computer

अंतराळात कोरोनासारखा रोग पसरवणारे जंतू आणि विषाणू असतात का??

माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. तो वेळोवेळी वेगवेगळे सिद्धांत मांडत असतो. काही खरे ठरतात, काही दावे अगदी हास्यास्पद ठरतात आणि बर्म्युडा ट्रँगलसारख्या काही गोष्टी कायमचं रहस्यमय गूढ बनून राहतात. या वैचारिक भूमिकेमुळे माणूस नैसर्गिक आपत्तींचा सबंध निसर्गाच्या इतर अनेक घडामोडींशी जोडणं हा मानवी स्वभाव आहे. उदाहरणार्थ सूर्य अथवा चंद्र ग्रहणाचा संबंध त्या ग्रहणानंतर येणार्‍या आपत्तींशी जोडला जातो. तसे पाहिले तर निव्वळ अशास्त्रीय संबंध जोडून मनाचे समाधान करून घेणे या पलीकडे या तर्कांना फारसे महत्व नसते. पण काही वेळा हे सत्य असू शकेल इतपत संख्यात्मक पुरावे पण हाताशी येतात. 

आता सध्याच्या परिस्थितीचा आपण विचार करू या. हे कोविडचे विषाणू आले कुठून? तर त्याला निश्चित उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे ते अमुक एका देशाने बनवले असतील आणि नंतर प्रकरण हाताबाहेर गेल्याने संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे अशी बर्‍याचजणांची ठाम समजूत असेल. याला कॉन्स्पिरसी थिअरी असे म्हणण्यापलीकडे काहीच महत्व नाही.

शास्त्रज्ञांना पण असेच प्रश्न बुचकळ्यात टाकतात. ते त्याची शास्त्रीय उत्पत्ती शोधतात. काहीवेळा शक्यतेच्या सीमारेषेपर्यंतही ते पोहचतात. तर विषाणू आले कुठून हा प्रश्न जेव्हा त्यांना पडला, तेव्हा त्यांनी संशोधनाची दिशा बदलून बघितली. त्यातून एक नवीन शक्यता त्यांना दिसली की आपल्याला वेठीस धरणारे हे व्हायरस कदाचित अंतराळातून आले असावेत. म्हणजे पृथ्वीच्या बाहेरून, अवकाशातून, ब्रह्मांडाच्या कुठल्यातरी अनोळखी कोपर्‍यातून हे विषाणू आले असावेत. या शास्त्रज्ञांमध्ये हॉयल आणि विक्रमसिंघे या शास्त्रज्ञांनी बरेच कार्य केले आहे. आजच्या लेखात त्यांच्या आणि त्यांच्या सिध्दांताचा पाठपुरावा करणार्‍या अनेकांचे विचार काय आहेत ते वाचू या!!

आकाशातून आपल्यापर्यंत संकटे येऊन पोहचतात. धूमकेतू ही संकटे आणतात ही संकल्पना माणसाच्या मनात फार पूर्वीपासून आहे. चीनमध्ये Mawangdui silk नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे. त्यात २९ धूमकेतू  वेगवेगळी २९ संकटे घेऊन आले याची नोंद आहे. म्हणजे ही संकल्पना तशी काही नवी नाही. सोबत दिलेले चित्र बघा. पण आपण यावर पूर्ण विश्वास न ठेवता तीन टप्प्यांत या प्रश्नाचे उत्तर शोधूया! 

पहिला टप्पा : अंतराळात जंतू आणि विषाणू असतात का?
दुसरा टप्पा: धूमकेतू किंवा इतर अंतराळातील घडामोडी  जबाबदार आहेत का? 
तिसरा टप्पा : सध्या कोणते धूमकेतू आपल्याजवळ आहेत का?

पहिला टप्पा : अंतराळात जंतू आणि विषाणू असतात का?

