computer

समुद्राच्या लाटांवर स्वार होत असतानां त्याला सुचली भन्नाट कल्पना आणि जन्म झाला GoProचा !

कल्पना करा की तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक आहात, पण तुमच्या कंपनीमध्ये कुणीच कामाला नाही. कारण कंपनीमध्ये मालकही तुम्हीच, नोकरही तुम्हीच. रिसेप्शनिस्ट, मार्केटिंग, अकाउंट्स, सगळी डिपार्टमेंटस तुम्हांलाच संभाळायची आहेत. थोडक्यात तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही एकटेच काम करता आणि तुमच्या कंपनीचं जे काही चांगलं किंवा वाईट होईल त्याला जबाबदार देखील तुम्ही एकटेच. तुम्ही विचार करत असाल की अशी कोणती कंपनी आहे जी एकच माणूस चालवत होता?

निकोलास उर्फ निक वुडमन.जगातील अंदाजे १,५०० अब्जाधीश लोकांमधील स्वतः  एकट्याने अब्जावधी डॉलर्स कमावलेला तरूण आहे. एक काळ असा होता की तो एकटाच आपली कंपनी संभाळत होता.त्या कंपनीचं नांव -'गोप्रो-(GoPro) स्वत: वुडमनला जरी त्याच्या यशामध्ये नशिबाचा मोठा भाग आहे असं वाटत असलं, तरी त्याला ओळखणारे लोक गोप्रोच्या यशाचे श्रेय त्याच्या प्रेरणेला देतात. परंतु हे यश सहजसाध्य होतं कां? नक्कीच नाही.

निक वुडमन हा अनेक तरुणांपैकी एक होता ज्याने सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपले कार्यालय‌ आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. पदवी घेतल्यानंतर निक वुडमनने त्याचे पहिले स्टार्टअप सुरू केले,जी होती एम्पाॅवरऑल.काॅम ( EmpoweAll.com) नावाची वेबसाइट.२ डाॅलरपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकण्याची ती भन्नाट कल्पना होती.मात्र ती कल्पना फसली. हे त्याचं पहिलं अपयश.

१९९९ मध्ये २४ वर्षांच्या निक वुडमनने पुन्हां एकदां 'फन बग' ह्या नव्या कंपनीची स्थापना केली. हा एक गेमिंग अधिक मार्केटिंग प्लॅटफॉर्म होता जिथे वापरकर्ते पैसे कमवून इतर साइटवर खर्च करू शकत होते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी निक वुडमन अनेक गुंतवणूकदारांना पटवण्यात यशस्वी झाला आणि त्याने एकूण ३.९ दशलक्ष डाॅलर जमा केले. एक वर्षानंतर, म्हणजे एप्रिल २००१ उजाडलं पण साइट अद्याप ऑनलाइन झाली नव्हती आणि मग तर अचानक बंदच करावी लागली. इंटरनेटवर पैसे कमवता येतील असा विश्वास अनेक गुंतवणूकदारांना होता, पण त्यात काही तथ्य नव्हतं.

"लागोपाठ दोन कंपन्या बंद कराव्या लागल्यामुळे मी सर्वात अयशस्वी व्यावसायिकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येण्यास पात्र ठरलो", वुडमन विनोदाने म्हणतो. अपयशी होणं कोणालाही आवडत नाही, परंतु सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे मी माझ्या गुंतवणूकदारांचे पैसे वाया घालवले आणि त्यांचा माझ्या कल्पनेवर जो विश्वास होता, तो मी गमावून बसलो".

लागोपाठ अपयशाचा सामना करावा लागल्यामुळे तो निराश झाला, पण त्याने हार मानली नाही. ही वेळ अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने विचार करण्याची होती हे त्याने ओळखलं. आणि ते करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण कोणतं, हे त्याला चांगलंच माहित होतं; सर्फिंग ट्रिप. त्याच्या सर्फिंगच्या आवडीमुळे त्याला एक अत्यंत भन्नाट कल्पना सुचणार होती हे त्याला महिती नव्हतं.

त्याला २००२ मधील ऑस्ट्रेलियाच्या सर्फिंग ट्रिपने प्रेरित केलं. त्याला उच्च दर्जाचे ॲक्शन फोटो घ्यायचे होते, परंतु त्याच्या असं लक्षात आलं की हौशी छायाचित्रकार क्लोज अप फोटो घेऊ शकत नाहीत किंवा वाजवी किंमतीत योग्य दर्जाची उपकरणे खरेदी करू शकत नसल्याने ते शक्य होत नाही. निक वुडमनला तिथेच एक भन्नाट कल्पना सुचली.

त्याला कसलेही अभियांत्रिकी ज्ञान नव्हते आणि कॅमेरा विकसित करण्याचा कोणताही अनुभव त्याच्या गाठीशी नव्हता. मग त्याने कॅमेरा ट्रेड शो मध्ये असा कॅमेरा शोधला ज्यात त्याच्या पसंतीनुसार आणि डिझाईन प्रमाणे बदल करणे शक्य आहे. त्याने चिनी निर्माता होटॅक्स कडून $३.०५ किंमतीचा फिल्म कॅमेरा घेतला आणि त्यांना त्याच्या आवडीनुसार वैशिष्ट्ये विकसित करण्यास सांगितले.

जेव्हा तो सर्फिंग ट्रिपवरून परत आला तेव्हा त्याने स्वत:ला गॅरेजमध्ये अक्षरशः कोंडून घेतलं आणि कामाला सुरुवात केली. तिथे त्याने आपला पहिला कॅमेरा डिझाइन केला. त्याच्याकडे असलेले सर्व पैसे त्याने गुंतवले, तर काही त्याच्या आई वडीलांकडून उसने घेतले. पहिला गोप्रो कॅमेरा २००५ मध्ये उपलब्ध झाला. त्याने त्याच्या फोक्सवॅगनमधून संपूर्ण कॅलिफोर्नियामध्ये प्रवास केला, आणि आपला कॅमेरा सर्फिंगचे साहित्य विकणारी दुकानं तसंच व्यावसायिक खेळाडूंना विकला. पहिल्या वर्षी त्याला २५०,००० युरो मिळाले, मग मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. काही वर्षांनंतर निक वुडमन ८६० हून अधिक कर्मचारी असलेल्या कंपनीचा सीईओ बनला.

अयशस्वी होण्याची भीती आणि सहज उपलब्ध नसलेले उत्पादन तयार करण्याची इच्छा ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या की हमखास यश मिळतं हे निक वुडमन याने सिद्ध केले आहे

सबस्क्राईब करा

* indicates required