computer

अंतराळात गेलेले १० प्राणी...या प्राण्यांमुळे आज अंतराळ संशोधन शक्य झालं आहे !!

कोणत्याही देशासाठी अंतराळ संशोधन महत्वाचं असतं. त्यासाठी दरवर्षी कोटीच्या कोटी पैसा खर्च केला जातो. याची सुरुवात झाली ती दुसऱ्या महायुद्धानंतर. याला कारण होतं शीतयुद्ध. दुसऱ्या महायुद्धातून दोन महासत्ता जन्मल्या - अमेरिका आणि रशिया! दोघांनाही एकमेव महासत्ता बनायचं होतं. त्यासाठी युद्धानंतर दोघांमधल्या छुप्या युद्धाला सुरुवात झाली. त्यालाच शीतयुद्ध म्हणतात.

या शीतयुद्धात अमेरिका आणि रशिया यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जे जे काही केलं, त्यात अंतराळ मोहिमांचाही समावेश होतो. रशियाने अंतराळात पहिला माणूस पाठवला, तर अमेरिकेने चंद्रावर पहिला माणूस पाठवला. कितीही स्पर्धा असली तरी माणसाला लगेचच अंतराळात पाठवणे शक्य नव्हते. प्रयोग म्हणून आधी प्राण्यांना पाठवण्यात आलं. हे प्राणी एक प्रकारे मृत्युच्या दाढेत ढकलेले गेले होते. सुदैवाने त्यातले काही सुखरूप परतले. त्यांच्यामुळे शक्य झालेल्या अभ्यासाच्या जोरावर आज आपण अवकाशात संशोधन करू शकलो.

आज आपण अवकाशात पाठवलेल्या १० प्रमुख प्राण्यांबद्दल जाणून घेणार आहोत. 

१. लायका

लायका ही रशियाची राजधानी मॉस्कोच्या रस्त्यावर भटकणारी कुत्री होती. तिला रशियाच्या अंतराळ परिक्षणासाठी रस्त्यावरून थेट रशियन अवकाश संशोधन केंद्रावर आणलं गेलं. त्याकाळी अवकाश संशोधन नुकतंच सुरु झालं होतं. अंतराळाबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध होती. माणूस अंतराळात जिवंत राहू शकतो की नाही, याबद्दल अजूनही शास्त्रज्ञ साशंक होते. याबाबतीत संशोधन करण्यासाठी बिचाऱ्या लायकाला अंतराळात पाठवण्यात आलं. ती मारणार हे रशियन शास्त्रज्ञांना माहित होतंच.

स्पुतनिक-२ यानात बसवून तिला ३ नोव्हेंबर, १९५७ साली अवकाशात पाठवण्यात आलं. तिचं पुढे काय झालं याबद्दल त्यावेळी समजलं नाही. १९९९ आणि २००२ च्या अहवालातून जगासमोर माहिती आली की लायका काही तासांतच मरण पावली होती. उष्णतेमुळे आणि तणावामुळे तिचा मृत्यू झाला होता.

या संपूर्ण प्रयोगात सहभागी असलेले ओलेग गझेन्को यांनी लायकाला अंतराळात पाठवल्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला होता. त्यांनी हेही सांगितलं की “तिच्या मृत्यूचं समर्थन करू शकू एवढंही संशोधन या प्रयोगातून झालं नाही.” आज लायकाचं नाव अंतराळात गेलेल्या पहिल्या काही प्राण्यांच्या यादीत आहे, पण हा मान मिळवायला तिला आपला जीव गमवावा लागला.

२. गोर्डो

लायकाच्या मृत्यूला वर्ष झालं असेल नसेल, तोच अमेरिकेने गोर्डो माकडाला अंतराळात पाठवलं. हे माकड स्क्विरल मंकी जातीतलं होतं. या प्रकारच्या माकडाचे अनुवांशिक गुण माणसाच्या अनुवांशिक गुणांशी मिळतेजुळते असतात म्हणून गोर्डोची निवड करण्यात आली.

त्याने सुरुवातीचे सगळे टेस्ट पास केल्यानंतर १३ डिसेंबर, १९५८ साली त्याला अवकाशाच्या दिशेने पाठवण्यात आलं. हे उड्डाण अवघ्या १५ मिनिटांचं होतं. यान पृथ्वीपासून २४१४ किलोमीटर अंतर गेलं. पुन्हा जमिनीवर येताना पॅराशूट वेळेत उघडलं नाही आणि क्रॅश लॅडिंगमुळे गोर्डोचा जीव गेला. लायकाप्रमाणे त्याला उष्णतेचा सामना करावा लागला नव्हता. अटलांटिक समुद्रात बुडाल्यामुळे त्याला मृत्यू आला. अमेरिकन शास्त्रज्ञांनी रशियाकडून नक्कीच धडे घेतले असतील, पण गोर्डोला वाचवण्यात त्यांना यश आलं नाही.

३ आणि ४. एबल आणि मिस बेकर

रीसस आणि स्क्विरल या दोन प्रकारची ही माकडं होती. गोर्डोच्या मृत्युनंतर अवघ्या काही महिन्यांतच ही मोहीम आखण्यात आली. नासाला गोर्डोने अर्धवट सोडलेला अभ्यास या दोघांकडून पूर्ण करून घ्यायचा होता. सुदैवाने एबल आणि मिस बेकर दोघेही या मोहिमेतून सुखरूप वाचले. ताशी १६००० किलोमीटर या वेगाने त्यांनी प्रवास केला. दोघांपैकी एबल हा दुर्दैवी निघाला. मोहिमेतून परतल्यानंतर त्याची अवस्था बिघडत गेली.

