computer

आता इस्राइल चक्क आपल्या सैनिकांना गायब करू शकणार? हे नवीन धमाकेदार तंत्रज्ञान पाह्यलत का?

इस्राइल देशाचे सैन्य अतिशय आधुनिक आहे. जगातल्या प्रगत देशांना टक्कर देऊ शकेल अशा प्रकारची युद्धसामग्री या देशाकडे आहे. वेळोवेळी त्यात भर पडत असते. काही दिवसांपूर्वी इस्राइल पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान इस्राइलने उभ्या केलेल्या आयर्न डोमची जगभर चर्चा झाली होती. आता त्यांनी सैनिकांना चक्क गायब करणारी प्रणाली विकसित केली आहे.

इस्राइलच्या संरक्षण मंत्रालयाने इस्राइलमधील एक कंपनी पोलारीस सॉल्युशन्ससोबत मिळून असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे इस्रायली सैनिक वर्चुअली गायब होऊ शकतात. म्हणजे ते काय कुणाला खरोखर गायब नाही करणार, पण शत्रुसैन्याला सैनिक दिसणार नाही याची पुरेशी सोय करण्यात येणार आहे.

या तंत्रज्ञानाला 'किट 300' नाव देण्यात आले आहे. तसेच यात थर्मल व्हिज्युअल मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. यासाठी धातू, मायक्रोफायबर आणि पॉलीमरचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जखमी सैनिकांना वेळीच उपचारासाठी नेता यावे म्हणून या कीटला हलक्या स्ट्रेचरमध्ये पण बदलता येणार आहे. 

या किटचा रंग देखील इस्रायली डोंगरांमधील दगडांसारखाच असल्याने शत्रूसैन्याच्या डोळ्यात सहज धूळ फेकता येणार आहे. हे आवरण शरीराला चारी बाजुंनी गुंडाळता येईल अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हे असे सुरक्षा कवच आहे ज्याचा वापर केल्यावर समोरच्या सैनिकांना दुर्बीण वापरून पण समोर दगड आहे की इस्राइली सैनिक याचा पत्ता लागणार नाही.

या आवरणाचे वजन हे फक्त 500 ग्रॅम आहे. इस्राइल सैन्याने याचे परीक्षण पण उरकले असून लवकरच ते सैन्यात सामील करण्यात येणार आहे. किट 300 डबल साईडेड आहे. तसेच त्याला दोन्ही बाजूने वेगवेगळे रंग आहेत. एका बाजूचा उपयोग हा दाट जंगलांमध्ये केला जातो तर दुसऱ्या बाजूचा उपयोग हा डोंगराळ प्रदेशात केला जातो. 

पोलारीस सॉल्युशन्सचे संस्थापक आसफ यांना २००६ साली लेबनॉन युध्दाच्या वेळी या प्रकारचे आवरण तयार करण्याची आयडिया आली होती. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आपले सैनिक हे शत्रूच्या थर्मल इमेजिंग उपकरणांपुढे पुरेसे सुरक्षित नाहीत. त्यानंतर ते कामाला लागले आणि शेवटी आता त्यांना यश आले आहे. इस्राइल आता हे तंत्रज्ञान अमेरिकेला पण विकण्याच्या तयारीत आहे.

तर वाचकहो, युद्ध आणि तंत्रज्ञान जेव्हा हातात हात घालून चालतात तेव्हा काय निर्माण होऊ शकते याचे इस्राइल हे एक उत्तम उदाहरण आहे, असे म्हणायला हरकत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required