अंतराळात राहून हा माणूस चक्क चालणं विसरला? जाणून घ्या असं का झालं असेल..

नासाच्या ‘एक्स्पेडिशन ५६’ या अभियानासाठी ‘ए जे फॉयस्टल’ हे तब्बल १९७ दिवस (जवळजवळ ६ महिने) अंतराळात राहिले होते. त्यांनी पृथ्वीवर परतल्यानंतर काही दिवसांनी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओ मध्ये ते चक्क नव्याने चालणं शिकत आहेत.

मंडळी, अंतराळात राहणं आपल्याला मजेशीर वाटू शकतं, पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हे काम अत्यंत कठीण असल्याचं आपल्या लक्षात येईल. फॉयस्टल यांच्या व्हिडीओच्या निमित्ताने आज पाहूयात अंतराळवीरांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं ते !!

अंतराळात झेप घेण्यासाठी पूर्णपणे तयार व्हायला अंतराळवीरांना तब्बल २ वर्षांचा कालावधी लागतो. हे २ वर्ष त्यांच्या अत्यंत कठीण अशा प्रशिक्षणात जातात. जवळजवळ ७ तास पाण्याखाली राहून त्यांना प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यानंतर त्यांना गुरुत्वाकर्षणरहित जागेत सराव करावा लागतो. यादरम्यान त्यांच्या शरीरावर याचा विपरीत परिणामही होऊ शकतो.

स्रोत

प्रत्यक्ष अंतराळात जाऊन आल्यानंतर वेगळ्याच समस्या उद्भवतात. फॉयस्टल यांचं उदाहरण तर आपल्या समोरच आहे. गुरुत्वाकर्षण नसलेल्या वातावरणात फार काळ राहिल्याने पृथ्वीवर पुन्हा चालताना अडचणी येतात. याखेरीज उलट्या, मळमळणे, डोकेदुखी, रक्तदाब, हृदयाच्या कार्यावर परिणाम, तसेच अत्यंत सामान्य गोष्टी करताना अंतराळवीरांना त्रास होतो. बऱ्याच अंतराळवीरांना बोलताना अडचणी येतात. फॉयस्टल प्रमाणे ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ अंतराळात राहिल्यास दृष्टी क्षीण होते.

स्रोत

पृथ्वीवर आपलं शरीर हे सतत गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात काम करत असतं. अंतराळात ही क्रिया बंद पडते. यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांनी बांधलेल्या अंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकात व्यायामाची खास उपकरणे बसवण्यात आली आहेत, जेणेकरून शरीराच्या स्नायुंचं कार्य अंतराळातही सुरळीत सुरु राहावं. अंतराळवीरांनी अंतराळात गेल्यानंतरही दिवसातून किमान २ तास व्यायाम करणे आवश्यक असते.

स्रोत

पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना महत्वाच्या चाचण्यांमधून जावं लागतं. परतल्यानंतर त्यांच्या शरीराच्या कार्यावर झालेला परिणाम तपासला जातो. अंतराळवीरांना पूर्ववत होण्यासाठी काही महिन्यांचा काळ जावा लागतो.

तर मंडळी, अंतराळात यानातून फिरणे रम्य असले तरी त्यासोबत येणाऱ्या समस्याही तेवढ्याच मोठ्या आहेत.

 

आणखी वाचा :

अशी असते अंतराळात टॉयलेटची व्यवस्था !!

सबस्क्राईब करा

* indicates required