computer

वर्षासहलीला चाललात? मग दुर्ग कसे पहावे? पावसाळ्यात दुर्ग फिरताना काय काळजी घ्यावी? हे तर आधी वाचा..

आता हळूहळू पावसाला सुरुवात झाली आहे. ट्रेकर्ससाठी पावसाळा म्हणजे तर पर्वणीच. पाऊस पडून गेल्यावर संपूर्ण सह्याद्री हिरवा शालू नेसतो व त्याच्या चाहत्यांना आकर्षित करतो. चिंब पावसात ट्रेक करायला सुद्धा खूप मजा येते. या वेळी अनेक अनुभवी लोक व नवीन लोक ट्रेकिंगसाठी बाहेर पडतात. परंतु यातल्या नवख्या मंडळींना ट्रेकिंग या विषयाबद्दल फारशी आत्मीयता नसते. परंतु इतर मित्र जातात म्हणून हे लोकसुद्धा त्यांच्याबरोबर ट्रेकिंगसाठी घराबाहेर पडतात. अशा वेळी ते ज्या ठिकाणी जात असतात त्या ठिकाणाबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. असो..!!!

या अशाच लोकांना आजचा हा लेख समर्पित आहे. हा लेख वाचून आपण एखादा दुर्ग पहायला, अनुभवायला जेव्हा जातो त्यावेळी आपण काय काय पूर्वतयारी करायला हवी यावर हा लेख प्रकाश टाकेल. 

महाराष्ट्रात पावसाळा सुरु झाला कि लोक साधारणपणे मुंबई-पुण्यापासून जवळ असणाऱ्या लोहगड-विसापूर, राजमाची, तुंग-तिकोना, कर्नाळा, प्रबळगड व त्याच्या बाजूचा अल्पावधीतच आचरट प्रसिद्धी पावलेला कलावंतीण सुळका, नेरळ जवळचा पेब (विकटगड), नाशिक जवळचा हरिहरगड, हरिश्चंद्रगड, कोथळीगड इत्यादी. दुर्गांवर लोकं आचरटासारखी गर्दी करतात. त्यामुळे बऱ्याच वेळा या दुर्गांवर त्या दुर्गाच्या क्षमतेपेक्षा जास्ती गर्दी झालेली आपल्याला दिसते. अशा वेळी काही अपघात झाल्याच्या बातम्यादेखील आपण वाचल्या असतील. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी तिथे जाणाऱ्या हवश्या-नवश्या लोकांनी त्यांच्या अंगी एक शिस्त बाळगणं गरजेचं आहे. जर बेशिस्तपणे वर्तन केलं तर त्यातून अपघात होतात व अशा अपघातातून सरळ मृत्यूसुद्धा होतात. यासाठी सर्वांनी अंगी एक शिस्त बाणवायला हवी. 

नमनाला घडाभर तेल वाहून झालं. आता आपल्या आजच्या मुख्य विषयाला सुरुवात करुया. मुळात जर आपण एखाद्या दुर्गावर पहिल्यांदा ट्रेकिंगसाठी जात असू तर सर्वात आधी आपण त्या स्थळाबद्दल माहिती घ्यायला हवी. ही माहिती आपल्याला इंटरनेटवर सहज उपलब्ध असते. YouTube वर जरी शोधलं तरी आपल्याला बरेच व्हिडिओ सापडतात. ते पाहून, वाचून त्यातून माहिती घ्या. या पेक्षा जर विश्वासार्ह माहिती हवी असेल तर पुस्तकं वाचा, त्या पुस्तकांतून तुम्हाला खूप चांगली माहिती मिळू शकेल. जर तुम्ही सह्याद्रीमध्ये फिरत असाल तर तुम्ही 'महाराष्ट्राची निसर्ग लेणी' आणि 'सांगाती सह्याद्रीचा' ही दोन पुस्तकं तर आवर्जून वाचायलाच हवीत. यातून तुम्हाला सह्याद्रीच्या जन्माची कथा वाचायला मिळेल. तसंच इतिहासाचासुद्धा थोडक्यात आढावा घेता येईल. या पुस्तकांमधून तुम्हाला सह्याद्रीचा भूगोल व इतिहास समजेल. 

