या फायद्यांसाठी आजच काशाची भांडी वापरायला लागा..

जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे भारत दौर्‍यावर असताना त्यांच्या भोजनाची व्यवस्था आलिशान अगाशिये या सुप्रसिद्ध गुजराती डायनिंग हॉलमध्ये केली होती. या संपूर्ण गुजराती थाळीत ३० पारंपारिक गुजराती पदार्थांची रेलेचेल होती. आणि माहीत आहे का, हे जेवण काशाच्या ताटात वाढलं गेलं होतं. काय उद्देश असावा यामागचा? तुम्हांला काय वाटतं?

आयुर्वेदाच्या दृष्टीनं काशाच्या भांड्यात अन्न सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. आज बोभाटा.कॉम तुमच्यासाठी घेऊन आले आहे काशाची म्हणजेच कांस्य धातूची भांडी वापरण्याचे मानवी शरीरासाठीचे फायदे..

तसं पाह्यला गेलं तर कांस्य धातूचा शोध साधारण ३००० वर्षांपूर्वी लागला. तेव्हा त्याचा उपयोग प्रामुख्यानं हत्यारं, पदकं आणि बांधकाम साहित्यासाठी व्हायचा. हळूहळू याचा वापर स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठीही व्हायला लागला. रासायनिकदृष्ट्या पाहायचं झालं तर कांस्य किंवा काशा हे तांबे आणि कथिल धातूचं मिश्रण आहे. याचा खूप फायदा शरीराची योग्य वाढ, रक्तातलं लोहाचं प्रमाण, योग्य एन्झाएमॅटिक प्रतिक्रिया तसेच शरीरातल्या उती म्हणजेच टिश्यूज, केस आणि डोळे यांच्या चांगल्या आरोग्यासाठी होतो. यामुळं शारीरीक ऊर्जा तर वाढतेच, पण अकाली वृध्दत्व टाळण्यासाठीही याचा उपयोग होतो.

स्रोत

--कांस्य ऍमिनो ऍसिड आणि जीवनसत्वांच्या साह्यानं चयापचय (मेटाबॉलिझम)प्रक्रियेला अधिक सक्षम करते.

--हृदयाची नियंत्रित स्पंदनं, संतुलित थायरॉईड ग्रंथी, तसंच संधिवात कमी होण्यासाठी, जखमा जलद भरण्यासाठी, लाल रक्तपेशींच्या वाढीसाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही काशाचा उपयोग होतो.

अडचण अशी आहे की कांस्य हे मानवी शरीरात तयार होऊ शकत नाही, म्हणून ते असं बाहेरच्या स्त्रोतातून मिळवायला लागतं. आपल्याकडं कांस्यला पंचधातूही म्हटलं जातं. या पंचधातूतला कथिल हा सामान्य आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. पण याचा अन्नातला समावेश हा १ ते ३ मिलिग्रॅम असावा लागतो.  पूर्वीच्या काळी जेव्हा या धातूंची भांडी स्वयंपाकासाठी वापरली जायची, तेव्हा याचं अन्नातून सेवन करण्याचं प्रमाण १०पट अधिक होतं. पण सध्या नवीन प्रकारची कमी तेल लागणारी नॉनस्टिक  भांडी आपण स्वयंपाकासाठी वापरू लागलो आणि याची शरीराला कमतरता भासू लागली. अर्थात काही भाज्यांमधून आपल्या शरीराला कथिल मिळतं, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे.

स्रोत

शास्त्रज्ञांनी प्राण्यांवर काही प्रयोग केले आणि त्यातून त्यांना असं आढळून आलं की याच्या कमतरतेमुळं शरीराची वाढ खुंटते, ऐकायला कमी येऊ शकते, आहाराची कार्यक्षमताही कमी होते. एका संशोधनात असंही सिद्ध झालं आहे की याचा उपयोग नैराश्य कमी करण्यासाठीसुद्धा होतो.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आयुर्वेदात म्हटलं आहे, “कांस्यम बुद्धिवर्धकम”!!

सध्याच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपलं आरोग्याकडं दुर्लक्ष होतं आणि शरीराची हानी होते. कांस्य धातूचे इतके फायदे असतील तर आपणही काशाच्या भांड्यात स्वयंपाक आणि जेवण या गोष्टी सुरू करायला हव्यात.

चला, मग जाऊयात का काशाची भांडी घ्यायला?

 

लेखिका स्वप्ना सप्रे-कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required