कार - बाईकचा जमाना संपला... आता जेटपॅक अडकवून उडायला लागा !!!

Subscribe to Bobhata

लांबलचक ट्रॅफिक, हॉर्नचा आवाज, आग ओकणारे सूर्य महाराज, ऑफिसला वेळेवर पोहोचण्याची घाई..  अशा वेळेला आपल्याला नेहमी वाटत असेल की सुपरमॅन सारखं उडता आलं असतं तर... तर  ट्रॅफिकला फाट्यावर मारून डायरेक्ट उडत गेलो असतो. हे सर्व कल्पनेत ठीक आहे.  पण हे जर खरंच शक्य झालं तर ?

म्हणजे विचार करा हं.. तुम्ही सकाळ सकाळी ऑफिससाठी तयार आहात.  गाडी काढायला तुम्ही घराबाहेर न पडता गॅलरीत जाता आणि एक उंच उड्डाण भरून छान वाऱ्याच्या झोतात ऑफिसच्या गॅलरीत जाऊन उतरता !!!

बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर हा खयाली पुलाव पण खरा ठरणार आहे मंडळी. जमाना जेटपॅकचा येणार आहे. पर्सनल जेटपॅक या तंत्रज्ञानावर सध्या काम सुरु आहे. ‘जेटपॅक एव्हीएशन’ ही कंपनी या तंत्रज्ञानावर काम करत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग सैन्यासाठी, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बचावकार्यासाठी, अग्निशमन दलासाठी, अवयव प्रत्यारोपणासाठी अशा अनेक कामांसाठी होऊ शकतो.

स्रोत

जेटपॅकच्या मागच्या बाजूस डिझेलवर चालणारे दोन लहान इंजिन आहेत. सुरक्षेसाठी सिलेंडरला कवच लावलेले आहेत, जेणेकरून हवेत इंधनाचा कोणत्याही करणास्तव स्फोट होणार नाही. कंप्युटरने जोडलेल्या डिस्प्लेमुळे पायलटला योग्य दिशेत जाण्यास मार्गदर्शन मिळू शकेल. मग काय, जेटपॅक म्हणजे ‘बच्चों का खेल’ होऊन जाईल मंडळी.

सध्या ‘जेटपॅक एव्हिएशन’ कंपनीला भांडवलाची गरज आहे. त्यामुळं तुम्ही या कंपनीत शेअर्सही विकत घेऊ शकता.  कारण कंपनी सध्या क्राउड फंडिंग करत आहे.

शेवटी काय तर, पुढील काळात जेटपॅकवर ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘बघतोयस काय रागानं, ओवरटेक केलंय वाघानं’, अस्स लिहिलेलं दिसेल हे नक्की !!!

सबस्क्राईब करा

* indicates required