computer

वाचा कितीवेळ कोणत्या तीव्रतेचा आवाज ऐकल्याने बहिरेपणा येऊ शकतो!! आवाजाची तीव्रता अशी मोजतात हे ही पाहा..

"ओरडू नको! कान फुटले नाहीत माझे.."

"अरे त्या हेडफोनला आणि कानांना जरा विश्रांती दे. तिशीतच बहिरा होशील."

"कान किटले बुवा यांच्या डीजेवरची गाणी ऐकून"

हे घरोघरी ऐकू येणारे संवाद. सगळ्यांचा संबंध आहे कानांशी आणि त्यावर पडणाऱ्या विविध आवाजांशी. पण आवाज हवासा किंवा नकोसा वाटतो तो कशामुळे? किंवा तो कसा मोजतात? हे तुम्हाला माहित आहे का? ते आता या लेखातून बघू.

एखादा आवाज कर्कश्श, कानठळ्या बसवणारा, किंवा तापदायक वाटतो, दुसरा ऐकत राहावासा वाटतो. हे असं नक्की कशामुळे होतं? तर यामागे बरेच घटक आहेत. मुख्यतः त्या आवाजाची वारंवारता, पट्टी, तो आवाज किती काळ टिकतो आणि आपल्याला तो कुठल्या वातावरणात ऐकू येतो यावर बरंच काही ठरतं. शिवाय आवाजाची पातळी, जिला आपण व्हॉल्यूम म्हणतो, तिचाही आवाजाच्या दर्जाशी संबंध असतो.

कधीतरी डेसिबल हा शब्द तुमच्या कानावरून गेला असेल. डेसिबल हे ध्वनीची तीव्रता मोजण्याचं परिमाण म्हणजेच एकक. या डेसिबल शब्दातला बल/बेल आलाय तो अलेक्झांडर ग्राहम बेल या शास्त्रज्ञाच्या नावावरून. या संशोधकाने टेलिफोन आणि ऑडिओमीटर या दोन उपकरणांची जगाला देणगी दिलेली आहे. यातलं ऑडिओमीटर हे उपकरण व्यक्ती एखादा आवाज किती चांगल्या प्रकारे ऐकू शकते हे मोजण्यासाठी वापरतात. त्याचा वापर मुख्यतः श्रवणदोषाचं निदान करण्यासाठी केला जातो.

या डेसिबलची गंमत अशी की नेहमीच्या वापरातल्या इतर एककांपेक्षा हे वेगळं आहे. कसं ते बघू. मीटर हे लांबी किंवा उंची मोजण्याचं एकक आहे. समजा एखादी इमारत दहा मीटर उंच आहे. आता यामध्ये अजून दोन मीटर वाढवले तरी बघणाऱ्याला त्या उंचीमध्ये फारसा फरक जाणवणार नाही. पण डेसिबलच्या बाबतीत असं नाही. म्हणजे असं, की ५० डेसिबेलमध्ये केवळ पाच डेसिबेल वाढवले तरी आवाजाची तीव्रता एकदम दुपटीने वाढते. म्हणजेच एवढ्याशा डेसिबलमुळे मिळणारा परिणामही फार मोठा असतो.

हे डेसिबल आवाजाची तीव्रता किंवा पातळी मोजण्यासाठी वापरतात, पण आपल्या कानाची रचना अशी आहे की तो सर्व प्रकारच्या आवाजांना सारखा प्रतिसाद देत नाही. आपल्या कानाच्या अंतर्भागात गोगलगायीसारखा दिसणारा कॉक्लिया नावाचा भाग असतो. निसर्गात निर्माण होणारे सर्व प्रकारचे आवाज आपल्याला ऐकू येत नाहीत, हे आपण शाळेत शिकलेलो आहोत. ज्या आवाजाची वारंवारता २० हर्ट्झ ते २०,००० हर्ट्झ या रेंजमध्ये असते, तेवढेच आवाज मानवी कान ऐकू शकतो. कॉक्लिया या वारंवारतेमध्ये असलेल्या आवाजांना प्रतिसाद देऊ शकतो. पण २० हर्ट्झ पेक्षा कमी आणि २०,००० हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारता असलेल्या आवाजाला प्रतिसाद देऊ शकत नाही.

डेसिबल हे परिमाण शून्यापासून सुरू होतं. शून्य डेसीबेल हा मानवी कान ऐकू शकेल असा सगळ्यात मृदू आवाज. धाप लागल्यावर श्वासोच्छवास करताना जो आवाज येतो तो दहा डेसिबेल इतका असतो, तर सामान्य पट्टीतल्या बोलण्याचा आवाज ६५ डेसिबेलच्या घरात असतो.

आवाजासाठी अजून एक एकक आहे डीबीए. हे एकक डेसिबलप्रमाणेच आहे. विविध आवाजांप्रति मानवी कान किती संवेदनशील आहे हे याच्यावरून समजतं, आणि श्रवण दोष आणि त्यावरचे उपचार यांच्यातही त्याची भूमिका आहे.
डीबीए लेव्हलमध्ये थोडीशी वाढ झाली तरी त्याचा कानावर फार मोठा परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, ८५ डीबीएचा आवाज आठ तास तुमच्या कानावर पडला तर श्रवण दोष निर्माण होण्याची शक्‍यता असते. १०० डीबीएचा आवाज फक्त पंधरा मिनिटं कानावर पडला तर कानाचं नुकसान होतं.. तुलना करून पाहिली तर श्रवणदोष निर्माण होण्यासाठी ८५ डीबीएचा आवाज आठ तास कानावर पडावा लागतो, तर १०० डीबीएचा आवाज केवळ १४ मिनिटं. हे प्रमाण जर ११० डीबीए असेल तर बहिरेपणा यायला फक्त दोन मिनिटं पुरतील.

आपल्या आजूबाजूचे इतके आवाज आपल्या कानावर आदळत असतात. मग जास्त तीव्र असलेल्या आवाजापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं? यासाठी काही ॲप्स आहेत, ती वापरून विविध आवाज किती तीव्रतेचे आहेत हे समजू शकतं. NIOSH SLM हे असंच एक ॲप आहे ज्याच्या आधारे ० डीबीए पासून १४० डीबीएपर्यंतच्या आवाजांचं विश्‍लेषण केलं जातं. हे ॲप वापरताना फक्त थोडी काळजी घ्या, तुमच्या फोनचा व्हॉल्युम कमी ठेवा, आवाजाच्या स्रोतापासून शक्य तितके दूर राहा आणि शक्य असल्यास हियरिंग प्रोटेक्टरचा वापर करा.
या ॲपच्या वापराने निदान काही लोकांना तरी श्रवण दोषापासून मुक्ती मिळेल ही अपेक्षा.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required