अनेक सूक्ष्मजंतू वातावरणाच्या वरच्या थरात म्हणजे मेसोफिअरमध्ये आढळून येतात. मेसोफिअर महणजे पृथ्वीपासून ५० ते ८० किलोमीटर अंतरापर्यंत असलेला वातावरणाचा थर. काही संशोधकांच्या मते ४१ ते ७७ किलोमीटर पर्यंतच्या थरात हे जंतू जिवंत अवस्थेत असतात. त्यांना रेडिएशनचाही त्रास होत नाही. त्या वातावरणात प्राणवायू पण नसतो आणि तापमान -८५ डिग्री सेल्सिअस इतके असते. अशा बिकट वातावरणातही हे जंतू तिथे अस्तित्व राखून असतात. याच वातावरणाच्या थरातून उल्का जेव्हा पृथ्वीकडे कोसळतात तेव्हा त्यांचे तुकडे होत असतात. आता हे जंतू त्या उल्कांच्या अशनीमधून पृथ्वीवर येऊन कोसळतात का? हा मोठा प्रश्न आहे. पण त्याहून मोठा प्रश्न असा आहे की मुळात हे जंतू मेसोफिअरमध्ये आले कुठून? आधी पडलेल्या उल्का येताना त्यांना सोबत घेऊन आल्या की पृथ्वीच्या प्रतलावरून हे जंतू मेसोफिअरमध्ये भिरकावले गेले आहेत?

आता यावर शास्त्रज्ञांनी बरंच संशोधन केलं आहे. त्यांनी वादळे, ज्वालामुखीचे स्फोट, मान्सूनचे वारे, यांसारख्या नैसर्गिक गोष्टींमधून किंवा बोलाइड इफेक्ट म्हणजेच सोप्या भाषेत उल्काप्रपातामुळे जंतू अंतराळात पोचतात का? याचा अभ्यास केला. वेनराईट, शिल्ड, जोसेफ, विक्रमसिंगे आणि हॉयल*  या शास्त्रज्ञांचे असे मत आहे की व्हायरस अंतराळातून मेसोफीअरमधून येतात. त्यानंतर मेसोफीअरमधल्या जंतूंमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे या जंतूंचे मूळ स्वरुप बदलते, त्याला शास्त्रीय भाषेत जेनेटीक एरर म्हणतात.

अशा बदललेल्या नव्या जंतूंमुळे नवीन रोग पृथ्वीवर पोहचतात. तरीपण हे लक्षात घ्यायला हवं की व्हायरस किंवा मेसोफीअरमधले जंतू या दोन्हींना अल्ट्राव्हायोलेट किरणांना सामोरे जावे लागते, सूर्यावर होणार्‍या काही बदलांचा पण या जंतूंवर परिणाम होऊ शकतो आणि या सगळ्या प्रकारात त्यामुळे त्यांच्यात म्युटेशन होते. म्युटेशन म्हणजे त्यांच्या गुणसूत्रात बदल होतात, या बदलांचा ठराविक असा पॅटर्न नसतो आणि ते कधी चांगले बदल असू शकतात तर कधी अत्यंत वाईटही असू शकतात. या म्युटेशनमध्ये हानी पोहचलेले जंतू पृथ्वीवर आले की ते आधी वनस्पती आणि प्राणी यांच्या अंतरंगात जातात. अर्थात या नंतर आपला, म्हणजे मानवाचा नंबर लागतो. (माहिती स्रोत:  वेनराईट).

उदाहरणार्थ १९१८ च्या फ्लूच्या साथ कशी आली ते बघा. बाहेरून येणार्‍या विषाणूंमुळे आधीच अस्तित्वात असलेल्या विषाणूंच्या जनुकात म्हणजेच त्यांच्या जीन्समध्ये बदल घडून आले आणि नव्या प्रकारचा विषाणू तयार झाला. या नव्या विषाणूंनी सुरुवातीला हवेतल्या पक्षांना ग्रासले. त्यानंतर त्याची लागण मानवाला झाली. परिणामी फ्ल्यूच्या त्या साथीत कोट्यावधी लोक मरण पावले.

