computer

२०२२ सालचे फोर्ब्स 30 under 30!! पाहा या युवापिढीची गरूडझेप !! भाग १

आजची तरुण पिढी म्हणजे आळशी आणि फक्त मोबाईलमध्ये घुसलेली असा सूर सगळीकडे ऐकायला मिळतो. मोबाईलमध्ये घुसून गेम्स खेळणे आणि गप्पा मारणे. फोटो ,व्हिडीओ काढणे एवढ्याच गोष्टी मुलं करतात का? खरंतर ही नाण्याची एकच बाजू आहे.आज जग झपाट्याने बदलत आहे. नवनवीन टेक्नॉलॉजीचा आविष्कार होत आहे. आजची हुशार तरुणाई शिकून मिळालेल्या संधीचे सोने देखील करत आहे. आपापले कौशल्य दाखवून यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करत आहे. Quick and fast अशी ही पिढी आहे. आपल्या मेहनतीच्या, कल्पकतेच्या जोरावर आपले अस्तित्व सिद्ध करत आहे. म्हणूनच फोर्ब्स इंडियाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. फोर्ब्स 30 under 30 २०२२ची यादी जाहीर झाली आहे. आणि त्यात आपली भारतीय युवकांनी वर्चस्व सिद्ध केले आहे.

आपण या लेखमालिकेद्वारे थोडक्यात त्यांची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून घेऊया...

१ .शिव पारेख, संस्थापक - hBits

शिव पारेख ह्यांनी आपल्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंटमधील अनुभवाच्या जोरावर काळानुसार पावले उचलली. त्यांनी भारतात प्रथमच fractional ownership (अंशतः मालकी हक्क) ही संकल्पना आपल्या कंपनीमध्ये राबवली. Hbits मालमत्तेचा शोध घेण्यापासून, संपूर्ण कार्यपद्धत समजून घेणे, नंतर अंतिम पेपरवर्क आणि पोर्टफोलिओचा अभ्यास हे सर्व डिजिटली करते. व्यावसायिक रिअल इस्टेटमधील गुंतवणूक करून त्यांनी अनेक कार्यालये भाड्याने दिली आणि तेही कमी किंमतीत! २०१९ मध्ये कंपनीने सुरुवात करून आतापर्यंत ८० करोडच्या पाच मोठ्या प्रोजेक्टसमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांचे ६५ टक्के गुंतवणूकदार भारतीय आहे,त तर बाकीचे अनिवासी भारतीय आहेत. शिव पारेख या नावाचा आता एक विश्वासू ब्रंड निर्माण झाला आहे.

२. सम्यक जैन आणि सौम्य जैन, सहसंस्थापक - Instadapp Labs

२०१८ मध्ये सौम्य आणि सम्यक ह्या जैन बंधूंनी कॉलेज मधून बाहेर पडल्यावर InstaDapp ची स्थापना केली. हे दोघेही काहीतरी वेगळे सुरु करावे म्हणून धडपडत होते. २०१८ मध्ये त्यांना मार्ग मिळाला आणि त्यांनी हे app सुरु केले. InstaDapp हे ब्लॉकचेनवर आधारित असे फायनान्स प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही वित्तीय सेवा एका tap वर वापरता येते. तसेच कर्ज घेणे आणि पैसे देणेही सोपे होऊन जाते. वेगवेगळ्या बचत खात्यांमध्ये तुमचे कर्ज असेल तर ते हलवणे ही या app मुळे शक्य आहे. उदा. जर तुम्हाला तुमचे कर्ज HDFC बँक खात्यातून तुमच्या ICICI बँक खात्यात हलवायचे असेल, तर तुम्ही ते सहजासहजी करू शकत नाही, परंतु Instadapp च्या साहाय्याने फक्त एका tap ने सगळे कनेक्ट करता येते. सध्या रँकिंगमध्ये Instadapp जगभरातील पाचवी सर्वात मोठी संस्था आहे.

3.लविका अग्रवाल आणि सजल खन्ना - अकुडो

२०२० मध्ये अग्रवाल आणि खन्ना यांनी जगवीर गांधी यांच्यासोबत अकुडोची स्थापना केली. या दोघांनीही रूरकी आयआयटी येथून पदवी घेतली पण मोठ्या पगाराच्या नोकरीमागे न धावता अकुडोची स्थापना केली. किशोरवयीन मुलांना बँकिंग क्षेत्राची माहिती तसेच आर्थिक देवाणघेवाण, पैशांचं महत्व आणि बचत यासाठी अकुडो काम करते. अकुडोचा जागरूक किशोरवयीन मुलांचा समुदाय तयार करण्याचा मानस आहे की जेणेकरून ते आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम होतील. पर्यायाने देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल. एका अहवालानुसार २०२१ पर्यंत अकुडोमधे १ लाखांहून अधिक ग्राहक जोडले गेले आहेत. तसेच रोज नवीन ग्राहक जोडले जात आहेत.

४.रोहन नायक - पॉकेट एफएम

डिजिटल platform मुळे अनेकजण ऑडीओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून मनोरंजकपद्धतीने शिक्षण देत आहेत. नायक यांनीही अनेक विषयांवर सहसंस्थापक निशांत केएस आणि प्रतीक दीक्षित यांच्यासोबत आठ भाषांमध्ये १ लाख तासांहून अधिक लाँगफॉर्म व्हिडिओ तयार आणि प्रसारित केले आहेत. त्यांना गुडवॉटर कॅपिटल, टँगलिन व्हेंचर आणि लाइटस्पीड इंडिया पार्टनर्स असे गुंतवणूकदार मिळालेआहेत. त्यांचे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत कंपनीला $९४ मिलीयन (₹७,३५५,२१८,७५२) इतके योगदान दिले आहे.

५. त्रिनेत्र हलदर गुम्माराजू, कंटेट क्रिएटर

कर्नाटकातील एका सामान्य घरात जन्माला आलेले त्रिनेत्र यांना पहिल्यांदा आपल्या शरीरात स्त्री असल्याची जाणीव झाली तेव्हा घरात आणि समाजात त्यांची खिल्ली उडवली गेली. परंतु एक किन्नर काय करू शकतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले. पहिली किन्नर डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. त्या सोशल मीडियाचा वापर करून किन्नर समाजाच्या जागृतीसाठी उन्नतीसाठी लढत आहेत. त्यांचे प्रश्न आणि त्यावर उपाय त्या या माध्यामतून मांडत आहेत. त्यांचे इंस्टाग्रामवर २५ लाखांहून जास्त followers आहेत. केवळ २४ व्या वर्षी त्यांनी फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवून जगाला दाखवून दिले आहे की "Nothing is impossible..The word itself says I m possible”. त्यांचा प्रवास अनेकांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.

आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा,

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required