computer

भारतात कोरोनाची चौथी लाट येतेय? तज्ञांचं याबद्दल एकूणात काय म्हणणं आहे?

भारतात आता जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर संपत आहे. पण अचानक बातम्यांमध्ये चौथ्या लाटेबद्दल चर्चा होत आहे. चीनसह जर्मनी, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये चौथी लाट आल्याने रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. पण भारतात याचा किती धोका आहे? जर ही लाट आली तर विषाणू किती घातक ठरू शकतो. याबद्दल महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

ओमायक्रोन बी 2 (Omycron B2) हा विषाणू सगळीकडे पसरत आहे.अनेक देशांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या आठ टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. या सर्व गोष्टींमुळे कोरोनाची चौथी लाट आली अशी भीती निर्माण झाली आहे.

भारत व महाराष्ट्रात साधारण नोव्हेंबर २०२१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आधी ओमायक्रोन बी ए -1 व बी ए-2 या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटचे रुग्ण सगळीकडं आढळत होते. या रुग्णांना फारशी बाधा होत नाही. बी-2 हा बी-1 सारखाच विषाणू आहे. हा विषाणू फार वेगाने पसरतो. मात्र यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही. साधारण ६० च्या पुढच्या वयोगटातील लोकांना याचा धोका संभवतो. त्यातही ज्या लोकांचे लसीकरण झाले नाही, त्यांना याची लागण होण्याची शक्यता अधिक आहे.

भारतात ओमायक्रॉनची तिसरी लाट असतानाच सर्वसाधारणपणे १०० पैकी ७५ जणांना “बीए-२’ या नव्या व्हेरिएंटची लागण होऊन गेलेली आहे. संसर्गामुळे तयार झालेली इम्युनिटी ९ ते १२ महिने राहू शकते. भारतीयांना तिचे संरक्षण आहे. “हायब्रिड इम्युनिटी’ वाढल्याने रुग्णालयात भरती होण्याची गरज भासत नाही. तसेच काेरोनाची तीव्रता व मृत्यूची शक्यता कमी होते. भारताला सध्या तरी चौथ्या लाटेचा धोका दिसत नाही, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथीचे आणि संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख पद्मश्री डाॅ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत अल्फा, बीटा व डेल्टा विषाणू आला. असा दर चार-सहा महिन्यांनी एक कुठला तरी नवीन म्यूटंट येणारच आहे. त्यामुळे लसीकरण करून घेणे आणि नियम पाळणे महत्वाचे ठरते. सध्या ८८ टक्के लोकांचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतरही अनेकांना ओमायक्रॉनची लागण झालेली होती. त्यामुळे आपल्याकडे व्हॅक्सिन व संसर्गाची “हायब्रिड इम्युनिटी’ विकसित झालेली आहे. याचा फायदा पुढच्या काळात होऊ शकतो.

भारतातून तिसरी लाट ओसरली आहे. तरीही बेफिकीर न राहता तसेच भीती न बाळगता सर्वांनी पुढेही लढा द्यायचा आहे. काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे हे आपण आतापर्यंत शिकलोच आहोत. तज्ञांचेही तेच मत आहे. लहान मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. १२ वर्षे वयाच्या आतील मुलांचे लसीकरण सुरू झाल्यावर आणखी सुरक्षा कवच निर्माण व्हायला मदत होईल. पुढच्या एक महिन्यात इतर देशांत हा नवा म्युटंट काय परिणाम करतो हे पाहणेही महत्वाचे आहे. तोपर्यंत कुठल्याही चुकीच्या बातम्या आणि अफवांवर विश्वास न ठेवणे हेच हितावह ठरेल.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required