computer

उदारमतवाद, खुले विचार, सर्वसमावेशकता या तत्त्वांसाठी हकनाक बळी गेलेले इजिप्तचे राष्ट्रपती अन्वर सादत!

इजिप्त हा आफ्रिका खंडातला एक मुस्लिमबहुल देश. या देशाची ८० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. इजिप्शियन संस्कृती जगातल्या अत्यंत प्राचीन संस्कृतींपैकी एक मानली जाते. दुसऱ्या महायुद्धापर्यंत इतर अनेक देशांप्रमाणे इजिप्त ही ब्रिटिश वसाहत होती. महायुद्धानंतर ब्रिटिशांनी इजिप्तवरचा ताबा सोडला. त्यानंतर काही वर्षांनी गमाल नासर हे सत्तेवर आले. अन्वर सादत हे गमाल नासर यांचे एक साथीदार.

अन्वर सादत आणि गमाल अब्दुल नासर हे ब्रिटनमध्ये एकत्र शिकले होते. ब्रिटनमधून शिकून परतल्यानंतर सादत यांनी काही काळ नासर यांच्याबरोबर कामही केलं. या मैत्रीचा सादत यांना राजकीयदृष्ट्या बराच फायदा झाला. नासर जेव्हा इजिप्तचे अध्यक्ष बनले तेव्हा उपराष्ट्रपती म्हणून अन्वर सादत यांची वर्णी लागली. नासर इजिप्शियन जनतेच्या दृष्टीने देव होते. अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीपुढेही ते कधी झुकले नाहीत. त्यांची ताकद प्रचंड होती आणि तितकीच जनमानसावरची पकडही पक्की होती.

१९७० मध्ये नासर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इजिप्तचे राष्ट्रपती म्हणून अन्वर सादत यांची नियुक्ती झाली. पण आधीच्या गमाल नासर यांच्या तुलनेत अन्वर सादत यांचा प्रभाव फारच फिका होता. अनेकांना अन्वर सादत राष्ट्रपती म्हणून पसंत नव्हते. सादत तसे मोकळ्या विचारांचे, उदारमतवादी होते. नासर यांच्याप्रमाणे कडवे नव्हते. त्यांचा हा उदारमतवादच त्यांच्या विनाशाचं कारण ठरला.

त्यांचा हा उदारमतवाद, खुले विचार, सर्वसमावेशकता कट्टर पंथीयांना पसंत नव्हते, विशेषतः इस्लामी अतिरेकी आणि दहशतवादी यांना नाहीच नाही. याआधी नासर यांनी आपल्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या, तसंच कट्टरपंथीय लोकांना तुरुंगात टाकलं होतं. सादत यांनी सत्तेवर आल्यानंतर यातल्या बऱ्याच जणांना मुक्त केलं. सगळ्यांना बरोबर घेऊन इजिप्तची अर्थव्यवस्था सुधारण्याचं आणि राज्य चालवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे सुरुवातीला तरी ते फार काही करिष्मा दाखवू शकणार नाहीत असा अंदाज लोकांनी बांधला. पण जसजसा काळ गेला तसतसे अन्वर हेही ताकदीचे आहेत हे लोकांच्या लक्षात यायला लागलं.

सादत यांनी उदार आर्थिक धोरण राबवलं. खाजगीकरणाला वाव दिला. महिलांना राजकारणात प्रतिनिधित्व मिळेल अशी सोय केली. शिक्षणापासून महिला वंचित राहणार नाहीत असं आश्वासन दिलं. या सुधारणा देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्या तरी त्या नको असलेले लोक मात्र चिडले. सादत यांनी विरोधकांना तुरुंगात डांबलं.

सादत यांनी उदार आर्थिक धोरण राबवलं. खाजगीकरणाला वाव दिला. महिलांना राजकारणात प्रतिनिधित्व मिळेल अशी सोय केली. शिक्षणापासून महिला वंचित राहणार नाहीत असं आश्वासन दिलं. या सुधारणा देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्या तरी त्या नको असलेले लोक मात्र चिडले. सादत यांनी विरोधकांना तुरुंगात डांबलं.

त्यातच १९४५ मध्ये अरब लीग स्थापन झाली. इस्रायलला शह देण्यासाठी इजिप्त, सौदी अरेबिया यासारखे देश एकत्र आले. परंतु १९४८ मध्ये अरब आणि इस्रायलमध्ये झालेल्या पहिल्याच युद्धामध्ये इस्रायलला विजय मिळाला. केवळ याच नाही तर त्यानंतरच्या प्रत्येक युद्धात विजयाचं पारडं इस्रायलच्या बाजूने झुकलं. त्यानंतरच्या एका युद्धात इस्रायलने सिनाई प्रदेशावर ताबा मिळवला. त्यामुळे या प्रदेशात रहात असलेले इजिप्शियन लोक नाराज झाले. शिवाय या युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली होती. त्यामुळे अन्वर सादत यांनी हे सगळं थांबवण्याचा निर्धार केला. त्या दिशेने त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे इस्रायलबरोबर शांतता प्रस्थापित करणं, थोडक्यात समझोता. इजिप्तच्या राजकारणातला हा महत्त्वाचा टप्पा होता. १९७८ मध्ये सादत यांनी इस्रायल बरोबर शांतता करार केला. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या सहकार्याने हे घडून आलं.

