computer

१९२३मध्ये सैबेरियाच्या खडतर मोहिमेतून ही एकटीच जिवंत परतली.. बेटावर असताना जिवंत राहण्यासाठी तिला काय काय करावं लागलं?

ॲडा ब्लॅकजॅक हे नाव इतिहासात फारसं कुठे आढळत नाही. आपणा भारतीयांना तर ते माहीत असण्याचा संभवही नाही. याचं कारण इतिहासात नाव कोरलं जाण्यासाठी रूढार्थाने जे काही करावं लागतं तसलं काहीही या स्त्रीच्या खात्यावर जमा नाही. ना ती कुठल्या युद्धाची नायिका आहे, ना तिने मानवजातीचं कल्याण होईल असा कुठला शोध लावला आहे, ना तिच्या कलाविष्काराने जगाचे डोळे दिपलेत. पण म्हणून तिची कामगिरी दुर्लक्ष करता येण्यासारखीही नाही. आपला जीव वाचवण्यासाठी आणि आपल्या मुलाकडे परतण्याच्या ओढीपायी तिने जे काही केलं ते सामान्यातल्या असामान्यत्वाची झलक दाखवणारंच आहे!

प्रस्तावना न वाढवता थेट विषयाकडे वळू.

ॲडा ब्लॅकजॅक हीची एका वाक्यात ओळख करून द्यायची तर एका दुर्गम प्रदेशाच्या अत्यंत खडतर मोहिमेवर गेलेल्या चमूमधली जिवंत परतलेली ती एकमेव स्त्री होती. अर्थातच तिने त्यासाठी निकराची झुंज दिली होती, टोकाचा संघर्ष केला होता. त्याआधी १९२१ मध्ये ती या मोहिमेमध्ये अनपेक्षितरित्या सहभागी झाली होती. या मोहिमेत तिला शिवणकाम करणारी स्त्री म्हणून निवडलं गेलं होतं.

सैबेरियाच्या उत्तर दिशेला असलेल्या रॅंगल आयलंड नावाच्या संपूर्ण बर्फाच्छादित प्रदेशात ही मोहीम चालणार होती. या मोहिमेमध्ये अतिशय खडतर अशा हवामानात आणि दुर्गम प्रदेशात टिकून राहण्यासाठी जी साधनं किंवा सर्व्हायव्हल गियर्स वापरली जातात, त्यांचं शिवणकाम आणि दुरुस्ती करणं हे तिचं मुख्य काम असणार होतं. तिच्याबरोबर चार पुरुष सहकारी होते आणि व्हिक्टोरिया ऊर्फ व्हिक नावाची एक मांजरी होती. या मोहिमेत तिला एक वर्षाच्या करारावर सहभागी करून घेतलं गेलं होतं. तिला व्यवस्थित खायला प्यायला मिळेल आणि आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाईल अशी हमी देण्यात आली होती.

मोहीम सुरू झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी जेव्हा एका जहाजाने तिची सुटका करण्यासाठी त्या बेटाचा किनारा गाठला तेव्हा मात्र परिस्थिती संपूर्ण बदललेली होती. त्या चमूमधल्या केवळ ॲडा आणि व्हिक ही मांजर अशा दोघीचजणी जिवंत राहिल्या होत्या. खडतर हवामानाने इतर सर्वांचा बळी घेतला होता. या दोन वर्षांच्या काळात ॲडाने अख्खं आयुष्य पुरून उरतील इतके विविध अनुभव घेतले होते. निसर्गाच्या नाना काळा पाहिल्या होत्या. जिवंत राहण्यासाठी पूर्वी कधीही न केलेल्या अनेक गोष्टी केल्या होत्या. उपासमारीपासून वाचण्यासाठी ती शिकार करायला, सापळे लावायला शिकली होती. ज्या पोलर बेअरची तिला आधी प्रचंड भीती वाटायची त्याची ती आता बऱ्यापैकी सराईतपणे शिकार करू शकत होती. दोन वर्षांपूर्वीपर्यंत लहानखुरी, नाजूक चणीची, काहीशी भित्री असलेल्या ॲडाचं हे बदललेलं रूप आश्चर्यकारक होतं. रेनडीयरच्या कातडीपासून शिवलेला कोट तिने सुटकेच्या वेळी परिधान केला होता. तो कोट घालून सुटकेसाठी आलेल्या माणसांकडे ती धावली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आविर्भाव होता.

