computer

सत्य जाणून घ्या शिवनाग वृक्षाच्या वळवळणार्‍या मुळांचे !

Subscribe to Bobhata

पृथ्वीवर एका पेशीपासून सुरु झालेल्या जीवसृष्टीचा विस्तार किती वर्षात आणि किती झाला आहे याची खरे म्हणजे कोणालाच कल्पना नाही.शास्त्रज्ञ दिवसरात्र धडपडून संशोधन करून आपल्या ज्ञानात भर घालत असतात.पण या ज्ञानाच्या प्रसारातील एक मोठी धोंड म्हणजे अर्धवट माहिती गोळा करून त्यात हवी तशी भर घालून समाजमाध्यमातून प्रचार करणारे फॉरवर्ड युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी !आणखी एक सामाजिक समस्या अशी आहे की एखादा नैसर्गिक गुणधर्म समजला नाही की त्यासोबत एखाद्या देवाचे नाव जोडून टाकायचे आणि मोकळे व्हायचे.असे झाले की आपण टाकलेली पोस्ट अधिकच व्हायरल होते हे या फॉरवर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना चांगलेच कळले आहे. त्यातूनच जन्माला येतात अनेक गैरसमज ! गेल्या वर्षीचेच उदाहरण घ्या  
गेल्यावर्षी  एक पोस्ट समाजमाध्यमावर 'व्हायरल' झाली होती ती अशी -
ही शिवनाग वृक्षाची मुळे आहेत.तोडल्यानंतर ही मुळे सुकायला १० ते १५ दिवस लागतात. तोपर्यंत ती अशीच वळवळत रहातात
आता आपण सत्य काय ते जाणून घेऊ या !  
---

ही मुळे नसून हॉर्सहेअर वर्म नावाचे जंतू आहेत.हे घोड्याच्या शेपटीच्या केसासारखे लांबलचक दिसतात म्हणून हॉर्सहेअर नाव त्याला दिले गेले आहे. पहिली महत्वाची बाब म्हणजे माणसासाठी हा जंतू अजिबात घातक नाही.  हा कीटकांवर जगणारा एक पॅरासाईट(परोपजीवी) आहे आणि पीकांचं नुकसान करणार्‍या कीटकांवर जगणारा मानवाला उपयुक्त असा जंतू आहे.

यांचं लाईफसायकल सुरू होतं पाण्यामधे. याची मादी पाण्यात लक्षावधी मायक्रोस्कोपीक( अतीसूक्ष्म) अंडी घालते. त्यातून निघालेल्या अळ्या तात्काळ होस्टच्या शोधात निघतात. डास किंवा तत्सम पाण्यात अंडी घालणार्‍या कीटकांच्या अळ्यांच्या शरीरात ह्या अळ्या शिरकाव करतात. तो किटक पाण्याबाहेर आला की तो इतर दुसर्‍या कीटकांचं भक्ष्य बनतो. उदा. नाकतोडे, कॅटीडीड्स, क्रिकेट्स वगैरे. त्यांच्या पोटात गेल्यावर हॉर्सहेअर वर्मची खरी वाढ सुरू होते. यजमानाला पोटामधे कुरतडून सावकाश चांगलं फुटभर लांब झालं की हा जंत त्याला पाण्याजवळ जाण्याची आज्ञा देतो. कीटक पाण्याजवळ पोहोचला की त्याच्या पोटातून तो बाहेर पडतो आणि पाण्यात शिरकाव करतो. ह्यात कीटक कधी जगतो तर कधी मरतो. बाहेर पडल्यावर त्याचा रंग पांढरा असतो. जसा मोठा होईल तसा तपकिरी रंगाचा होत जातो. मग परत पाण्यात अंडी घालतो आणि लाईफसायकल सुरू होतं. अर्थात हे ढोबळ लाईफसायकल आहे. विविध जातींमधे थोड्याफार फरकाने वैविध्य असू शकतं. मी लोणावळ्याजवळच्या कोरीगड किल्ल्यावर लेण्यामधल्या पाण्यात असा पांढर्‍या रंगाचा नुकताच  किड्यातून बाहेर आलेला वर्म पाहिला आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर झाडांची मुळे अशी वळवळ करत नाहीत. अशी वळवळ फक्त जंतुच करतात. जर शिवनाग मुळांची अफवा तुमच्या वाचनात आल्यास त्यावर उपाय म्हणून  हा लेख शेअर करायला विसरू नका.


लेखक : मकरंद केतकर

सबस्क्राईब करा

* indicates required