संमोहनाने स्टॅलिनची मति गुंग करत धक्के देणारा, हिटलरच्या तावडीतून निसटून जाणारा वूल्फस मॅसिंग!! याची गोष्ट सॉलीड मजेदार आहे!
वर्ष १९१०. जर्मनीमधून चाललेल्या एका ट्रेनमध्ये एक दहा पंधरा वर्षाचा मुलगा विनातिकीट प्रवास करत होता. घरातून पळून आल्यामुळे त्याच्याकडे पैसेच नव्हते. तर तिकीट कुठून मिळणार? एका डब्यामध्ये बाकड्याखाली तो गप्प बसून राहिला होता, जेणेकरून त्याचं अस्तित्व फारसं कुणाला जाणवणार नाही. पण नंतर टीसीने त्या डब्यात प्रवेश केला. एकेकाची तिकीटं तो तपासायला लागला. जवळ आल्यावर त्याच्या बुटांचा टॉक टॉक आवाज वाढत होता आणि त्याच्याबरोबर या छोट्या मुलाचं टेन्शनही. त्याने श्वास रोखून धरला होता. बाहेरची थंडी आणि भीती या दोन्हींमुळे त्याला चांगलीच हुडहुडी भरली होती. डोळे मिटून तो ख्रिस्ताचा धावा करत होता. जणू त्याने डोळे मिटल्याने तो अदृश्य होणार होता! पण टीसीच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. "पोरा, तिकीट कुठे आहे?" टीसीने त्याला विचारलं. पुढचे दोन क्षण कमालीची शांतता.. या मुलाची ॲड्रीनॅलिनची पातळी सरासर वर गेली. आपल्याला शिक्षा झाल्याच्या नुसत्या कल्पनेने त्याला कापरं भरलं. तितक्यात त्याला समोर एक कागदाचा तुकडा दिसला. तो एका वर्तमानपत्राच्या कागदाचा तुकडा होता. तरी हिंमत करून त्याने तो उचलला. डोळे मिटून जणूकाही हेच तिकीट आहे असं मनोमन मानलं आणि तो तुकडा त्याने टीसीच्या हातात दिला. परत एकदा ख्रिस्ताचा दावा -"प्रभू, या टीसीला या कागदाच्या तुकड्यात तिकीट दिसू देत..." आणि काय आश्चर्य! प्रभू मदतीला धावला! टीसीने शांतपणे तो तुकडा पंच केला आणि त्याच्याकडे परत दिला. वर म्हणाला देखील, "पोरा तुझ्याकडे तिकीट आहे तर असा चोरासारखा खाली का बसून राहिला आहेस?"
बस... हा एकच क्षण. वुल्फस मॅसिंग नावाच्या त्या मुलाच्या आयुष्याला इथूनच कलाटणी मिळाली. त्यानंतर पुढची पन्नास वर्षं तो जगातला एक अत्यंत महत्वपूर्ण मनुष्य म्हणून वावरत होता. एका वाक्यात वर्णन करायचं तर तो जागतिक कीर्तीचा हिप्नॉटिस्ट म्हणजेच संमोहनतज्ञ होता. भल्याभल्यांच्या मनावर ताबा मिळवण्याची कला त्याला अवगत होती. आपल्या अंगच्या या कलेचा शोध त्याला 'त्या' रेल्वे प्रवासाच्या दरम्यान लागला होता.
त्याचा जन्म पोलंडमध्ये झाला. त्यावेळी पोलंड हा रशियाचा भाग होता. त्याने रब्बाय म्हणजे ज्युईश लोकांचा धर्मगुरु व्हावं असं आईवडलांना वाटायचं. त्यामुळे त्यांनी त्याला सेमिनरीमध्ये पाठवलं. पण त्याला यात रस वाटेना. त्याला वाटायचं, आपल्याला आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं आहे. मग त्याने पळून जायचं ठरवलं आणि 'त्या' ट्रेनने तो बर्लिनला आला. सुरुवातीला पडेल ती कामं केली. नंतर एका सर्कशीत काम केलं. समोरच्याला वश करण्याखेरीज मॅसिंग इतरही काही कामांत निपुण होता. हरवलेल्या वस्तू शोधणं, जादूचे प्रयोग आणि भविष्य सांगणं यात तो पटाईत होता. पण त्याची खासियत म्हणजे संमोहन. त्याच्या मते तो समोरच्याला सहजपणे सूचना देऊ शकत असे आणि त्याच्या जाणिवांचा ताबा घेत असे.
