चिकन-६५ मध्ये या '६५' अंकाचा अर्थ काय आहे? माहितीये का तुम्हाला?

तर खवय्ये मंडळी, तुम्ही सगळे चिकन-६५ तर नेहमीच आवडीने खात असाल. पण कधी तुमच्या मनात हा प्रश्न आलाय का, की या डिशला हे नाव का आणि कसं पडलं? यातल्या या ६५ अंकाचा नेमका अर्थ काय आहे? प्रश्न तर नक्कीच पडला असेल, पण नेमकं उत्तर कोणाकडेच नाहीये. ही डिश मुळात साऊथ इंडियन आहे. आणि या डिशला हे नाव पडण्यामागे अनेक किस्से सांगितले जातात. चला पाहूया...

एक गोष्ट अशी सांगितली जाते की पुर्वीच्या साऊथ इंडियन लोकांमध्ये 'कोण किती मिरच्या खातो' याच्यावरून चुरस असायची. यातूनच एका हॉटेल व्यावसायिकाने एक डिश बनवली. त्या डिशमध्ये एक किलो चिकनमध्ये ६५ मिरच्या असायच्या. म्हणून या डिशला चिकन-६५ हे नाव पडलं म्हणे राव!! 

दूसरी थेअरी अशी आहे की जेव्हा ही डिश अस्तित्वात आली, त्यावेळी तिला आधी काही दिवस लोणच्यासारखं साठवून ठेवलं जायचं आणि मगच सर्व्ह केलं जायचं. साठवून ठेवण्याचा हा कालावधी ६५ दिवसांचा असायचा आणि म्हणून या डिशला हे नाव दिलं गेलंय. काहीही?? 

स्त्रोत

आता पाहूया तिसरा किस्सा. 
उत्तर भारतीय सैनिकांना जेव्हा साऊथमध्ये तैनात केलं जातं तेव्हा भाषेची खूप अडचण निर्माण होते. त्यात दक्षिण भारतातल्या हॉटेल्समध्ये मेन्यूकार्डही तिथल्याच भाषेत असायचं. म्हणूनच या जवानांनी मेन्यूकार्डवरील त्या डिशसमोरचा नंबर सांगून अॉर्डर द्यायला सुरुवात केली. म्हणजे ६५ नंबरची डीश चिकन-६५. तिला ते नावच पडलं म्हणे! हे काही पटण्यासारखं नाही बुवा!

कोणीतरी असंही सांगतं की या डिशमध्ये चिकनचे अचूक ६५ पीस असायचे. आणि सोबत त्यात मसालेही बरोब्बर ६५ प्रकारचे वापरले जायचे म्हणून या डिशला चिकन-६५ हे नाव पडलं.

आता हा शेवटचा किस्सा. हा थोडा विश्वासार्ह वाटतोय. या डिशला चेन्नईमधल्या सुप्रसिद्ध बुहारी रेस्टॉरंटने सर्वप्रथम १९६५ मध्ये बनवलं होतं. या सालावरूनच त्यांनी या डिशला चिकन-६५ हे नाव दिलं. याच रेस्टॉरंटने नंतर चिकन -७८, चिकन-८२ आणि चिकन-९० या डिशही आणल्या. ज्या अनुक्रमे १९७८, १९८२ आणि १९९० साली तयार करण्यात आल्या होत्या. पण यात लोकप्रिय झाली ती चिकन-६५.

कौन बनेगा करोडपती मध्येही चिकन-६५ ची प्रथम निर्मिती बुहारी रेस्टॉरंटकडून केली गेल्याचं सांगण्यात आलं होतं.

स्त्रोत 

बघा मंडळी, आता ६५ असो वा ७५... नावात काय ठेवलंय? आपल्याला फक्त चिकनशी मतलब... नाय का?

सबस्क्राईब करा

* indicates required