विष्ठा, उलट्या, रिकाम्या बॅगा, झेंडे.... अजून काय काय कचरा सोडून आलाय मानव चंद्रावर?

माणूस  चंद्रावर खरंच  पोचला की नाही याबाबतही वाद घालणारेही बरेचजण सापडतील, पण ते असोच. आज बोभाटा.कॉम घेऊन आलेय यादी- माणसाने चंद्रावर सोडलेल्या वस्तूंची. 

१९६९ ते १९७२ या दरम्यान चंद्रावर माणसांच्या ६ वार्‍या  झाल्या. या सहा खेपांत चंद्राच्या पृष्ठभागाच्या अभ्यासासाठी साधारण ३८२ किलो वजनाचे दगड पृथ्वीवर आणले गेले. आता आपण काही नासाचे इंजिनिअर नसलो म्ह‌णून काय झालं? प्र‌वासाला जाताना नेलेल्या व‌स्तू आणि तिक‌डे गेल्याव‌र केलेली शॉपिंग हे स‌ग‌ळं ल‌क्षात घेत‌लं त‌र येतानाचं ओझं नेह‌मीछ जास्त होतं की नाही? विमान‌प्र‌वासात या व‌ज‌नाचा इत‌का विचार क‌रावा लाग‌तो आणि ही त‌र थेट चंद्राव‌र स्वारी!!   म‌ग त्या चंद्रावरच्या वस्तूंचं वजन अधिक इथून नेलेल्या वस्तूंचं वजन याचा विचार केला त‌र‌, हे लगेज बरंच खर्चिक झालं असणार याचा अंदाज येतोच. त्यामुळे नेलेल्या सगळ्याच वस्तू काही अंतराळवीरांनी अर्थातच परत आणल्या नाहीत. हे ही एकवेळ ठीकच. पण काही वस्तू अंतराळवीर तिथे मुद्दाम सोडून आले हे तुम्हाला माहित आहे का?

-चंद्रावर मानवी विष्ठा , लघवी आणि उलटी  यांनी भरलेल्या ९६ बॅग्ज आहेत.

- ७० हून अधिक अवकाशयाने चंद्राच्या पृष्ठभागावर आहेत. त्यातली काही मोहिम सुरू होण्याआधीच कोसळली आहेत तर काही नंतर  काम संपल्यानंतर  मुद्दाम तिथे पाडण्यात आली आहेत. तसेच अपोलोच्या टीमने यानातून चंद्रावर उतरण्यासाठी वापरलेली शिडी, तिथे निरिक्षणं करणाऱ्या काही ऑटोमॅटिक गाड्या (rovers) हे सारं अजून तिथं चंद्रावरच आहे. 

- अमेरिकन झेंडे- काहींच्या मते चंद्रावर पाच अमेरिकन झेंडे आहेत तर काहींच्या मते एकच.  अपोलो ११ ने अवकाशात झेप घेताना मात्र त्यांनीच रोवलेल्या अमेरिकेच्या झेंड्यावर धुळीचे लोट फेकले होते. 

- पाठीवर घ्यायच्या बॅगा

- बारा बुटांच्या जोड्या

- फिल्मी मासिकं

- टीव्ही कॅमेरे

- कित्येक फोटोग्राफीचे कॅमेरे आणि त्यांच्या ऍक्सेसरीज

- काही आधुनिक भाले (javelins)

- बरेचसे हातोडे, खिळे, चिमटे, कुदळी आणि फावडी

- खास उबदार ब्लॅंकेट्स 

- टॉवेल्स

- वापरलेले ओले रूमाल (वेट वाईप्स)

- अवकाशात खाल्लेल्या अन्नाची रिकामी पाकिटे

- चार्ल्स ड्यूक या अंतराळवीराचा फॅमिली फोटोग्राफ 

 

आता तिथलं वातावरण असं आहे की त्या फोटोतले रंग लगेच उडालेही असतील. तो तसाही तिथे टिकणार नव्हताच. पण तरीही असलं काहीतरी करण्याची एक खुमखुमी असतेच ना माणसाला!!

- एअर फोर्स अकॅडेमीचं चिन्ह असलेला बहिरी ससाण्याचा एक पंख.

- रशिया आणि अमेरिकेच्या अवकाश   मोहिमेत मृत्यूमुखी पडलेल्या अंतराळवीरांना श्रद्धांजली म्हणून अपोलो १५ च्या अंतराळवीरांनी तिथं ठेव‌लेली एक छोटीशी  ऍल्युमिनियमची अंतराळवीराची प्रतिकृती. 

 

-१९६७साली अपोलो-१ या यानाने उडण्याआधीच पेट घेतला होता आणि त्यात तीन अंतराळवीर मरण पावले होते. या यानाचा एक तुकडाही चंद्रावर ठेवण्यात आला आहे. 

- ७३ देशांतल्या नेत्यांनी शुभेच्छासंदेश लिहिलेली  सिलिकॉनची  एक लहान तबकडी (डिस्क). इंदिरा गांधीनीही त्या डिस्कवर एक संदेश लिहिला आहे. 

- अपोलो १२चा अंतराळवीर ऍलन बीन याने ठेवलेली चांदीची पिन

- रशियाच्या व्लादिमीर कोमारोव्ह आणि युरी गागरीन यांच्या स्मृती प्रीत्य‌र्थ‌ ठेव‌लेलं एक मेडल

- दोन गोल्फचे बॉल्स!! तिथे जाऊन कुणी गोल्फ का खेळेल हा प्रश्न पडला ना?

- अपोलो ११ च्या अंतराळवीरांनी ठेवलेली ऑलिव्हच्या पानांची सोनेरी डहाळी

 

माणसानं पृथ्वीचा कचरा डेपो तर केलाच आहे. भविष्यात त्यासाठी शेजारचे ग्रह वापरले म्हणून आश्चर्य वाटायला नको.

 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required