computer

यशस्वी लोकांच्या ११ सवयी.. तुम्ही या कधी अंगीकारत आहात?

यशस्वी लोक कोणत्याही वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. यशस्वी लोकांच्या राहणीमानाकडे पाहिल्यास आपल्याला त्यांचा खूपच हेवा वाटतो. आपलंही आयुष्य यांच्यासारखच निवांत नि सुखी असावं असं वाटणं साहजिक आहे. पण त्यासाठी काही विशिष्ट गोष्टी आपल्यालाही अंगिकाराव्या लागतील. यशस्वी लोक असं नेमकं काय करतात की ज्यामुळे ते याप्रकारच आयुष्य जगू शकतात? याचं उत्तर द्यायचंच झालं तर इतकंच म्हणता येईल की, यशस्वी लोकांच्या सवयी आणि आपल्या सवयी यामध्ये खूप मोठी तफावत असते. आपणही जर त्यांच्या सारख्या चांगल्या सवयी आणि शिस्तबद्धपणा स्वीकारला तर नक्कीच आपलंही आयुष्य आपण अधिकाधिक सुंदर बनवू शकतो. चला तर मग पाहूया यशस्वी लोकांनी स्वतःचे आयुष्य घडवण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकारल्या...

१. व्यायामाला प्राधान्य

:आपल्यासाठी ही गोष्ट खरच खूप अवघड वाटते. हो ना? व्यायाम म्हटले तरी काही लोकांच्या अंगावर काटा येतो. पण यशस्वी लोकांची हीच खासियत आहे की ते व्यायामाला महत्त्व देतात. त्यात नियमितता आणि सातत्य राखतात. त्यांच्या रोजच्या दिनक्रमात व्यायामाला स्थान हे असतेच.

व्यायामाला आपल्या दैनंदिन जीवनात स्थान देण्यासाठी तुम्ही बरंच काही करु शकता. योगापासून ते विविध प्रकारचे व्यायाम शिकवणारे अनेक ॲप्स फोनवर उपलब्ध आहेत. हे ॲप्स तुम्ही कधी कोणता व्यायाम कितीवेळ करू शकता याचीही इतंभूत माहिती देतात. या ॲप्सच्या मदतीने तुम्ही व्यायाम करू शकता. एकट्याने व्यायाम करायचा कंटाळा येत असेल तर, जिम किंवा योगा सेंटरमध्ये जाऊ शकता. मित्राला किंवा मैत्रिणीला भेटायचे असेल, गप्पा मारायच्या असतील तर आपण कॉफी किंवा चहा पिण्याचे नमित्त शोधतो, अगदी त्याचप्रमाणे एकत्र फिरायला जाण्याचेही कारण देऊन व्यायाम आणि गप्पा अशा दोन्ही गोष्टी साध्य करू शकता.

२. स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी

:सर्वच यशस्वी लोकांमध्ये ही एक सवय कॉमन आहे. त्यांना सतत आपल्या कामात काय काय सुधारणा करता येतील याचा विचार करण्याची सवय असते. आपले काम कुठल्या पद्धतीने केले तर जास्त प्रभावी आणि परिणामकारक ठरेल याचा ते नेहमी शोध घेत असतात. शिवाय, कुठलीही आव्हाने आली तरी डगमगून न जाता त्यातून आपल्याला काय शिकायला मिळाले, यावर लक्ष केंद्रित करतात. संकटातही संधी शोधण्याची त्यांची वृत्तीच त्यांना यशस्वी बनवते.

३. आव्हानांचा स्वीकार करा

अडचणी आणि अडथळे प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. यशस्वी लोक मात्र अशा संकटातही काही तरी संधी असेलच असा सकारात्मक विचार करतात. स्वतःची कमजोरी आणि बलस्थाने कोणती यांचा आढावा घेतात. ज्यावरून त्यांना आपली रणनीती ठरवणे सोपे जाते.
आपल्या कामाबद्दल इतरांच्या प्रतिक्रिया काय आहेत, याबाबत ते नेहमी जागरूक असतात आणि ग्राहकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया कळतात.

