computer

दीड लाखांच्या बदल्यात घरी १०० झुरळं पाळाल? ही अमेरिकन कंपनी नक्की काय संशोधन करत आहे?

झुरळ हा शब्द नुसता जरी ऐकला तरी किळस वाटते ना ? कुठेही झुरळ दिसल की आधी आपण हातात झाडू घेतो, झुरळ होऊ नये म्हणून दर सहा महिन्यांनी पेस्ट कंट्रोल करून घेतो. पण समजा अशी कुठली कंपनी आली जिने तुम्हाला ऑफर दिली की आम्ही पैसे देतो पण झुरळांसोबत रहा. तुमचे उत्तर काय असेल?

अशी अजब घटना खरोखरच घडली आहे. अमेरिकेतल्या कीटक व्यवस्थापन कंपनीची ही ऑफर आहे. ही कंपनी घरांमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव कसा होतो यावर संशोधन करणार आहे. त्यासाठी त्यांच्या वेबसाइटवर त्यांनी पोस्ट केले आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की आम्ही असे मालक शोधत आहोत जे स्वतःच्या घरात १०० झुरळांना राहू देतील आणि त्या बदल्यात कंपनी तब्बल दिड लाख म्हणजे $ २००० देऊ करत आहे.

त्यासाठी काही अटी देखील आहेत. घरमालकाकडून एक लेखी करार आवश्यक आहे. त्यांचे वय किमान २१ वर्षे असावे आणि घर अमेरिकेत ठराविक भागात पाहिजे. चाचणी सुमारे एक महिना चालेल. ३० दिवसांच्या कालावधीत घरमालकांना इतर कोणत्याही कीटक-नियंत्रण पद्धती वापरण्याची परवानगी नाही. जर नवीन तंत्राने ३० दिवसांच्या कालावधीच्या अखेरीस प्रादुर्भाव गेला नाही तर कंपनी दुसरा पर्याय वरून झुरळ साफ करुन देईल.

कंपनी असे पाच-सहा लोक शोधत आहे, जे त्यांना त्यांच्या घरात १०० झुरळे सोडण्यास तयार आहेत. कंपनी अशी शक्कल वापरून आपली सेवा आणि उत्पादन किती प्रभावी ठरेल याचा अभ्यास करणार आहे. एका अभ्यासानुसार, एक झुरळांची मादी एका आठवड्यात दोन अंडेपेट्या देते आणि त्यात अंदाजे १६ अंडी असतात. ही अंडी २४ ते ३८ दिवसांत बाहेर येतात. तसेच त्यांच्यावर असलेले कवच फार कठीण असते. झुरळांचे प्रजनन कमी दिवसांत मोठ्या संखेने वाढते. त्यामुळे त्यांना नष्ट करण्यसाठी सतत नवनवीन संशोधन होत राहते.

आपल्याकडेही झुरळांचा उपद्रव कमी नाही. एखादी कंपनी अशी ऑफर घेऊन आली तर काय उत्तर द्याल ?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required