computer

केवळ थापा मारून कोट्याधीश बनलेला माणूस!! याची तुलना चक्क इलॉन मस्कसोबत होत असे!!

ही गोष्ट आहे ट्रेव्हर मिल्टन नावाच्या एका अवलियाची. याने केवळ कागदावर एक संकल्पना मांडून लोकांना उल्लू बनवलं आणि ती प्रत्यक्षात न आणताही अफाट पैसा कमावला.

इंधनासाठी हायड्रोजनचा वापर केलेल्या आणि शून्य उत्सर्जन (झिरो एमिशन) असलेल्या ट्रकची निर्मिती करत असल्याचा त्याचा दावा होता. पर्यावरणपूरक हा शब्दच मोठा जादुई आहे. भले भले घोळात घेता येतात. तसंच काहीसं या ट्रेव्हर मिल्टनने केलं होतं. हा ट्रक पर्यावरण आणि पैसा दोन्ही वाचवू शकतो असा त्याचा दावा होता.

या निकोला वन नावाच्या ट्रकमुळे वाहतूक उद्योगात अभूतपूर्व क्रांती घडून येणार होती आणि अर्थातच ट्रेव्हरच्या आयुष्यातही. तो कोट्याधीश बनणार होता. बॉश, जनरल मोटर्स यासारख्या बलाढ्य कंपन्यांना ट्रेव्हरबरोबर काम करायचं होतं. या कंपनीचं मूल्य ३४ बिलियन डॉलर्स असल्याची थाप ट्रेव्हरने बिनदिक्कत मारली होती.

यात फक्त एकच समस्या होती. ते म्हणजे यातलं काहीही प्रत्यक्षात आलेलं नव्हतं. होती ती फक्त कल्पना! हा ट्रक सध्या तरी केवळ एक शो पीस होता. गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना ट्रेव्हरने एक छानसं स्वप्न दाखवलं होतं. हा ट्रक कसा दिसेल याचा एक नमुना तयार होता, पण तो केवळ एक पोकळ सांगाडा होता. प्रत्यक्षात त्याच्या आत काहीही नव्हतं. एवढंच कशाला, ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा ट्रक धावणार होता ते तंत्रज्ञानही अजून अस्तित्वात नव्हतं. सगळं फक्त कागदावर होतं. एका मोठ्या घोटाळ्याची ही फक्त सुरुवात होती.

आज जमाना स्टार्ट अप्सचा आहे. टॅलेंट असलेल्या, जग बदलू शकेल अशी क्रांतिकारी, भन्नाट आयडिया डोक्यात असलेल्यांसाठी झटपट प्रसिद्धीच्या शिखरावर नेण्याचा हा मार्ग आहे. तुम्ही एकच करायचं- तुमच्या डोक्यातली ही आयडिया तुम्ही जगासमोर मांडायची आणि हीच गोष्ट कशी चांगली हे गुंतवणूकदारांना पटवून द्यायचं. एखाद्या कल्पनेत खरोखर दम आहे असं समोरच्याला वाटलं तर तो त्या कल्पनेत पैसा गुंतवतो. हा तसा रिस्क गेमच. कित्येकदा ही हुशार, कल्पक मंडळी केवळ कल्पना विकून पैसे कमवतात, गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीच्या स्वरूपात मजबूत भांडवल उभारतात आणि नंतर गाशा गुंडाळतात. ती कल्पना कधीच प्रत्यक्षात येत नाही. अशी अनेक प्रकरणं घडलेली आहेत. या ट्रॅव्हर मिल्टन महाशयांनी नेमकं हेच केलं.

भल्याभल्यांना चुना लावणाऱ्या मिल्टनचा लहानपणीचा बहुतेक काळ अमेरिकेतल्या युटाह मध्ये गेला. बालपण तसं खडतरच होतं. तो केवळ १४ वर्षाचा असतांना त्याची आई कॅन्सरने गेली. आईच्या आजारपणामुळे तो आणि त्याची भावंडं आहे त्या परिस्थितीत उभं राहायला शिकली. मिल्टनचं आपल्या वडिलांशी विशेष सख्य होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिल्टन कधीतरी एका ट्रिपच्या निमित्ताने ब्राझीलला गेला असता पर्यावरणविषयक काम करण्याची त्याला प्रेरणा मिळाली. नंतर युटाहला परतल्यानंतर त्याने स्वतःची कंपनी सुरू केली. ही कंपनी सिक्युरिटी अलार्म तयार करायची. पुढे ती कंपनी त्याने तीन लक्ष डॉलर्सला विकली. पण या व्यवहारात त्याने त्याच्या गिऱ्हाईकाला आणि बिझनेस पार्टनरला फसवलं.मग त्याने एक वेबसाईट बनवून त्या माध्यमातून जुन्या मोटार गाड्या विकायला सुरुवात केली. यातही त्याने बऱ्यापैकी पैसा कमावला. नंतर त्याने डीहायब्रीड या नावाने डिझेल इंजिनचं रूपांतर नॅचरल गॅस फ्युएल सिस्टीम मध्ये करण्यासाठीची एक योजना तयार केली. नैसर्गिक वायू तुलनेने स्वस्त, कमी मेंटेनन्स लागणारा आणि वापरासाठी सुरक्षित. हे मुद्दे वरवर तर आकर्षक होते. पण याची अंमलबजावणी करणं सोपं नव्हतं.