अर्थातच जग त्याच्या अंगी असलेलं कौशल्य असं सहजासहजी स्वीकारणार नव्हतं. अनेकांनी त्याला यासंबंधी आव्हानं दिली. स्टॅलिन, आईन्स्टाईन, महात्मा गांधी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी त्याच्या कौशल्याचा अनुभव घेतलेला आहे. मनोमन त्याला दादही दिली आहे. आईन्स्टाईन आणि सिग्मंड फ्रॉइड हे तर त्याचे मित्र होते.
खुद्द हिटलरच्या हातावर तुरी देऊन मॅसिंग पळाल्याचा किस्सा तर खूपच प्रसिद्ध आहे. हिटलरचं भविष्य त्याने वर्तवलं होतं. त्यानुसार हिटलरने जर पूर्वेकडच्या देशांविरुद्ध युद्ध पुकारलं तर त्याचा मृत्यू अटळ होता. यामुळे चिडून हिटलरने त्याचं मुंडकं कापून आणेल त्याला बक्षीस जाहीर केलं होतं. तसा तो पकडला गेलाही. पण त्याला पकडणाऱ्या सैनिकांना त्याने सूचना दिल्याने ते स्वतःच नकळत तुरुंगाच्या खोलीत शिरले आणि अडकले. त्यांना बंद करून मॅसिंग सोव्हिएत सीमेकडे पळून गेला.
मॅसिंगची परीक्षा घेणाऱ्यांमध्ये एक महत्त्वाचं नाव होतं ते रशियाचे अध्यक्ष स्टॅलिन यांचं. स्टॅलिन हा रशियन हुकूमशहा होता. त्याने एक दिवस मॅसिंगला चक्क तो प्रयोग करत असताना किडनॅप केलं आणि आपल्यासमोर हजर व्हायला लावलं. त्याला त्याने सांगितलं की त्याचा या असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. एक मनुष्य दुसऱ्या माणसाच्या मनाचा ताबा असा कसा घेऊ शकेल? आणि असं जर असेल तर मग तो माणूस माणूस राहणारच नाही; तो केवळ एक निर्जीव बाहुला बनेल. पुढे स्टॅलिनने त्याला हे सिद्ध करून दाखवण्याचं आव्हान दिलं.
मग स्टॅलिनने त्याच्यासमोर आपला प्रस्ताव ठेवला. तो असा होता : मॅसिंगने दुसऱ्या दिवशी स्टॅलिनच्या दोन माणसांना घेऊन मॉस्कोमधल्या बँकेत जायचं आणि तिथल्या क्लर्कला हिप्नोटाइज करून १ लाख रुबल्स काढून दाखवायचे. त्याप्रमाणे मॅसिंग दुसऱ्या दिवशी बँकेत गेला. त्याला थेट खजिनदाराच्या समोरच नेण्यात आलं. तिथे मॅसिंगने त्याच्या हातात एक कोरा कागद दिला. ट्रेझररने तो नीट निरखून पाहिला. चष्मा लावून आणि काढून त्याच्यावरती रक्कम तपासली आणि शांतपणे १ लाख रुबल्स काढून त्याच्या हातात दिले.