या कराराने कट्टर पंथीयांना आपलं नाक आपल्यासारखं वाटायला लागलं. सादत यांनी अमेरिका आणि इस्रायलशी म्हणजे चक्क शत्रूंशी हातमिळवणी केली अशी त्यांची समजूत झाली. आपली चेष्टा चालली आहे असं राष्ट्रवाद्यांना वाटायला लागलं. सादत यांच्या पत्नीच्या मते त्यांनी स्वाक्षरी केलेला शांतता करार म्हणजे प्रत्यक्षात त्यांच्यासाठी जणू डेथ वॉरंट होतं. जेव्हा जेव्हा ते बाहेर जात, तेव्हा तेव्हा ते परत येतील की नाही ही भीती तिला सतावायची. कोणत्या क्षणी कट्टरपंथीय त्यांना ठार मारतील याचा नेम नव्हता.

आणि झालंही तसंच. १९७८ मधलं कॅम्प डेव्हिड ऍकॉर्ड हे त्यांच्या मृत्यूचं कारण बनलं. खालीद इस्लामबोली नावाच्या माणसाने त्यांचा खून केला. हा मनुष्य स्वतः लष्करात होता आणि विचारांनी कडवा होता. सादत यांनी इस्रायलशी हातमिळवणी केली याचा राग मनात ठेवून खालीदने त्यांना मारण्याचा कट रचला. सादत यांना ठार मारून नंतर सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घ्यायचं असा त्याचा बेत होता. एकदा अधिकारी ताब्यात आले की सत्तापालट करणं सहज शक्य होतं. इजिप्तमध्ये ६ ऑक्टोबर या दिवशी व्हिक्टरी परेड असते. हाच मुहूर्त निश्चित केला गेला. ६ ऑक्टोबरला अन्वर सादत परेडसाठी तयार होत होते. खास त्यासाठी म्हणून त्यांनी सूट वगैरे शिवून घेतला होता. त्यांच्या पत्नीने त्यांना वरून बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याचा सल्ला दिला. पण सादत यांनी ऐकलं नाही. ते घातलं तर आपण जाड दिसू असं कारण त्यांनी पुढे केलं! बुलेटप्रूफ जॅकेट न घालणं ही त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरली.

ते नियोजित ठिकाणी पोहोचले. परेड सुरू झाली. सादत यांची बसण्याची जागा सगळ्यात पुढे होती. सगळं व्यवस्थित सुरू होतं. तेवढ्यात त्या मैदानाकडे ट्रक्सची एक रांग येताना दिसली. सगळ्यात पुढच्या ट्रकमध्ये खालीद इस्लामबोली होता. त्याच्याबरोबर त्याचे चार साथीदार होते. एरवी असलेली चार स्तरावरची सादत यांची सुरक्षा या परेडसाठी काहीशी शिथिल करण्यात आली होती.

इस्लामबोलीने आपल्या ट्रक ड्रायव्हरच्या कानापाशी बंदूक ठेवून त्याला धमकावत ट्रक थांबायला लावला. ड्रायव्हरने इतका जोरात ब्रेक दाबला की ट्रक जवळपास तिरका झाला. नंतर इस्लामबोली ट्रकमधून खाली उतरला. त्यावेळी त्याच्याकडे तीन ग्रेनेड्स होती. तो अन्वर सादत यांच्या दिशेने पळत सुटला. सादतना काहीच कल्पना नव्हती. त्यांना समोरून पळत येणारा माणूस आपल्याला सलाम ठोकण्यासाठी येत आहे असंच वाटलं. ते त्याचा सलाम स्वीकारण्यासाठी उठून उभे राहिले. इस्लामबोलीने ग्रेनेड आपल्या हेल्मेट मध्ये लपवली होती. अन्वर सादत च्या जवळ येऊन याने तिन्ही ग्रेनेड्स त्यांच्या दिशेने फेकली. एका ग्रेनेडचा स्फोट झाला. त्यानंतर त्यांनी एके फोर्टी सेवन मधून सादत यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. त्यापैकी एक गोळी त्यांच्या मानेत घुसली आणि ते तिथेच कोसळले. या हल्ल्यात सादत यांच्याव्यतिरिक्त काही लष्करी अधिकारी, क्युबाचे राजदूत असे मिळून दहा लोक ठार झाले. पहिल्या धक्क्यातून सावरल्याबरोबर लष्कराने प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली. इस्लामबोलीला ताब्यात घेतलं गेलं.

अक्षरशः दोन मिनिटांत एका देशाची राजकीय दिशा बदलली. त्या काळी उपराष्ट्रपती असलेले होस्नी मुबारक हेही या हल्ल्यात जखमी झाले. सादत यांना ताबडतोब रुग्णालयात हलवलं गेलं. तेथे डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन तासांनी सादत यांचा मृत्यू झाला. त्यानंतर होस्नी मुबारक राष्ट्रपती बनले. ते तीस वर्षं सत्तेत राहिले. इस्लामबोलीला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. एप्रिल १९८२ मध्ये त्याला फायरिंग स्क्वाडने गोळी घालून ठार केलं. मात्र कट्टर इस्लाम पंथीयांनी इस्लामबोलीला शहिदाचा दर्जा दिला.

जर त्या दिवशी आपल्या दिसण्याची फार पर्वा न करता सादत बुलेटप्रूफ जाकीट घालून गेले असते तर... ? 'विनाशकाले विपरीतबुद्धी:' हेच खरं.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required