computer

खगोलप्रेमींसाठी पर्वणी : उद्या हे ५ ग्रह तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकता!

मानवाला पुरातन काळापासूनच वेगवेगळ्या अवकाशीय घटनांचं कुतूहल वाटत आलंय. खगोलप्रेमींसाठी पर्वणी म्हणता येईल‌‌ असाच एक योग उद्या घडून येतोय. उद्याच्या पहाटे एक-दोन नव्हे, तर पाच ग्रह अवकाशात तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकता.

१९ जुलै, म्हणजेच रविवारच्या सुर्योदयापूर्वी बुध, मंगळ, शुक्र, बृहस्पती, शनी हे पाच ग्रह आणि चंद्रकोर अवकाशात दिसतील. हे ग्रह पाहण्यासाठी तुम्हाला कसल्याही दुर्बिणीची गरज नाही. सुर्योदयाच्या एक तास आधी पहाटे ताऱ्यांप्रमाणे चमकणाऱ्या या ग्रहांचं दर्शन होणार आहे. यानंतर जून २०२२ मध्ये परत असं ग्रहदर्शन तुम्हाला होईल.

पुढचे काही दिवस म्हणजे साधारण २५ जुलैपर्यंत अवकाशात चंद्राव्यतिरिक्त या ग्रहांचंही दर्शन होत राहिल. यापैकी बृहस्पती हा ग्रह थोडा लवकर दिसत असल्यानं त्याला पाहण्यासाठी सूर्योदयाच्या २ तास आधी तुम्हाला उठावं लागेल. तो तुम्ही ईशान्य क्षितिजावर पाहू शकता. बृहस्पतीच्याच वरती उजव्या बाजूला तुम्हाला रंगीत ग्रह शनी दिसेल, तर लाल ग्रह मंगळ हा तुम्ही आग्नेय क्षितिजावर पाहू शकता. शुक्रतारा हा पूर्वेच्या आकाशात चमकताना दिसेल, तर बुध हा ईशान्य-पूर्वेकडे चंद्राच्या उजवीकडे दिसेल. हा बुध शोधणं थोडं कठिण जाऊ शकतं. यासाठी तुम्ही Google Sky सारख्या ॲप्सची मदत घेऊ शकता.

सबस्क्राईब करा

* indicates required