दोघांनाही इलेक्ट्रोड्स लावण्यात आले होते. याद्वारे मोहिमेदरम्यान त्यांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचं आणि बदलांचं निरीक्षण करण्यात आलं. हे इलेक्ट्रोड्स एबलसाठी घातक ठरले. एबलला त्याचा संसर्ग झाला. त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आलं, पण अनेस्थेशियाचा त्याच्यावर विपरीत परिणाम झाला. त्यातच त्याला मरण आलं. सध्या त्याचं शरीर Smithsonian's National Air and Space Museum मध्ये ठेवण्यात आलं आहे. मिस बेकर १९८४ साली वयाच्या २७ व्या वर्षी मरण पावली.

५ आणि ६. बेल्का आणि स्ट्रेल्का

ही कुत्र्यांची जोडगोळी होती. अंतराळात जाऊन सुखरूप परतणाऱ्या मोजक्या प्राण्यांमध्ये या दोघांचं नाव येतं. रशियाने Korabl-Sputnik 2 या यानातून त्यांना पाठवलं होतं. यानात हे दोघेच नव्हते, तर त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात इतरही प्राणी होते. ४२ उंदीर, ससा, घरमाशा तसेच अनेक वनस्पती आणि बुरशी असा संपूर्ण जत्था अंतराळात गेला होता. पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना सुखरूप परत आणणारं हे पहिलंच यान होतं.

स्ट्रेल्का कुत्रीने अंतराळातून परतल्यावर पिल्लांना जन्म दिला. रशियाचे त्यावेळचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी अमेरिकेचे अध्यक्ष कॅनेडी यांना स्ट्रेल्काचं एक पिल्लू भेट म्हणून दिलं होतं.

७. फेलिसिटी

वरती दिलेल्या सगळ्या प्राण्यांना अमेरिका किंवा रशियाने अवकाशात पाठवलं होतं, पण अवकाशात पहिल्यांदा मांजर पाठवण्याचा मान फ्रांसला जातो. १९६३ साली फ्रांसने आपल्या स्पेस प्रोग्रॅमअंतर्गत फेलिसिटी नावाच्या मांजरीला अवकाशात पाठवलं. असं म्हणतात की मोहिमेतून परतल्यावर तिचा स्वभाव चिडखोर झाला होता. यावरून तुम्ही अनुमान लावू शकता की अविकाशात तिला कसं वाटलं असेल.

फेलिसिटीबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख वाचा :

गोष्ट अंतराळात गेलेल्या मांजरीची, माहितेय का तुम्हांला? सोबत तिचा व्हिडिओही पाहा..

८. हॅम

हॅम हा अंतराळात जाणारा पहिला चिम्पान्झी होता. अंतराळ मोहिमेदरम्यान माणसाला हालचाल करता करता येऊ शकते का, अंतराळात प्रयोग करता येऊ शकतात का, हे हॅमच्या मार्फत नासाच्या शास्त्रज्ञांना तपासायचं होतं. यासाठी हॅमला निळा प्रकाश दिसताच यानातील तरफ फिरवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्याने हे काम शिकवल्याप्रमाणे बरोबर केलं, काही सेकंदाचा तेवढा फरक दिसून आला.

३१ जानेवारी १९६१ साली तो पृथ्वीवर परतला. त्याच्या नाकाला जखम झाली होती, पण त्यापलीकडे त्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती. तो पुढे १९८३ सालापर्यंत जगला. या प्रयोगामुळेच पुढे नासाचा अंतराळवीर ॲलन शेफर्ड अंतराळात जाऊ शकला.

९. अॅनिता आणि अॅराबेला

ॲनिता आणि ॲराबेला या कोळ्यांना म्हणजे मराठीत स्पायडर्सना स्कायलॅब यानातून १९७३ साली अंतराळात पाठवण्यात आलं होतं. आता या इवल्याशा कोळ्यांना अंतराळात का बरं पाठवलं असेल ? तर त्याचं उत्तर आहे, शास्त्रज्ञांना हे पहायचं होतं की गुरुत्वाकर्षणातील बदल त्यांच्या जाळे विणण्याच्या क्रियेवर काय परिणाम करतो.

अंतराळात काही दिवस राहिल्यानंतर दोघांनी जाळे विणले. पुढे संशोधनात असं आढळून आलं की त्यांनी अंतराळात विणलेले जाळे जास्त बारीक होते. धाग्यांचं विणकाम अनियमित होतं.

मंडळी, दोघांचाही मोहिमेच्यावेळी पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला.

१०. कासव

या कासवाला नाव मिळालं नाही. काही ठिकाणी त्याचा उल्लेख flossers असा आहे. १८ सप्टेंबर १९६८ साली या कासवाने अंतराळात झेप घेतली.  अंतराळात लांबवरचा प्रवास करणारा हा पृथ्वीवरचा पहिला जीव होता. तो चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतला होता. सुदैवाने तो जिवंत होता. पुढच्याच वर्षी नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं.

 

मंडळी, यांच्याखेरीज अनेक प्राण्यांना लहानसहान संशोधनासाठी अंतराळात सोडण्यात आलं आहे. १९७३ साली नासाने मासाही अंतराळात पाठवला होता. हे प्रयोग बरोबर होते की चूक, हा आजही वादाचा मुद्दा आहे. तुम्हाला काय वाटतं, प्राण्यांवर केलेले हे अमानुष प्रयोग बरोबर होते का ?