computer

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन : हे आहेत भारतातले सेलिब्रिटी वाघ. यातले तुम्ही किती पाहिलेत?

तर काय भाऊ लोक्स, तुम्ही जंगलात बिंगलात जाऊन टायगर सफारी करता का नाही???  गेल्या काही वर्षांत आपल्या सारख्या लोकांनीच या वाघाचे बारसे करायला सुरवात झाली आणि यातूनच जन्म झाला सेलिब्रिटी वाघांचा. या वाघांचे  एक स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण झालंय. यातले काही वाघ तर पर्यटकांना फोटो देण्यासाठी पण प्रसिद्ध झालेत. यामुळे वाघाच्या संवर्धनात हातभार लागतो का नाही याबाबत मात्र दुमत आहे. पण अशा प्रयोगांमुळेच वाघाचे संवर्धन हे चर्चेत राहते आणि त्याचा काही अंशी फायदा होतो.  महाराष्ट्रातला जय हा वाघ बऱ्याच दिवसांत दिसला नाही, तेव्हा त्याची मोठी बातमी झाली आणि वनखात्याला अनेक प्रश्नांना उत्तर द्यावे लागले. जर हा वाघ प्रसिद्ध नसता तर कदाचित कधीच ही माहिती बाहेर आली नसती. तर आज आम्ही अशाच काही सेलिब्रिटी वाघांची माहिती घेऊन आलोय. यातले काही वाघ आता अस्तित्वात नाहीत, पण जे आहेत त्यांना तुम्ही एकदा प्रत्यक्षात बघाच..

 

मछली- रणथम्बोर नॅशनल पार्क

मछली ही भारतातली सगळ्यात प्रसिद्ध वाघीण होती. आजवर सगळ्यात जास्त फोटो मछलीचेच काढले गेले असावेत. मछली कॅमेरासमोर बिनधास्त वावरायची आणि अगदी जिप्सी गाड्यांच्या जवळ येऊन फोटोसाठी पोज द्यायची, असे रणथम्बोर मधले गाईड लोक आठवणीने सांगतात. मछली प्रसिद्ध होण्याचे अजून एक कारण म्हणजे १४ फूट मोठ्या मगरी सोबत झालेली तिची चकमक.  या चकमकीचे काही  व्हिडीओ युट्युबवर पण उपलब्ध आहेत.  मछली ही कदाचित जगातला सगळ्यात प्रसिद्ध वाघ असावा. कारण तुम्हाला मछलीबद्दल अनेक फेसबुक पेजेस, डॉक्युमेंट्रीज तर तुम्हाला सापडतीलच,  पण मछलीचे एक पोस्टाचे तिकीटदेखील आहे.  साधारणत: वाघाचे आयुष्यमान हे १०-१५ वर्षाचे असते.  १८ ऑगस्ट २०१६ ला मछलीचा मृत्यू झाला, त्यावेळेस ती २० वर्षांची होती.  मछलीला आता प्रत्यक्ष पाहता येणार नाही, पण मछलीने जन्म दिलेले ११ वाघ अजूनही जंगलात आहेत. 

प्रिन्स- बंदिपूर नॅशनल पार्क

किंग ऑफ बंदिपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अगत्स्य या वाघाचा बछडा म्हणून याचं नाव झालं प्रिन्स. एखाद्या वाघाचा इलाका हा ३० किमी स्क्वेअरचा असतो.  पण प्रिन्स हा ८० स्क्वेअर किमीमध्ये आरामात फिरायचा. वयाच्या ४ थ्या वर्षी जेव्हा वन्यजीव अभ्यासकांनी याची आक्रमकता पाहिली आणि तेव्हापासूनच पुढे हा बंदिपूरवर राज्य करणार असे वाटले म्हणून त्याला नाव दिलं गेलं प्रिन्स.

