TRAIचे चेअरमन शर्मा यांनी दिलं आधार डेटा लीक करण्याचं चॅलेंज.. आणि हॅकर्सनी ट्विटरवर त्यांची कुंडलीच मांडली की हो..

आपल्याला जिथंतिथं आधार जोडा म्हणून सूचना आल्या, त्यांच्या डेडलाईनही आल्या आणि आपण मोबाईल नंबर, बँक अकाऊंटस, नोकरीची ठिकाणं... जिथंजिथं शक्य असेल तिथं आपला आधार नंबर दिलाही. एकीकडे जणू काही हा नंबर नसेल तर जगण्याचा आधारच निघून जाईल असं चित्र निर्माण केलं जातंय तर दुसरीकडे सुप्रीम कोर्ट आधार नंबर अनिवार्य नाही असं म्हणतंय. यात जीव जातोय आपल्यासारख्या सामान्य लोकांचा. सरकारी माणसं तर आधार कार्डाबद्दल बोलताना थकत नाहीत. त्याची सिक्युरिटी इतकी चांगली आहे, यंव आणि त्यंव. पण त्याचवेळी अवघ्या पाचशे रुपयांत १०० करोड लोकांचा आधार डेटा कुणीतरी विकल्याच्या बातम्या येतच असतात.

आपल्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन श्री. रामसेवक शर्मा हे सुद्धा आधारचे एक खंदे पुरस्कर्ते आहेत. संधी मिळेल तिथं आधार कसं सुरक्षित आहे आणि कसं गरजेचं आहे हे सांगत सुटतात. त्यांनी काल उघडपणे आपला आधार नंबर ट्विटरवर टाकला आणि मोठ्या ऐटीत हॅकर्सना आपला काय डेटा ते मिळवू शकतात हे दाखवायला सांगितलं. आणि काय, ते जाम तोंडघशी पडले की हो!! 

एलियट एल्डरसन नावाच्या फ्रेंच सिक्युरिटी संशोधकाने त्यांचा फोन नंबर, जन्मतारीख, पत्ता आणि इतर व्यक्तिगत माहिती आधार कार्डावरुन मिळवलीय. अर्थात, त्यानं बरेचशी माहिती ब्लर करुन ती ट्विट केलीय. वरती शर्माकाकांना सल्लाही दिलाय, "इतक्य्ता सहजपणे इंटरनेटवर तुमचा फोन नंबर, जन्मतारीख, पत्ता आणि बँकेतल्या खात्यांची माहिती उपलब्ध असेल, तर तुम्हाला काहीच प्रायव्हसी नाहीय". त्याचं म्हणणं आहे की तो आधारच्या विरोधात नाही, पण आधार हॅक करताच येणार नाही असं म्हणणाऱ्यांच्या नक्कीच तो विरोधात आहे. 

 

एका डीन ऑफ जिओ इन्स्टिट्यूट या नावाच्या ट्विटर युझरने तर आणखीच कमाल केलीय. शर्मांच्या जीमेलच्या सिक्युरिटी प्रश्नाची हिंट त्याने हॅक केली. ती होती त्यांचा एअर इंडियाचा फ्रिक्वेंट फ्लायर नंबर. तो काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने हॅक केलेली जन्मतारीख, जीमेल ॲड्रेस आणि इतर माहिती वापरली आणि त्यांच्या सिक्रेट प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं की हो..

 

आता पब्लिक फुल्ल सुटलंय.. इन्कमटॅक्सची वेबसाईट, युटीआयची वेबसाईट अशा वेगवेगळया ठिकाणी त्यांची माहिती वापरुन काय-काय करता येतं ते ट्विट करत बसलंय..

चला, तुम्हीही मारा एक ट्विटरवर चक्कर आणि पाहा आपल्या आधारची मौजमजा..

 
 

सबस्क्राईब करा

* indicates required