मॅसिंगने ती रक्कम स्टॅलिनकडे सुपूर्द केली. स्टॅलिनला आश्चर्याचा धक्का बसला. नंतर मॅसिंग ते पैसे घेऊन परत बँकेत गेला आणि ते पैसे त्याने त्या खजिनदाराला परत केले. मग त्याने त्याच्याकडे आपला कागद परत मागितला. खजिनदाराने पाहिला तर तो कोरा होता. आता धक्का बसण्याची पाळी या खजिनदाराची होती. हा धक्का इतका तीव्र होता की त्या माणसाला आपल्याला हार्ट अटॅक येतो की काय अशी शंका आली. पण स्टॅलिन इतका सहज विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्याला वाटलं, कदाचित बँकेतल्या लोकांना त्याने आधीच मॅनेज केलं असेल. म्हणून त्याने अजून एक आव्हान ठेवलं.
त्यासाठी त्याला क्रेमलीनमधल्या एका खोलीत बंद केलं गेलं. बाहेर हजारो सशस्त्र सैनिकांचा पहारा होता. स्टॅलिनने त्याला सांगितलं की बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी त्याने या सैनिकांचा अभेद्य पहारा तोडून बाहेर यावं. मॅसिंगने ते पण करून दाखवलं. स्टॅलिन अवाक्.
स्टॅलिन ज्या कम्युनिझमला मानत होता त्यामध्ये या असल्या गोष्टींना थारा नव्हता. पण तरीही तो प्रभावित होऊ लागला. आता त्याने अजून एक परीक्षा ठेवली. मॅसिंगने रात्री बारा वाजता स्टॅलिनच्या खोलीत जायचं. ही गोष्ट महाकठीण होती. स्टॅलिन हा त्यावेळी पृथ्वीतलावर सर्वात जास्त सुरक्षा बाळगून असणारा मनुष्य होता. क्रेमलीनमधील त्याच्या खोलीचा नंबरही रोज बदलायचा. तो कुठल्या खोलीत झोपणार आहे हे बाहेरच्या पहारेकऱ्यांना, इतकंच काय त्याच्या बायकोलाही, माहीत नसायचं. हे आव्हान पार करून त्याची खोली बरोबर शोधून काढणं हेच मोठं दिव्य होतं. पण बारा वाजले आणि मॅसिंग त्याच्या खोलीत हजर झाला.
आता मात्र स्टॅलिन थोडासा घाबरला. मग त्याला कळलं, मॅसिंगने बाहेरच्या पहारेकऱ्यांना आपण बेरिया आहोत असं सांगितलं होतं. हा बेरिया त्यावेळी रशियामध्ये स्टॅलिनच्या खालोखाल महत्त्वाचा मनुष्य होता. त्यामुळे त्याला सहज प्रवेश मिळू शकला होता.
आता मात्र स्टॅलिनचा थोड्याफार प्रमाणात विश्वास बसू लागला होता. या शक्तीचा वापर युद्धात होऊ शकतो असंही त्याला वाटत होतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या देशाकडे अण्वस्त्रं असतील तर त्या नेत्यांना अशा प्रकारे वश करायचं की ते लोक आपली शस्त्रं आपल्याच देशावर टाकतील किंवा युद्धाच्या वेळी पायलटच्या मनाचा ताबा घेऊन त्याला विमान त्याच्याच देशाकडे वळवायला लावून हल्ला करण्यास भाग पाडायचं. परंतु स्टॅलिनच्या दुर्दैवाने आणि जगाच्या सुदैवाने ही गोष्ट प्रत्यक्षात आली नाही. नाहीतर मोठा अनर्थ झाला असता. असलं काही करायच्या आधीच स्टॅलिन ख्रिस्ताघरी गेला.
मॅसिंगला आयुष्याच्या शेवटी शेवटी अनेक विकारांनी ग्रासलं. आपला अंत जवळ आल्याचं त्याला जाणवत होतं. त्याला शस्त्रक्रियेसाठी घेऊन जात असताना त्याचे शब्द होते: वूल्फ, सगळं संपलंय. ही जागा तू परत कधीही पाहणार नाहीस. आणि खरोखर हे भविष्य खरं ठरलं.
स्मिता जोगळेकर