४. नवनव्या गोष्टी शिकणे

:जगातील सर्व यशस्वी लोकांची एक खासियत म्हणजे, ते नेहमी नवनव्या गोष्टी शिकण्यास उत्सुक असतात. दररोज चांगली पुस्तके वाचणे, पॉडकास्ट ऐकणे, चांगल्या लोकांशी गप्पा मारणे विशेषत: त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यात दिवसेंदिवस काही तरी नवीन भर पडत राहते. धावत्या युगात आपण जगासोबत राहणे महत्वाचे आहे. म्हणूनच स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी जे लोक सतत प्रयत्न करतात तेच यशस्वी होतात. तुम्हालाही अशाच पद्धतीने सतत अपडेट राहायचं असेल, नवनव्या गोष्टी शिकायच्या असतील तर, पुढे दिलेल्या काही टिप्स नक्कीच उपयोगी पडतील.
तुम्हाला ज्या ज्या गोष्टी शिकायच्या आहेत त्यांची एक यादी बनवा. या यादीतील प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी किती कालावधी द्यायचा आहे ते निश्चित करा. तीन महिन्याचा ग्राफिक डिझायनिंग कोर्स, दोन वर्षाचा फॉरेन लँग्वेज लर्निंग कोर्स, असा कालावधी ठरवा आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी शिकत आहात त्या गोष्टी अंमलात आणायला विसरू नका.

५. तंत्रज्ञानापासून ब्रेक:

तंत्रज्ञानाने विशेषत: सोशल मिडिया आणि स्मार्ट फोनने आपल्या दिनचर्येचा बराच भाग व्यापला आहे. अर्थात याचे खूप सारे चांगले फायदे आहेतच, जे कोणीही नाकारत नाही. तरीही या तंत्रज्ञानाचे काही असे तोटेदेखील आहेत ज्याचा आपल्यावर नकळतपणे विपरीत परिणाम होत असतो. या अदृश्य आणि नकारात्मक परिणामांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या गोष्टींपासून काही काळ तरी दूर जाणं आवश्यक आहे. म्हणून जगातील अनेक यशस्वी लोकांनी टेक्नॉलॉजी फास्टींग ही एक नवी संकल्पना जन्मास घातली आहे. विशेषत: आठवड्यातून एक दिवस तरी फोनला विश्रांती द्यायचीच असा त्यांचा दंडक आहे.
तुम्हालाही फोनचा वापर कमी करायचा असेल तर पुढील काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.

६. फोनचे अनावश्यक नोटीफिकेशन ऑफ करा.


आठवड्यातून एक दिवस तुमचा फोन तुमच्या नजरेसही पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा. या दिवशी फोन सायलेंट मोडवर ठेऊन तुम्ही जवळच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी किंवा एखाद्या शांत ठिकाणी जाऊन स्वतःला रिचार्ज करू शकता. सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर एक तास आणि रात्री झोपण्यापूर्वी एक तास मोबाईल दूर राहील अशा प्रकारचे शेड्युल बनवा. सकाळचा वेळ व्यायाम, मेडीटेशन, किंवा स्वतःचे आवरणे अशा उत्पादक गोष्टींवर खर्च झाला तर नक्कीच दिवस अतिशय चांगला जातो.

७. प्रेरणादायी व्यक्तींच्या सहवासात राहणे

:यशस्वी लोक नेहमी अशा लोकांच्या घोळक्यात राहतात ज्यांच्याकडे पाहून त्यांना ऊर्जा मिळेल. त्यांना नवनव्या कल्पना सुचतील आणि त्या अंमलात आणण्यास अशा व्यक्ति त्यांना प्रेरणा देत राहतील. तुम्हीही तुम्हाला सकारात्मक ठेवणाऱ्या, तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा ज्यांच्याकडे पाहून तुम्हाला काम करण्याचा उत्साह मिळतो, प्रोत्साहन मिळते अशा लोकांच्या संपर्कात राहा. प्रेरणा मिळवण्यासाठी तुम्ही वरचेवर नवनव्या ठिकाणांना भेट द्या. जिथे तुम्ही सहसा जात नाही, अशा ठिकाणी जाऊन फिरून या. इथे नव्या लोकांशी ओळखी होतील. त्यांच्याशी गप्पा मारून तुम्हाला काही नव्या कल्पना सुचतील.

आयुष्यात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांची एक यादी बनवा. त्या गोष्टी प्रत्यक्षात येण्यासाठी काय काय करता येईल यासाठी एक आराखडा तयार ठेवा.

८. आत्मपरीक्षण

:प्रत्येक यशस्वी व्यक्तीने केलीच पाहिजे अशी गोष्ट म्हणजे आत्मपरीक्षण. स्टीव्ह जॉब्ज तरी आठवड्यातून एक दिवस संपूर्ण गोंगाटापासून दूर जाऊन आपण जे काही करत आहोत ते बरोबर आहे का, त्यात काही चूक तरी होत नाही ना, यावर विचार करण्यासाठी म्हणून स्वतःला निर्जन ठिकाणच्या खोलीत बंद करून घेत असे. आत्मपरीक्षण केल्याने काही न सुटणाऱ्या कोड्यांचीही उत्तरे मिळून जातात. फक्त स्टीव्ह जॉब्जच नाही तर, जेफ बोझेस, एलोन मस्क यासारख्या यशस्वी व्यक्तीही ही ट्रिक वापरतात. जेफ बोझेसच्या मते, बिझनेसमधील प्रत्येक निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करणे खूप महत्वाचे आहे. मी कोणताही निर्णय घेताना खूप विचार करतो आणि मगच निर्णय घेतो. यासाठी मी आठवड्यातून एक दिवस तरी नक्की काढतो.

