computer

मेरठ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा शोध ... वायरलेस चार्जिंग स्टेशन्स!!

इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा ओढा वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती बघता ती संख्या वाढत जाणार हे स्पष्टच आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे पर्यावरण रक्षणास होणारी मदत हा देखील अनेकांचा या गाड्या घेण्यामागे हेतू असतो. पण अजूनही चार्जिंग आणि एका चार्जिंगमध्ये गाडी किती किलोमीटर्स जाऊ शकते या विषयामुळे लोक इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी मागेपुढे करतात. खरं पाहायला गेलं तर पुरेशी चार्जिंग स्टेशन्स अजूनही दिसत नाहीत.

चार्जिंग स्टेशन्स अधिकाधिक प्रमाणात वाढावेत अशी अपेक्षा केली जात असताना दोन मुलांनी एक वेगळीच डोक्यालिटी लढवून वायरलेस चार्जिंगचा पर्याय तयार केला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी येथे शिकणाऱ्या दोन तरुणांनी ही नामी टेक्नॉलॉजी तयार केली आहे. रोहित राजभर आणि सागर कुमार अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

 

रस्त्याच्या कडेला आपण अनेक मोबाईल टॉवर बघत असतो. त्यांच्या रेंजमध्ये असलो की मोबाईलला चांगले नेटवर्क असते. या मुलांनी तयार केलेली सिस्टम देखील काहीशी अशीच आहे. रस्त्याच्या कडेला टॉवर लावले जातील. इलेक्ट्रिक कारमध्ये एक रिसिव्हर लावले असेल. कार टॉवरच्या रेंजमध्ये आली की बॅटरी चार्ज होण्यास सुरुवात होईल.

सध्यातरी या रिसिव्हर्सची रेंज कमी आहे. या रिसिव्हरची रेंज वाढवण्यावर सध्या काम सुरू आहे. पूर्णपणे वायरलेस अशी ही चार्जिंग सिस्टीम असेल. या टेक्नॉलॉजीवर काम करणारा विद्यार्थी रोहित याने सांगितले की, "आपण यावर अनेक दिवसांपासून यावर काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण मोठ्या अडचणी आम्हाला येत होत्या. शेवटी आम्ही अटल इनोव्हेशन सेंटर(Atal Innovation Mission (AIM))सोबत संपर्क केला."

त्यांच्या या प्रोजेक्टची निवड झाली आणि त्यांना अनुदान मिळाले आणि खऱ्या अर्थाने मग त्यांचे काम सुरू झाले. या कामासाठी गरजेची असलेली लॅब त्यांना मिळाली आणि त्यांनी काम सुरू केले. मेरठ विद्यापीठाचे संशोधक महादेव पांडे यांनी सांगितले की 'ही टेक्नॉलॉजी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स सिस्टमच्या बेसवर काम करते. लोकांच्या सोयीच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचे काम ठरणार आहे.'

यया विद्यार्थ्यांनी बनवलेली ही टेक्नॉलॉजी खरोखर उपयुक्त सिद्ध होऊ शकते. कारण ना कुठे थांबून चार्जिंग करण्याची गरज. ना ऐनवेळी चार्जिंग संपण्याची भीती. यामुळे लोक निश्चित राहून इलेक्ट्रिक गाड्यांचा आनंद घेऊ शकतात. फक्त रिसिव्हरची रेंज वाढली तर देशभर असे टॉवर येत्या काळात उभे राहिलेले दिसू शकतात.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required