ऑनर..

काही चुका आपल्या नेत्यांकडून पण होत असतात. प्रतिभाताई पाटील मेक्सिकोच्या दौऱ्यावर असताना एक प्रसंग घडला. त्यांच्या आदरार्थ गार्ड ऑफ़ ऑनर देत असताना ही चूक झाली. या गार्डदरम्यान आपल्या राष्ट्रध्वजासमोर जाताना एक क्षण थांबून आदरार्थी मान झुकवून पुढे जायचे असते. मेक्सिकन नेता त्याच्या ध्वजाला मान देण्यास थांबला.  पण प्रतिभाताई तिरंग्यासमोरून तशाच पुढे गेल्या. त्यांना हाक मारून ही चूक त्यांच्या नजरेस आणून दिल्यावर त्या माघारी फिरल्या आणि तिरंग्यासमोर उभ्या राहील्या.

हाच किस्सा मोदींच्या रशिया भेटीच्या दरम्यान पण घडल्याचं आठवत असेलच. 

परदेशी पाहुण्यांची सिक्युरिटी हा मुद्दा नेहेमीच डोकेदुखीचा विषय असतो. त्यातून पाहुणा रशियाचे अध्यक्ष बोरीस येल्त्सीनसारखा अट्टल पिणारा असला तर तोंडाला फेस येतो!  १९९५ साली या गृहस्थाने तर कहरच केला. एक दिवस रात्री पिऊन फ़ूल्टू टाईट झाल्यावर यांनी सिक्युरिटीला झुकांडी दिली आणि व्हाईट हाऊसच्या बाहेर बरळत टॅक्सीला हाका मारत उभे राहीले. त्यांना पिझ्झा खाण्याचा मूड आला होता.  व्हाईट हाऊसच्या गार्ड्सना एक फ़क्त अंडरवेअर घातलेला माणूस दिसला.  ते त्याला हुसकायला गेले आणि कळले की हे तर आपले पाहुणे!
 

आहेत गा किस्से भारी गंमतशीर? असो, जोवर राष्ट्रप्रमुख एकमेकांच्या देशांना भेटी देत राहतील, तोवर या गंमतीजंमती घडत राहतील..⁠⁠⁠⁠

सबस्क्राईब करा

* indicates required