मिल्टनकडे इंजिनीअरिंगचा कोणताही अनुभव नव्हता. मार्केटिंगमधल्या अनुभवाच्या जोरावर त्याने स्विफ्ट नावाची कंपनी स्थापन केली. त्यासाठी त्याला दोन मिलियन डॉलर्स एवढी गुंतवणूक अपेक्षित होती. ती त्याने असंच छान छान भाषण करून मिळवली. यात त्याला अस्तित्वात असलेल्या दहा ट्रक्सचं रूपांतर वजनाला हलक्या असलेल्या आठशे ट्रक्समध्ये करायचं होतं. त्याला काही हे जमलं नाही. कंपनी फक्त असे पाच ट्रक तयार करू शकली. त्यातही त्यांची इंजिन्स धड नव्हती. या सगळ्या प्रकरणात कडी म्हणजे या दहा मिलियनचा उपयोग त्याने स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी केला.

एवढं होऊनही मिल्टन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आखत गेला आणि प्रत्येक वेळी त्याला बकरा मिळत गेला.

 २०१४ मध्ये निकोला मोटर्स अस्तित्वात आली. यातून त्याने या क्रांतिकारी ट्रकची संकल्पना मांडली. हा ट्रक एका टप्प्यात न थांबता हजार मैल धावू शकणार होता. पुढचे हजार मैल धावण्यासाठी करायचं रिफिलिंग केवळ पंधरा मिनिटांत होणार होतं. या गेम चेंजर ट्रकचं डिझाईन त्याने केवळ तीन हजार डॉलर्समध्ये एका डिझायनर कडून करून घेतलं. गंमत म्हणजे याच डिझाईन वरून त्यावेळी निकोलाने टेस्लाच्या विरोधात चोरीचा दावा ठोकला होता!

ही ट्रकची संकल्पना ऐकून जग पागल व्हायचंच बाकी राहिलं होतं. डिसेंबर २०१६ मध्ये या ट्रकचं एका सार्वजनिक कार्यक्रमात अनावरण होणार होतं. ही संकल्पना केवळ कागदावर असतानाच त्यांनी प्रीऑर्डर घ्यायला सुरुवात केली होती. डेडलाईनला केवळ तीन-चार महिन्यांचा अवकाश असताना हा ट्रक म्हणजे केवळ फ्रेमवर बसवलेला सांगाडा होता. त्याचे भाग अजूनही खरेदी केलेले नव्हते. ट्विटरवर मात्र इव्हेंटच्या दिवशी सुसज्ज असा ट्रक समोर येणार आहे असं चित्र उभं केलं जात होतं. नोव्हेंबरमध्ये गिअर्स वगैरे नसलेला, केवळ बाहेरचा सांगाडा आणि ॲक्सलची तजवीज झालेला ट्रक असेंबल करण्याच्या दृष्टीने काम सुरू झाले. नोव्हेंबरमध्ये उशिरा ट्रकची बॉडी आली. हायड्रोजन टेक्नॉलॉजीचा कुठे पत्ता नव्हता तरी ट्रकच्या बॉडीवर मोठ्या दिमाखात ही अक्षरं झळकत होती. ट्रकमधला एकमेव काम करत असलेला भाग टचस्क्रीन हा होता. मोठा गाजावाजा करत या कार्यक्रमाच्या जोरावर कंपनीने जानेवारी २०१७ मध्ये परत एकदा भांडवल उभारलं.

पण लोकांना केवळ कागदावरचं डिझाईन किंवा स्वप्न नको होतं, त्यांना प्रत्यक्षातला चालू अवस्थेतला ट्रक पाहण्याची जास्त उत्सुकता होती. त्यानंतर काही दिवसांनी या कंपनीने निकोला वन धावत असतानाचा व्हिडिओ प्रदर्शित केला. लोकांना परत आशा वाटू लागली. पण प्रत्यक्ष ट्रकच्या उत्पादनाच्या आघाडीवर फारसं काही घडत नव्हतं. मुळात ट्रेव्हरलाच निकोला वन पूर्ण करण्यात आणि बाजारात आणण्यात फारसा रस नव्हता. केवळ एक कॉन्सेप्ट कागदावर दाखवून लोकांकडून भांडवल उकळून पैसा उभा करण्यातच त्याला स्वारस्य होतं आणि गतीदेखील होती. कंपनीने ट्रक तयार करण्याचं काम थांबवलं होतं, आणि बाहेरच्या लोकांना याची कल्पना नव्हती. ट्रकचा व्हिडिओही खोटा होता. त्यामध्ये ट्रक प्रत्यक्षात एका उंच टेकडीवरून खाली सोडण्यात आला होता. त्यामुळे त्याला आपोआप गती मिळाली होती. उत्तम प्रकारे इफेक्ट आणि व्हिडिओ एडिटिंग वापरून पद्धतशीरपणे लोकांना बनवण्यात आलं होतं.

