computer

पापण्यांची उघडझाप तुमच्याबद्दल काय सांगत असते ?? जाणून घ्या विज्ञानाचं उत्तर !!

नुकतंच येऊन गेलेल्या सिम्बा चित्रपटातलं ‘आख मारे’ हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. हाच आपला आजचा विषय आहे. डोळा मारणे नाही ओ. पापण्यांची उघडझाप. 

तर, डोळा मारणे ही क्रिया पापण्यांनी होणाऱ्या अनेक पद्धतीच्या संपर्काचाच एक भाग आहे. ‘न बोलता कळले सारे’ प्रकारच्या गोष्टी याच क्रियेत मोडतात. ती म्हण तर तुम्ही ऐकलीच असणारच, ‘तोंड खोटं बोलत असलं तरी डोळे कधीच खोटं बोलत नसतात’. या म्हणीत जर तथ्य असेल तर डोळ्यांच्या या खरेपणात पापणीचा फार मोठा वाटा असतो. नुकत्याच झालेल्या एका परीक्षणात पापण्यांची उघडझाप क्रियेबद्दल नवीन रंजक माहिती मिळाली आहे. चला तर जाणून घेऊ या.

पापण्यांची उघडझाप का होत असते याचं सोप्पं उत्तर आहे बुबुळांना कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी. प्रत्येक उघडझापीने एक विशिष्ट स्राव बुबुळावर पसरतो. हा स्राव डोळ्यांचा ओलावा राखण्यासाठी मदत करतो. या क्रियेबद्दल एक मजेशीर गोष्ट म्हणजे नवजात मुलांच्या पापणीची उघडझाप फारच कमी वेळा होत असते, पण जसजसे आपण मोठे होते त्यासोबत पापण्यांची उघडझाप वाढत जाते. मोठ्यांमध्ये ही क्रिया दिवसातून तब्बल १३,५०० वेळा होत असते. एका मिनिटात १० वेळा पापण्यांची उघडझाप होते.

पण पापण्यांचा काय एवढाच उपयोग असतो का ? तर नाही !! पापण्या आणि आपले हावभाव हातात हात घालून चालत असतात. पापण्यांची उघडझाप ही केव्हाही एकाच लयीत होत नसते. वेळोवेळी त्यात बदल होत जातो. या बदलांचा पण नक्की एक अर्थ असतो.

वैज्ञानिक परीक्षणातून असं सिद्ध झालंय की पापण्यांची सर्वाधिक उघडझाप ही संभाषणाचा वेळी होत असते. भावनिकरीत्या उत्तेजित क्षणी ही उघडझाप वाढते.

या उघडझापीचे नक्की अर्थ काय आहेत ?

पापण्यांची उघडझाप ही क्रिया एक प्रकारे संपर्काचं साधन म्हणून काम करत असते. जसे की दोन मित्र बोलत असतील तर एकाचं बोलणं झाल्यानंतर त्याच्या पापण्यांची एकदा उघडझाप होते. ज्याचा अर्थ असतो ‘आता तुझ्या बोलण्याची वेळ आहे.’ किंवा हीच क्रिया समोरच्याच बोलणं समजल्यानंतर होते. याचा अर्थ पापण्यांचा सरळ संबंध आपल्या हावभावांशी आहे. 

आता समजून घेऊ या संभाषणातील पापण्यांच्या धीम्या आणि जलद हालचालींचा नेमका अर्थ काय होतो ते.

पापण्यांची उघडझाप जलद आणि धीम्या पद्धतीनी होत असते. या दोन्ही पद्धतीचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनात सामील ३५ लोकांना स्क्रीनवरील २ खोट्या व्यक्तींकडून काही प्रश्न विचारण्यात आले होते.

संभाषण सुरु असताना स्क्रीनवरील व्यक्ती ठराविक वेळेने पापण्यांची उघडझाप करत होती. या क्रियेचा बोलणाऱ्याच्या उत्तरांवर परिणाम झालेला दिसून आला. ज्या स्क्रीनने पापण्यांची जलद हालचाल केली ते संभाषण अधिक काळ चालत राहिलं, पण ज्या स्क्रीनने धीम्या गतीने पापण्यांची उघडझाप केली ते संभाषण लवकरच आटोपण्यात आलं.

याचे सोप्पे अर्थ निघतात. जलद गतीने पापण्यांची हालचाल म्हणजे समोरच्याच म्हणणं समजून घेत असल्याची क्रिया, तर वेळ घेऊन केलेली, धीम्या पद्धतीची उघडझाप म्हणजे समोरच्याच म्हणणं पूर्णपणे समजलं असल्याचा इशारा.

तर मंडळी, अशा प्रकारे सुरुवातीलाच दिलेल्या म्हणी प्रमाणे आपण डोळ्यांनीच समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातल्या गोष्टी सांगत असतो. 

हा लेख वाचत असताना कितीवेळा तुमच्या पापण्यांची उघडझाप झाली ? तुम्ही लक्ष दिलं का ?

 

 

आणखी वाचा :

आपला डोळा किती मेगापिक्सल असतो ?? माहित आहे का भाऊ !!

सबस्क्राईब करा

* indicates required