प्रत्येक दुर्ग भटक्याने गो.नी.दांडेकर लिखित 'दुर्गभ्रमणगाथा' हे पुस्तक अवश्य वाचायला हवे. दुर्गभ्रमण करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक गीतेसमान आहे. यावरुन एक मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की कोणत्याही दुर्गावर जाताना आपण त्याची माहिती घेऊन जावी. जर अशी माहिती घेऊन आपण तो दुर्ग पाहायला गेलो तर तो दुर्गसुद्धा आपल्याशी बोलू लागतो. वर्षानुवर्षे त्याचा मूक असलेला इतिहास आपल्याशी संवाद साधू लागतो. त्यामुळे आपली पूर्वपीठिका तयार हवी. तसेच अनुभवी लोकांशी त्या स्थळाबद्दल चर्चा करावी व त्यांचे अनुभव जाणून घ्यावे. जर तुमचं नशीब जोरावर असेल तर अशा व्यक्तींकडे तुम्हाला त्या दुर्गाचे जुने फोटोसुद्धा पाहायला मिळतील.

प्रत्येक दुर्गावर पाहण्यासारखी कोणती ठिकाणं आहेत याची एक यादी करावी व त्या ठिकाणी घडलेल्या घटना थोडक्यात जाणून घ्याव्या. यामुळे दुर्ग बघताना एक प्रकारचा जिवंतपणा जाणवेल व तुम्ही डोळसपणे दुर्ग पाहायला व अनुभवायला सुरुवात कराल. याचबरोबरीने त्या परिसरात असणाऱ्या वनस्पतींची, पक्ष्यांची, प्राण्यांची म्हणजेच जैवविविधतेची सुद्धा माहिती घ्यावी. त्यामुळे तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. 

कुठेही ट्रेकिंगला जाताना तो ट्रेक किती कठीण आहे याची माहिती घ्यावी व तशी मानसिक तयारी करावी. ट्रेकमध्ये तुमच्यासोबत कोणीतरी अनुभवी व्यक्ती असेल याची काळजी घ्या. त्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत राहील. सह्याद्री आपल्याला चिवटपणा, धैर्य, संयम इ. गोष्टी शिकवतो त्या तुम्ही आत्मसात करायला हव्यात. 

प्रत्येक वेळी ट्रेकला जाताना आपल्यासोबत आवश्यक तितकं पाणी, एखादी मजबूत दोरी, टॉर्च, चाकू, उत्तम प्रतीचे ट्रेकिंगचे बूट, कपडे, तसेच जर मुक्कामाचा ट्रेक असेल तर टेन्ट, sleeping बॅग, खाण्यासाठी पुरेसे अन्न व ते शिजवण्यासाठी गॅस इत्यादी गोष्टी सोबत घेणं आवश्यक आहे. पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना तुम्हाला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पावसापासून वाचण्यासाठी रेनकोटस वापरावेत. पावसाळ्यात दुर्गांवर सगळीकडे बऱ्याचदा ढग दाटून आलेले असतात. अशावेळी उगाच कोणत्याही कड्यावर जाऊ नये व स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. कारण ढगांमुळे पुढे किती खोल दरी आहे याचा अंदाज आपल्याला येत नाही. अशा ठिकाणी जाऊन बिलकुल सेल्फी वगैरे काढायचे थिल्लर चाळे करू नयेत. जर कोणी असे चाळे करीत असेल तर आपण त्यांना त्वरित थांबवायला हवे. तरच पुढचे अपघात टळतील. यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे वेळेचा. तुम्ही ज्याप्रमाणे प्लॅन केला असेल त्याचप्रमाणे ठरलेल्या वेळी ठरलेल्या गोष्टी होतील याची काळजी घ्यावी. 
हा लेख हा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा व त्यांनासुद्धा याबद्दल माहिती द्या. फिरताना काळजी घ्या व डोळसपणे भटकंती करा. धन्यवाद..!!!

"शुभास्ते पन्थान: सन्तु|"

अथर्व बेडेकर - पुरातत्व अभ्यासक 

सबस्क्राईब करा

* indicates required