२०१७ च्या एप्रिल महिन्यात प्रिन्स अचानक गायब झाला.  त्यानंतर वन्य खात्याने शोधमोहीम सुरू केल्यानंतर साधारण एका आठवड्याने प्रिन्सचा सांगाडा सापडला.

मुन्ना- कान्हा नॅशनल पार्क

दुसऱ्या एका वाघाच्या लढाईनंतर जेव्हा या वाघाला गाईड लोकांनी बघितले, तेव्हा त्यांच्यातील एका पोलिओ झालेल्या गाईडवरून या वाघाचे नाव मुन्ना पडलं आणि हा वाघ याच नावाने प्रसिद्ध झाला. मुन्नाला रॉकस्टार ऑफ कान्हा या नावाने पण ओळखले जायचे. हा वाघ सेलिब्रिटी बनण्याचे अजून एक कारण म्हणजेच याच्या कपाळावरील पट्टे CAT हे इंग्रजी अक्षरे दर्शवतात.
या वर्षीच्या सुरवातीला काही दिवसांसाठी मुन्ना गायब झाला होता. आज १५ वर्षं वयाच्या या वाघाला इतर तरुण वाघांपासून धोका आहे. त्यांनी त्याला  त्याच्या इलाक्यातून हाकलून दिले आहे. त्यामुळे त्याला शेजारच्या गावावर हल्ला करुन छोट्यामोठ्या शिकारींवर गुजराण करणं भाग पडत आहे.   त्यामुळे याला माणसापासूनही धोका आहे.

कॉलरवाली- पेंच नॅशनल पार्क

पेंच नॅशनल पार्कच्या मध्यप्रदेशाच्या बाजूस राहणाऱ्या या वाघिणीला २००८ मध्ये वनविभागाने  तिचा अभ्यास करण्यासाठी तिच्या गळ्याभोवती रेडिओ कॉलर लावली आणि तिला कॉलरवाली हे नाव पडलं. कॉलरवाली लहानपणापासूनच प्रसिद्ध होती.  त्यावेळेस होणाऱ्या हत्ती सफरीत फार जवळून तिला अनुभवता यायचे. कॉलरवाली फोटोसाठी पोज द्यायची. तसेच  ती अनेक डॉक्युमेंट्रीजमध्ये पण आहे. आजवर कॉलरवालीने २६ बछड्यांना जन्म दिलाय. वाघीण आपल्या आयुष्यात सरासरी ७ बछड्यांना जन्म देते.  त्यामानानं कॉलरवालीने रेकॉर्डच केलाय.

माया आणि स्कारफेस - ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह

एकेकाळी जोडी असणारे हे वाघ म्हणजेच ताडोबाचे ब्युटी आणि बिस्ट आहेत. आपल्या वागणे, दिसणे यांनी वाघांना नव्हे तर माणसालाही मंत्रमुग्ध करणाऱ्या या वाघिणीला माया हे नाव मिळालं यात कोणतेही नवल नाही. तर दुसऱ्या बाजूला आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या या डागामुळे या वाघाला नाव मिळालं आहे स्कारफेस. त्याला हा डाग एका चकमकीत झालेल्या जखमेतून मिळालाय. 

या दोघांमध्ये माया आपल्या बछड्याला जवळ घेतानाच्या फोटोने तिची पॉप्युलरीटी वाढवली. अमोल बायस यांनी काढलेला हा फोटो आपल्याला पोस्टल स्टॅम्पच्या रूपात बघायला मिळणार  आहे. स्कारफेसच्या बाबतीत त्याची भारी साईजच पुरेशी आहे. स्थानिकांच्या मते हा भारतातला सगळ्यात वजनदार वाघ आहे.  त्यामुळेच त्याला लोक हल्क म्हणतात. 

तर मंडळी, आज आम्ही काही सेलिब्रिटींची ओळख करून दिली.  इतर सेलिब्रिटी वाघांना तुम्ही भेटला असाल तर आम्हालाही कळवा>.

सबस्क्राईब करा

* indicates required