या इलेक्ट्रिक ट्रकमध्ये हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून केला जाणार होता आणि त्याच्या साहाय्याने इलेक्ट्रिक मोटर चालवली जाणार होती. अशी जवळपास साडेतीनशे हायड्रोजन स्टेशन्स उभारण्यात येणार होती. परंतु हायड्रोजनचा वापर करणं तंत्रज्ञानाच्या दृष्टीने किचकट आणि महागही होतं. या हायड्रोजन स्टेशनच्या उभारणीसाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार होता. वरवर पाहता हा पर्याय आकर्षक वाटला तरी एकंदरीत निकोलाने ज्या प्रकारे त्याची हाताळणी चालवली होती ते सगळं संशयास्पद होतं.

पण तरीही थापा सुरूच राहिल्या आणि लोकांना उल्लू बनवणंही. २०१९ हे वर्ष सरता सरता त्यांनी परत एक मोठी घोषणा केली. त्यानुसार जगाचा चेहरामोहरा बदलून टाकेल असं काहीतरी तंत्रज्ञान जन्माला येणार होतं. निकोला आता एका हायडेन्सिटी बॅटरीचं उत्पादन करणार होती. लिथियम आयन बॅटरीच्या तुलनेत या बॅटरीपासून चौपट जास्त ऊर्जा मिळणार होती. त्या ट्रकमध्ये हीच बॅटरी वापरली जाणार होती. परत एकदा लोक भुलले. ८०० ट्रक्सची ऑर्डर निकोलाला मिळाली. या बॅटरीचं उत्पादन करण्यासाठी निकोलाने ज्या कंपनीला ऑर्डर दिली तीही फ्रॉड निघाली.

यादरम्यान ट्रेव्हरने एक मोठी हवेली खरेदी केली. आजूबाजूला भरपूर मोकळा परिसर, झाडं वगैरे असलेली. लोकांकडून पैसे गोळा करत असताना एकीकडे त्या पैशाला अशाप्रकारे चैन, ऐष आराम यासाठी पाय फुटत होते.

घोटाळे करूनही जून २०२० मध्ये निकोला पब्लिक कंपनी बनली. त्यासाठी त्यांनी रिव्हर्स मर्जर तंत्रज्ञानाचा आधार घेतला. यात कंपनीचा महत्त्वाचा आणि गोपनीय तपशील जाहीर करण्याची गरज नसते. यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात धोक्याची घंटा वाजली. तरीसुद्धा निकोलाचा शेअर चढताच राहिला. एकही ट्रक बाजारात न आणता निकोला या वर्षातली सर्वात मोठी ट्रक उत्पादन कंपनी बनली होती! फोर्डला देखील मागे टाकून ही कंपनी पुढे गेली होती. ट्रॅव्हर मिल्टनची तुलना तर थेट इलॉन मस्कशी होऊ लागली. त्यापुढे जात निकोला मोटर्सने जनरल मोटर्सबरोबर भागीदारी करत असल्याचं जाहीर केलं. जनरल मोटर्सचा हिस्सा ११ टक्क्यांचा असणार होता आणि बदल्यात ती या इलेक्ट्रिक ट्रकचं उत्पादन करणार होती. आता इथे प्रश्न हा निर्माण होतो की जनरल मोटर्ससारख्या तगड्या खेळाडूनेदेखील या फ्रॉड कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी थोडाही रीसर्च कसा केला नाही?

नवीन ट्रकसाठी- निकोला बॅजरसाठी- परत एकदा प्रीऑर्डरचा सिलसिला सुरू झाला.

पण दैव कायम ट्रेव्हरला साथ देणार नव्हतं. हिंडेनबर्ग नावाच्या एका इन्व्हेस्टमेंट कंपनीला निकोला मोटर्समध्ये काहीतरी काळंबेरं आहे असं जाणवलं आणि त्यांनी तसा एक रिपोर्ट तयार केला. त्याआधी त्यांनी कंपनीच्या विरोधात टेक्स्ट मेसेजेस, वैयक्तिक इमेल्स, बिहाइंड द सीन फोटोग्राफ असे पुरावेही गोळा केले. हे सगळं झाल्यानंतर निकोलामधला फ्रॉड चव्हाट्यावर आला आणि एकच खळबळ माजली. दिवस फिरल्याची ट्रेव्हरला जाणीव झाली. गुंतवणूकदारांचं नुकसान भरून देण्याचा त्याने दावा केला. पण प्रत्यक्षात असं काही न करता त्याने आपली सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केली आणि गायब झाला. सप्टेंबरमध्ये तो एक्झिक्यूटिव्ह चेअरमन या पदावरून पायउतार झाला. त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका तर ठेवलेला आहेच, पण त्या व्यतिरिक्त दोन महिलांनी त्याच्याविरोधात अश्लील वर्तन केल्याचाही दावा केला आहे. ट्रेव्हरने अर्थातच या आरोपांचा इन्कार केला आहे. यापुढे त्याचं काय होतं हे बघणं जास्त उत्कंठावर्धक ठरेल.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required