गुगलचं डिजिटल पेमेंट अॅप झालं लॉन्च : आता करा 'तेझ' व्यवहार अगदी बिनधास्त!

बर्‍याच दिवसांपासून व्हाट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी डिजिटल पेमेंट फिचर आणणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्याआधीच गुगलने आज आशियाई देशांमध्ये आपलं डिजीटल पेमेंट अॅप लॉन्च केलंय. भारतात वाढत चाललेल्या कॅशलेस व्यवहारांमध्ये आपले हात धुऊन घेण्यासाठी आता गुगलनेही यात उडी टाकलीये. या अॅपच नाव आहे 'तेझ'. आणि नावाप्रमाणे यामध्ये पैसे पाठवणं आणि मागवणं अगदी तेझ होणार आहे.

स्त्रोत

UPI (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) ला सपोर्ट करणार्‍या सर्वच बॅन्कांसोबत तेझ अॅप काम करतं. इथे फक्त तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे पेटीएमसारखं हे अॅप तुमचे पैसे स्वतःकडे साठवून न ठेवता थेट तुमच्या बँक खात्यातून पैसे खर्च करण्याचं किंवा जमा करण्याचं काम करतं. आणि तेही एका चुटकीसरशी. ज्याच्याकडे तेझ अॅप नाही, त्यालाही तुम्ही त्याचा UPI आयडी वापरून किंवा QR कोड स्कॅन करून पैसे पाठवू शकता. तेझ अॅप मराठी, गुजराती, हिंदी, कन्नड, तामिळ अशा स्थानिक भाषांमधूनही वापरता येईल.

या अॅपचं आणखी एक भारी फिचर म्हणजे कॅश मोड. तुमच्या आसपास असणार्‍या व्यक्तीला पैसे पाठवण्यासाठी किंवा त्याच्याकडून पैसे मागवण्यासाठी हा कॅश मोड उपयुक्त ठरतो. इथे तुम्हाला पे आणि रिसीव्ह हे दोन पर्याय दिसतील. यावेळी तुम्हाला कोणत्याही डिटेल्स भराव्या लागणार नाहीत. फक्त रिसीव्ह किंवा पे करणारी व्यक्ती तुमच्या जवळपास असली पाहिजे. म्हणजेच दुकानदार, दूधवाला, वडापाववाला... सगळ्यांची देणी कशी तात्काळ दिली जातील. पण कॅश मोड वापरण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडेही तेझ अॅप असायला हवं बरं का...

स्त्रोत

सुरक्षित व्यवहारांसाठी इथे गुगलचा सिक्युरिटी लेअर तर आहेच, सोबत तुम्ही तुमचा फोन पॅटर्न, पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट लॉकही वापरू शकता. तेझ अॅपमधून एका दिवसाला १,००,००० रूपयापर्यंतचे २० व्यवहार करण्याची मर्यादा आहे. आणि हो, डिटीएच सारखी महिन्याची देणी भागवण्यासाठी तेझ अॅप रिमाईन्ड फिचर वापरून तुम्हाला आठवणही करून देईल.

आता वाट कसली बघताय? प्ले स्टोअरवरून लवकर डाऊनलोड करून घ्या हे 'तेझ' अॅप...

सबस्क्राईब करा

* indicates required