ॲडाचा जन्म अलास्कामध्ये इनूपियाट जमातीत झाला. अलास्कामध्ये जन्म घेऊनही शिकार किंवा जंगलात वावरण्यासाठी आवश्यक कौशल्यं यांच्यापैकी ती काहीही शिकली नाही. उलट मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये जाऊन ती इंग्रजी शिकली, तेही बायबल वाचता येईल इतपतच. घरकाम, स्वयंपाक, शिवणकाम या गोष्टीही शिकली. पुढे लग्न झालं. तीन मुलंही झाली. पण एकच मूल जगलं. पुढे कधीतरी नवऱ्याने तिला सोडलं. ॲडा त्यावेळी आपल्या पाच वर्षांच्या आजारी मुलाला घेऊन मूळ गावी पोहोचण्यासाठी सुमारे ४० मैल अंतर चालत निघाली होती. त्यावेळी तिचा मुलगा टीबीने आजारी होता. एकंदरीतही तो नाजूकच होता. ॲडा मात्र परिस्थितीला डगमगली नाही. तिने जिद्दीने प्रवास सुरू ठेवला. एका क्षणी तर तिच्या खिशात दमडीही उरली नाही, तेव्हा आपल्या पोटच्या गोळ्याच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी त्याला तिने अनाथालयात ठेवलं. मात्र त्याचवेळी पैशाची किंमत तिला कळली. तिने मनाशी ठरवलं, एक ना एक दिवस पुरेसे पैसे कमवून त्याला त्या अनाथालयातून परत आणायचं. याच काळात या मोहिमेबद्दल तिला समजलं. या मोहिमेसाठी इंग्रजी भाषा येणारी आणि शिवणकामात पारंगत महिला हवी होती. ॲडा दोन्ही अटींमध्ये बसत होती. पैसे मिळवण्यासाठी तिने हे काम स्वीकारायचं ठरवलं. या मोहिमेसाठी तिला तब्बल ५० डॉलर्स एवढा पगार मिळणार होता. तिच्यासाठी ही रक्कम बऱ्यापैकी मोठी होती. शिवाय मोहिमेदरम्यान तिच्याबरोबर इतरही एस्किमो लोक असणार होते. वरवर पाहता सगळं चांगलं होतं.

पण प्रत्यक्षातलं चित्र मात्र फारच वेगळं होतं. कोणतीही मोहीम कशी असू नये याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मोहीम होती. रॅंगल आयलंड या बेटावर ब्रिटिश मालकीचा दावा सांगणं हा या मोहिमेचा हेतू होता. पण प्रत्यक्षात ब्रिटनने कधीही या बेटावर आपला हक्क सांगितला नव्हता किंवा त्या बेटात रसही दाखवला नव्हता. मुळात ही मोहीम स्टेफानसन नावाच्या एका आर्क्टिक एक्सप्लोअररने आखली होती. हा मनुष्य स्वतः सेलिब्रिटी एक्सप्लोअरर होता. त्याच्या नावाला भुलूनच लोक मोहिमेमध्ये सहभागी व्हायला तयार होत होते. प्रत्यक्षात तो स्वतः मोहिमेमध्ये असणारच नव्हता. त्याऐवजी त्याने चार नवख्या लोकांना पाठवायचा निर्णय घेतला होता. एक वर्षाच्या या मोहिमेसाठी सहा महिने पुरेल एवढा शिधा त्यांच्याबरोबर दिलेला होता.

अशा प्रकारच्या खडतर मोहिमा अनेकदा ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ चालतात. त्यामुळे या मोहिमांसाठी अनुभवी आयोजक नेहमी जास्तीच्या सामानाची तरतूद करून ठेवतात. स्टेफानसनने याच्यापैकी काहीच केलं नव्हतं. उलट आर्क्टिक वृत्ताजवळचा प्रदेश म्हणजे शिकार आणि मासेमारीच्या दृष्टीने चंगळ आहे, त्यामुळे आहे तो शिधा व्यवस्थित पुरेल असा मोहिमेतील सदस्यांचा समज करून देण्यात आला होता. दरम्यानच्या काळात एकेक करून मोहिमेतले एस्किमो लोक गळाले. ॲडा मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिली. अखेरीस ९ सप्टेंबर १९२१ या दिवशी सिल्व्हर वेव्ह या जहाजावर तिने पाऊल ठेवलं. रॅंगल आयलंडवर पोहोचल्यानंतर पहिला काही काळ स्टेफानसनच्या अंदाजाप्रमाणे गेला. पण जसजसा उन्हाळा सरत झाला तसतसे निसर्गाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. सर्वत्र केवळ बर्फच बर्फ, जवळपास कुठेही मनुष्यवस्ती किंवा एखादं जहाज यांचं निशाण नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांची सुटका करण्यासाठी गेलेल्या टेडी बेअर या जहाजालाही बर्फामुळे परत फिरावं लागलं. या चमूला तर त्याबद्दलही काही माहिती नव्हती. त्यांच्या सुटकेसाठी बाहेर कोणी प्रयत्न करत आहे किंवा नाही याबद्दल त्यांना काहीही कळायला मार्ग नव्हता. जवळपासचा शिधा आणि इतर सामग्री संपत आली होती. अजून किती काळ या बेटावर अडकून पडावं लागेल हेही समजत नव्हतं.

