computer

शेफ स्वयंपाकात उंचावरून मीठ का टाकतात? हे आहे खरे आणि उपयोगी कारण!!

स्वयंपाक बनवताना तुम्ही भाजीमध्ये मीठ किती उंचीवरून टाकता? हा खूप बालिश प्रश्न वाटतोय ना, पण मग हा लेख जरूर वाचा. फक्त मीठच नाही तर इतर मसालेही एका ठराविक उंचीवरून पदार्थांमध्ये टाकल्यास तुमचे बनवलेले पदार्थ अधिक रुचकर होणार आहेत.

तुम्ही कोणत्याही शेफला प्रत्यक्षात किंवा टीव्हीवर पाहिलं असेल तो मीठ, मसाले किंवा कोणतेही seasoning करताना ठराविक उंचीवरून करतो. पाहताना असं वाटतं की ती त्याची स्टाईल आहे किंवा व्हिडिओत छान दिसण्यासाठी ते असं करत असावेत. पण यामागेही एक शास्त्रीय कारण आहे, जे आपण समजून घेणार आहोत.

शेफ नेहमी उंचावरून म्हणजे साधारण १०-१२ इंचावरून मीठ टाकतात, तेव्हा ते मीठ एकसमान पसरले जाते. म्हणजे पदार्थात पडल्यावर मीठ किंवा मसाला मोठ्या क्षेत्रात विखुरले जातात. यामुळे आपोआप त्या पदार्थात मीठ-मसाले एकसमान मिसळून पदार्थ अधिक चवदार बनतो. फक्त चमच्याने हलवून मिसळण्यापेक्षा तो आधीच व्यवस्थित मिसळला गेला तर पदार्थांमध्ये आतपर्यंत जातो आणि एक छान चव येते.

तुम्हीही हा प्रयोग करून पाहू शकता. फक्त एक चिमूटभर मीठ घ्या आणि ते सुमारे २ इंच (५ सेमी) उंचीवरून भुरभुरवा. नंतर आणखी एक चिमूटभर घ्या आणि १० इंच (२५ सेमी) उंचीवरून शिंपडा. तुमच्या लक्षात येईल की कुठल्या पद्धतीने मीठ एकसमान पसरते.

ही माहिती कशी वाटली? आवडल्यास शेअर करायला विसरू नका.

शीतल दरंदळे