computer

हातचलाखीने ढापलेली वस्तू परत देणारे हे सभ्य चोर पोटापाण्यासाठी काय करतात हे खरंच वाचण्यासारखं आहे!!

जगात काहीजण असेही आहेत जे अशा प्रकारे लोकांचं लक्ष विचलित करून, हातचलाखी वापरून त्यांची एखादी वस्तू ढापण्यात कुशल आहेत !.

लक्ष विचलित होणं ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. काम करत असताना फोन, फेसबुक, व्हॉट्सऍप चेक करणं, मीटिंगमध्ये असताना दुसरीकडे पर्सनल चॅट करणं, एखाद्याशी बोलत असताना मनात दुसरेच विचार असणं ही सगळी याचीच उदाहरणं. नेमका याचाच वापर करत अमेरिकेतला अपोलो रॉबिन्स नावाचा चोर लोकांची वस्तू लांबवतो. जग त्याला सभ्य चोर म्हणून ओळखतं. का? तर हातचलाखी करून लांबवलेली वस्तू तो लगेच त्या व्यक्तीला परत देतो.

यामागे त्याचा नक्की काय हेतू असतो?

अपोलो रॉबिन्स हा जगातला सर्वोत्तम पाकीटमार म्हणून ओळखला जातो. २००१ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या सिक्रेट सर्व्हिस एजंट्सवर हा प्रयोग करून कार्टरना आपल्या हातचलाखीची किमया दाखवल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. तो आज त्याच्या कौशल्याचा उपयोग केवळ वाहवा मिळविण्यासाठी करत नाही, तर त्यातून तो एखाद्याचं लक्ष कशा प्रकारे विचलित होतं हे दाखवून देतो. तो व्यक्तीचं लक्ष आपल्याला हवं तिथे वळवून चक्क त्या व्यक्तीच्या अवधानाचा ताबा घेतो आणि हातचलाखी वापरून त्यांची घड्याळं, पाकीटं, ज्वेलरी अशा मौल्यवान वस्तू लांबवतो. त्यांचं लक्ष आपल्याला ताब्यात घेता आलं हे सिद्ध केल्यावर तो या वस्तू परत करून टाकतो.

आता या सभ्य चोराचं करियर काय ?

आता या सभ्य चोराचं करियर काय, तो पोटापाण्यासाठी काय करतो असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याच्या हातचलाखीला व्यावसायिक स्तरावर बरीच डिमांड आहे हं! नुकतंच वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स या प्रॉडक्शन हाऊसने त्याला कन्सल्टंट म्हणून काम दिलं होतं. काम काय, तर त्यांच्या फोकस नावाच्या चित्रपटासाठी त्या चित्रपटात असलेले हातचलाखीचे सीन्स हुबेहूब वठवण्यासाठी मार्गदर्शन करणं. प्रतिष्ठित अशा टेड कॉन्फरन्समध्येही त्याला वक्ता म्हणून मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. थोडक्यात हातचलाखीची ही कला त्याचं जगण्याचं साधन बनली आहे.

जाणिवा पडताळून पहा !

या हातचलाखी किंवा लक्ष विचलित होण्यामागचा एक घटक म्हणजे माणसाच्या जाणिवेच्या मर्यादित कक्षा. कित्येकदा असं होतं की समोर असलेली वस्तूच माणसाला दिसत नाही. हातचलाखीचा प्रयोग करताना तो याच गोष्टीचा वापर करून घेतो. खुद्द रॉबिन्सच्या मते, हातचलाखी किंवा पाकिटमारी हे लोकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठीचं साधन आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने त्याचं अनोखं करिअर मानसशास्त्र या विषयाशी संबंधित आहे. आता तर तो यासंबंधी प्रशिक्षण आणि कन्सल्टन्सी सेवा पुरवतो.

त्याचवेळी रॉबिन्स एका फार महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधू पाहतो. ती म्हणजे आपल्या जाणिवा पडताळून पाहणं, आणि त्यांच्यापलीकडे पाहायला शिकणं.

मानसशास्त्राचे अफलातून फंडे

त्यासाठी तो मानसशास्त्राचे अफलातून फंडे देतो. त्याच्या मते,

वास्तव ही संकल्पनाच मुळात आभासी आहे. आपल्याला जे दिसतं, जाणवतं, ते आपण वास्तव समजतो. पण त्याच वेळी आपल्याला न जाणवलेली गोष्ट प्रत्यक्ष अस्तित्वात असू शकते, तिच्याकडे आपण दुर्लक्ष करतो; तिचं अस्तित्व नाकारतो. त्यावर नेमकं बोट ठेवून रॉबिन्सन लोकांना जाणिवांपलीकडे बघण्याचं, सतत सावध राहण्याचं महत्त्व पटवून देतो.

यामागचं एक कारण म्हणजे आज बाहेर प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मदत उपलब्ध आहे. त्यामुळे आपण बाह्य जगावर जास्तच अवलंबून राहात आहोत. त्यातून अंतर्मनाच्या शक्तीचा पुरेसा वापर आपण करत नाही. उदाहरणार्थ, एक माणूस रस्त्याने जात आहे. त्याला जिकडे जायचंय ती दिशा दाखवणारा बाण रस्त्यावर आहे, समोर चौकात सिग्नल आहे, रस्ता वन वे असल्याने विरुद्ध दिशेने वाहन येणार नाही याची खात्री आहे. थोडक्यात तो अगदी सेफ झोनमध्ये आहे. मग अशा वेळी इकडेतिकडे पाहण्याचे कष्टही तो घेत नाही. आरामात तो मोबाईल बघत चालतो, कारण आजूबाजूच्या परिस्थिती गृहीत धरली जाते. अशा वेळी एखादं संकट अचानक आलं तर त्याचा सामना करायला तो तेवढा सावध नसतो. रॉबिन्सन याच समस्येवर काम करू इच्छितो.

अजून एक अवलिया जेम्स फ्रीडमन

असा अजून एक अवलिया आहे. त्याचं नाव आहे जेम्स फ्रीडमन. तो ब्रिटनमधला प्रख्यात एन्टरटेनर आहे. हातचलाखीचे प्रयोग हा याच्यासाठीही बायें हाथ का खेल आहे. अगदी तुमच्याआमच्या लक्षातही येणार नाही इतक्या बेमालूमपणे तो चोरी करतो. तिकडे त्याला 'मॅन ऑफ स्टील' हेच नाव आहे. त्याचा सल्ला मागण्यासाठी अनेकदा पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणा यांच्याकडून बोलावलं जातं. इतकंच नाही तर २०१५ मध्ये त्याला युकेचा पहिला फ्रॉड प्रिव्हेंशन ऍम्बॅसॅडर म्हणून नेमलं गेलं होतं. त्याने ब्रिटनच्या शाही कुटुंबासमोर आपली कला सादर केली आहे. प्रत्यक्षात पाकिटमारीपासून वाचण्यासाठी लोकांनी काय सावधगिरी बाळगावी याबद्दलही तो मार्गदर्शन करतो. याशिवाय तो चित्रपट, टीव्ही शोज, थिएटर यांसाठी मॅजिकल ऍडव्हायझर म्हणून काम करतो.

हा व्हिडीओ नक्की बघा !

सामान्य जगात निषेधार्ह मानलेल्या चोरी/ पाकिटमारी या क्षेत्रात प्राविण्य मिळवून आपल्या अंगच्या कलेचा असाही उपयोग करणाऱ्या या अवलियांची गोष्ट कशी वाटली? ते अवश्य कळवा.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required