तुम्ही व्हॉट्सऍपवर काय करता ते आता फेसबुकला कळणार, हे टाळण्याचा एक उपाय आहे.

इंटरनेटवर  काही फुकट नसतं, फेसबुक असो, गुगल असो किंवा इतर कोणतीही साईट असो.  ती तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य वाचकांकडून अप्रत्यक्ष पैसे घेतच असते. त्यांना  जाहिरातीतून उत्पन्न मिळतं.  आणि या जाहिराती सुयोग्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी युझर काय वाचतो, त्याचे वय काय, तो काय गुगल करतो? अशा सर्व प्रकारच्या डेटाचा यासाठी वापर करण्यात येतो. 

व्हॉट्सऍप हे माध्यम याला आजवर अपवाद ( निदान जाहीररीत्यातरी) होते. सुरावतीच्या काळापासूनच युजर प्रायव्हसीला महत्व देणाऱ्या व्हॉट्सऍपने आपल्या प्लॅटफॉर्मवर जाहिरातींना विरोध केला होता. फेसबुकने व्हॉट्सऍपला विकत घेण्यामागे व्हॉट्सऍपचा प्रचंड युजर बेस आणि त्यांचा डेटा होता. एक ना एक दिवस व्हॉट्सऍपवर जाहिराती येणार किंवा फेसबुक या डेटाचा वापर जाहिरातींसाठी करणार हे नक्कीच होते.

पण काल जाहीर केल्याप्रमाणे व्हॉट्सऍप या गोष्टींसाठी फेसबुकसोबत डेटा शेअर करणार आहे.

1. फेसबुक आणि व्हॉट्सऍप या दोन्ही माध्यमांवर युनिक युजर शोधण्यासाठी

2. व्हॉट्सऍपवरील स्पॅम रोखण्यासाठी

3. फेसबुकवर  तुमच्या आवडीनुसार जाहिराती आणि मित्र सुचविण्यासाठी

या सगळ्यासाठी व्हॉट्सऍपने आपल्या नियम व अटी बदललेल्या आहेत. हे पूर्णतः टाळणे शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सऍप वापरणं बंद करावे लागेल पण जाहिरातींसाठी आपला डेटा वापरू न देण्याची सोय व्हॉट्सऍपने दिली आहे. त्यासाठी खालील उपाय करावा लागेल..

व्हॉट्सऍप तुम्हाला नवीन नियम व अटी स्वीकारायला लावेल. हे करत असताना अटींबद्दल दिलीली माहिती शेवटपर्यंत स्क्रोल करा. तिथे हा ऑप्ट आउट (Opt Out)चा चेकबॉक्स असेल. तो अनटिक/अनसिलेक्ट (untick/unselect) करा. 

जर तुम्ही अटी आधीच स्वीकारल्या असतील तर Settings > Account > Share my account info in the app येथे जाऊन तुम्हाला हा बदल करता येईल. यासाठी आपल्याकडे फक्त 30 दिवसांचा वेळ आहे.

एकूणच येत्या काही दिवसांत फेसबुकप्रमाणे व्हॉट्सऍपवरही जाहिराती व्यवसाय  करण्याची चिन्हं आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required