तर अशा प्रकारे शास्त्रज्ञ अनेक वेगवेगळे विचार मांडत असतात. ते विचार प्रत्यक्ष कसोटीवर घासून जो अनुभव प्रत्यक्ष परिस्थितीसोबत जोडला जाऊ शकतो त्यावरून अनुमाने बांधण्याची जागा तयार होते. इसवी सन १३३४ ते १३५० दरम्यान उफाळालेल्या ब्लॅकडेथच्या (प्लेगच्या) साथीचा अभ्यास करताना मांडलेल्या तर्कांमधून लक्षात आले की उंदिर किंवा तत्सम प्राण्याच्या अंगावरच्या पिसवांमुळे रोग पसरला. पण पिसवांपर्यंत हा रोग कसा पसरला  अंतराळातून हे विषाणू जमिनीवर पोहचले हे सिध्द करताना शास्त्रज्ञांनी असे सिध्द केले आहे की वाहतुकीच्या मार्गांनी हा रोग पसरला नाही, काही ठिकाणी तर हा रोग पोहचलाच नाही. म्हणजेच तो प्रसार वार्‍याच्या माध्यमातून झाला होता. त्यामुळे त्या रोगाला पिसवा जबाबदार  नसून पिसवांवर अवकाशातून जंतूंनी आक्रमण केले असावे या विचाराला पुष्टी मिळते. (माहिती स्रोत: हॉयल आणि विक्रमसिंघे)

या विचाराचे पुष्टीकरण करताना देवीच्या साथीचा अभ्यास देखील जगासमोर मांडण्यात आला. देवीचा रोग म्हणजे स्मॉल पॉक्स विषाणूंमुळे होतो. हा रोग पण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंमुळे पसरतो. पण या रोगाचं वैशिष्ट्य असे आहे की ही साथ येते आणि गायब होते. या गायब होण्याला (stasis) असे म्हणतात. हा शांततेचा काळ काही शतकांचा पण असू शकतो. त्यामुळे देवीच्या व्हायरसाचा इतिहास बघितला तर तो असा आहे.

१२,००० वर्षांपूर्वीच्या इतिहासात या साथीचा उल्लेख आहे. भारतात ख्रिस्तपूर्व १५०० तर चीनमध्ये ख्रिस्तपूर्व ११०० या वर्षांत ही साथ आल्याचे आढळते. त्यानंतर शतकानुशतके तिचे येणे-जाणे-गायब होणे हे प्रकार चालू होते. जेव्हा या विषाणूच्या मॉलिक्यूलर क्लॉकचा अभ्यास केला गेला गेला तेव्हा असे आढळून आले हा विषाणू १६,००० वर्षांपूर्वी पण अस्तित्वात होता. या विषाणूच्या जनुकसंरचनेप्रमाणे दोन वेगवेगळ्या प्रजाती पृथ्वीवर टिकून आहेत.  १६,०००वर्षांइतक्या कालावधीत अतिशय बिकट हवामान, वेगवेगळ्या प्रकारच्या विकिरणांना तोंड देत, पाण्याशिवाय, हवेशिवाय केवळ पृथ्वीच्या बाहेरून आलेले विषाणूच जगू शकतात.

आता हे सर्व आम्ही सर्वांसाठी मराठीत अनुवादित केले आहे. अभ्यासूंसाठी मूळ वाक्यही इथे देत आहोत:

Given the ancient history of the small pox virus and its radiation, dehydration, and cold temperature resistant genome, coupled with the periodicity of its infection cycles, there is thus good reason to suspect this virus originated in space.  

हे इथंच संपत नाही मंडळी. ही फक्त सुरुवात आहे. धूमकेतूंनी झाडलेल्या पायधूळीतून अवकाशातील  व्हायरस पृथ्वीवर येतात का? यावरही संशोधनही झालं आहे. त्याचे निष्कर्ष काय आहेत वाचा या लेखमालेच्या दुसऱ्या भागात.

धूमकेतूंनी झाडलेल्या पायधूळीतून अवकाशातील व्हायरस पृथ्वीवर येतात का ?

सबस्क्राईब करा

* indicates required