आता आत्मपरीक्षण करणे हे काही तितकीशी सोपी गोष्ट नाही. मुळात आत्मपरीक्षण आणि आत्मटीका यात खूप फरक आहे. आत्मपरीक्षण कसं करावं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, तुम्ही पुढील काही मुद्द्यांच्या आधारे स्वतःचे आत्मपरीक्षण करू शकता. दैनंदिन कामे करत असताना, जसे बागेला पाणी देणे, फिरताना, तुम्ही स्वतःचं नेमकं काय चाललंय याबद्दल विचार करू शकता. यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारा. आपल्याला काय करायचं आहे? आणि यासाठी आपण योग्य ते प्रयत्न करतोय का? अशा स्वरूपाचे हे प्रश्न असावेत. ही कल्पना थोडी विचित्र वाटेल पण स्वतःशी मोठ्याने बोला. स्वतःचीच मुलाखत घ्या. या मुलाखतीत स्वतःची स्वप्ने, त्याबद्दलचा आराखडा, त्याचे नियोजन, अंमलबजावणी यासंबंधीचे प्रश्न असू द्या.

९. शिस्तबद्धपणा

यशस्वी लोकांची ही एक मोठी खासियत आहे की ते शिस्तप्रिय असतात. त्यांची आदल्या रात्रीच उद्या आपल्याला काय काय करायचे आहे आणि कोणत्या वेळेत करायचे आहे, याची एक यादी तयार असते. रोज रात्री झोपण्यापूर्वी ते या यादीवरून नजर फिरवतात आणि मगच झोपतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर त्यांच्याकडे आपण काय करणार आहोत याचे उत्तर तयार असते. आपल्या कामाशी प्रमाणिक राहायचे असेल तर ही शिस्त आपल्याला पाळावीच लागेल. शिस्त पाळणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. त्यासाठी जाणून बुजून आणि खूप प्रयत्न करावे लागतील.

शिस्तबद्धता येण्यासाठी या काही महत्वाच्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. स्वतःच्या शरीराचे एक वेळापत्रक असते. तुमचे शरीर तुम्हाला काही सांगू इच्छिते ते ऐका. शरीर ताजेतवाने आणि मन उत्साही असते अशा वेळेत केलेले काम जास्त परिणामकारक ठरते. सकाळी उठल्यानंतर मनातल्या मनात तुमच्या दिवसभरच्या कामाची उजळणी करा. दिवसभरात कुठली कामे प्राधान्याने करायची याची आपली एक यादी तयार असते. पण, कधी कधी आपण ही यादीच बघत नाही. म्हणून दिवसाच्या सुरुवातील, मध्यावर आणि संध्याकाळी एकदा या यादीवरून नजर फिरवा. म्हणजे तुम्हाला कळेल की आजच्या दिवसात जी काही कामे करायची तुम्ही ठरवली होती, ती पार पडली की नाही?

१०. सकाळी लवकर उठणे:

जगातील बहुतांश यशस्वी व्यक्तींची ही एक सामान्य सवय आहे. विशेष बाब म्हणजे तुमच्या आमच्या प्रमाणे त्यांना लवकर उठण्यासाठी अलार्म नावाच्या कुबड्यांचीही गरज भासत नाही. पण हे कसे शक्य आहे? नक्कीच आहे. रात्री लवकर झोपणे. लवकर झोपल्याने झोप लवकर पूर्ण होते आणि सकाळी लवकर जाग येते. रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफी, चॉकलेट अशा भरपूर साखर असणाऱ्या पदार्थांचे सेवन टाळणे. यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि तुमच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

११. झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी स्क्रीन ऑफ करायला विसरू नका.

यशस्वी लोकांच्या या सवयी आपणही अमंलात आणून स्वतःच्या जीवानात बदल घडवू शकतो. किमान त्यासाठी प्रयत्न तरी नक्कीच करू शकतो. आता आम्हाला सांगा यातील कोणत्या सवयी तुम्हाला आधीपासूनचा आहेत आणि कोणत्या सवयी बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required