१९२३ च्या सुरुवातीला परिस्थिती अजून बिघडली. चमूची उपासमार सुरू झाली. त्यांच्यापैकी एक नाईट नावाचा मनुष्य आजारी पडला. शेवटी २८ जानेवारी १९२३ या दिवशी इतर सदस्यांनी ॲडाला या नाईटच्या सेवेसाठी तिथेच ठेवायचं ठरवलं आणि ते बेट सोडण्याचा निर्णय घेतला. तिथून दूर जाऊन कुठे मदत मिळते का याचा ते शोध घेणार होते. पण त्यानंतर ते परत कधीच दिसले नाहीत. जवळपास सहा महिने ॲडा नाईटची सेवा करत होती. एकाच वेळी ती डॉक्टर, परिचारिका, शिकारी, सहकारी, स्वयंपाकीण अशा अनेक भूमिका पार पाडत होती. बदल्यात तिला या नाईटच्या संतापाचा सामना करावा लागत होता. एवढं सगळं करूनही ती आपली व्यवस्थित काळजी घेत नसल्याचा त्याचा आरोप होता. असहाय बनल्यामुळे सगळा राग तो तिच्यावरच काढत होता. ॲडा त्याला प्रत्युत्तर करत नव्हती. पण आपल्या मनातल्या भावनांना तिने एका डायरीमध्ये वाट मोकळी करून दिली होती. त्या काळात तिने जे जे सोसलं, अनुभवलं ते सगळं त्या डायरीच्या पानांवर उमटत होतं.

काही दिवसांनी नाईट मरण पावला. ॲडाने आहे त्या परिस्थितीशी झगडण्याचं ठरवलं. नाईटचं शव तिने एका स्लीपिंग बॅग मध्ये ठेवलं आणि जंगली श्वापदांपासून ते वाचावं यासाठी त्याच्या बाजूला पेट्यांचे थर रचून ठेवले. इतपत चांगुलपणा आणि संवेदनशीलता तिच्यामध्ये होती. पण आता ती त्याच क्षणांमध्ये अडकून पडणार नव्हती. एकाकी पडल्यावर तिने आपल्या तंबूची रचना बदलायला सुरुवात केली. सगळ्यात महत्त्वाची होती ती सुरक्षितता. त्यासाठी तिने आपल्या बिछान्याच्यावर बंदुकीसाठी एक रॅक तयार केली. पुढचे तीन महिने ती या बेटावर एकटी होती. या काळात कोल्ह्याची शिकार करणं, सापळा लावणं या गोष्टी तिने आत्मसात केल्या. आपल्या कॅम्पवर तिने एक उंच ओटा बांधला, जेणेकरून त्याच्यावर उभं राहून तिला दूरवरुनही पोलर बेअरची चाहूल घेता येईल. गरज पडल्यास हाताशी असावी म्हणून एक छोटीशी होडीही तिने तयार केली. शिवाय मोहिमेवर असलेल्या सामग्री मधील फोटोग्राफी इक्विपमेंटवरही तिने प्रयोग करायला सुरुवात केली. हळूहळू तिला स्वतःचे फोटो घ्यायला जमू लागलं. आजूबाजूच्या निसर्गाशी तिने इतकं जुळवून घेतलं की सुटका झाली नसती तरी अजून वर्षभर ती तिथे आरामात राहू शकली असती, असा तिचा तिलाच आत्मविश्वास आला होता.

पण अखेर तिची सुटका झाली. ती आपल्या गावी परतली. तिच्या मुलालाही ती सोडवू शकली. मात्र कबूल केल्याइतके पैसे तिला मिळालेच नाहीत. स्टेफानसन आणि इतर सेलिब्रिटीजना या मोहिमेतून भरपूर फायदा झाला, पण मोहिमेची खरी नायिका ॲडा ब्लॅकजॅक जिथे होती तिथेच राहिली. या मोहिमेवर, तिच्यावर पुस्तके लिहिली गेली पण या सर्वांचा तिला मोबदला काहीच मिळाला नाही. ज्या मुलाला वाचवण्यासाठी, त्याला एक चांगलं आयुष्य मिळवून देण्यासाठी तिने जिवाचा इतका आटापिटा केला, तोही दुर्दैवाने अल्पायुषीच ठरला. वयाच्या ५८ व्या वर्षी पक्षाघाताच्या झटक्याने तो निधन पावला. त्यानंतर सुमारे दहाएक वर्षांनी ॲडाही ख्रिस्तवासी झाली. एका शोकांतिकेचा करुण अंत झाला.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required