computer

विचित्र कारणांसाठी 'आयपीएल'मधून हाकलले गेलेले ५ खेळाडू !!

आयपीएल अशी स्पर्धा आहे ज्यात खेळाडूंना आपली क्षमता दाखवून स्वतःला सिद्ध करायचे असते. खेळाडू मग स्वतःला या खेळात पूर्ण झोकून देतात. याच कारणाने आयपीएल मोठ्या प्रमाणात रोमांचक झालेली पाहायला मिळते. या स्पर्धेत तरुण खेळाडूंचा भरणा मोठ्या प्रमाणावर असतो. नव्या दमाचे हे खेळाडू अनेक धाडसी प्रयोग आपल्या खेळात करत असतात. पण हे धाडस कधी कधी चुकीच्या गोष्टींसाठी देखील असते. यामुळे त्यांना घरी बसण्याची सुद्धा वेळ येते. आयपीएलमध्ये काही खेळाडूंना आपल्या आगाऊपणामुळे बंदीची शिक्षा भोगावी लागली आहे. अशाच खेळाडूंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

१. ल्युक पोमर्सबॅक

ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू २००८ पासून आयपीएलमध्ये खेळत होता. २००८-०९ मध्ये तो पंजाबकडून खेळला. पुढे त्याला आरसीबीने विकत घेतले. या काळात तो चांगला खेळत होता, पण २०१२ साली एका महिलेसोबत हॉटेलमध्ये गैरवर्तन केले म्हणून त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. त्याला जामिनावर सोडण्यात आले, तरी आरसीबीने पूर्ण सिझन त्याच्या खेळावर बंदी घातली. पुढच्या सिझनमध्ये त्याने पुनरागमन केले, पण त्याला विशेष कामगिरी दाखवता आली नाही. नंतर तो क्रिकेट विश्वातून पूर्णपणे गायब झाला. परत सापडला तो चोरी करताना पकडला गेला म्हणून. राहायला घर नसल्याने कारमध्ये दिवस काढण्याची आणि चोऱ्या करण्याची वेळ त्याच्यावर येऊन ठेपली होती.

२. मोहम्मद असिफ

२००८च्या पहिल्या सिजनमध्ये सर्व पाकिस्तानी खेळाडू खेळले होते. त्यात मोहम्मद असिफ या वेगवान बॉलरला दिल्ली डेयरडेव्हील्सने ग्लेन मॅकग्राला साथ देण्यासाठी विकत घेतले होते. मोहम्मद असिफने त्याच्या तुफान बॉलिंगसाठी मोठी हवा केली होती. भल्याभल्या खेळाडूंना गुंगारा देत त्याने फेकलेला बॉल दांड्या उडवत होता. पण गडी ड्रग्स प्रकरणात सापडला. पोलिसांना त्याच्या लघवीत ड्रग्सचे सॅम्पल आढळून आले. मग काय दिल्लीने त्याला टीममधून काढले आणि वर्षभरासाठी बंदी घालून सरळ घरी पाठवले. पठ्ठ्या परत जात असताना त्याच्याकडे पुन्हा ओपियम सापडले. पुढे २६/११ चा हल्ला झाला आणि पूर्ण पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतात खेळण्यावर बंदी आली. आजही त्यांना दुरून आयपीएल बघावे लागते, कारण त्यांना आयपीएलमध्ये नो एन्ट्री आहे.

३. रविंद्र जडेजा

जडेजाने २००८ च्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगने धुमाकूळ घातला होता. आयपीएल सुरू झाल्यावर राजस्थान रॉयल्ससाठी शेन वॉर्नने त्याला ठेऊन घेतले होते. राजस्थानसाठी देखील त्याने चमकदार कामगिरी केली. पण पैशाच्या लोभापायी गडी ३ वर्षाचा काँट्रॅक्ट पूर्ण होण्याआधीच दुसऱ्या टीममध्ये जाण्यासाठी प्रयत्न करायला लागला. हा आयपीएलच्या नियमांचा भंग होता. मग काय जडेजाला पण वर्षभरासाठी घरी बसवण्यात आले. 

 

भल्याभल्यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवणाऱ्या जडेजाची आयपीएलमधून हकालपट्टी का झाली होती?

४. प्रवीण तांबे 

प्रवीण तांबे या खेळाडूची स्टोरी इंटरेस्टिंग आहे. ज्या वयात लोक क्रिकेट सोडून दुसऱ्या कामधंद्याला लागतात, त्या वयात भावाला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. २०१३ साली वयाच्या ४२ व्या वर्षी तो आयपीएलच्या मैदानात उतरला. तोवर तो मुंबईत क्लब मॅचेस खेळत होता. या वयात देखील त्याने करिष्मा दाखवायला सुरुवात केली. २०१४ साली त्याने कोलकाता विरुद्ध हॅट्ट्रिक घेतली आणि भावाने जोरदार हवा केली. पूर्ण सिजन त्याने चांगलाच गाजवला. त्याने नंतर गुजरात लायन्स, हैदराबाद, असा प्रवास केला. 

गेल्या वर्षी त्याला वयाच्या ४८व्या वर्षी कोलकाताने विकत घेतले. सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून त्याची ओळख झाली. पण एका विचित्र कारणाने त्याच्या बंदी घालण्यात आली. बीसीसीआयचा एक नियम आहे, निवृत्त होण्याआधी कोणत्याही परदेशी स्पर्धेत भाग घेण्याआधी खेळाडूंना बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते. प्रवीण तांबे यूएईत झालेल्या एका स्पर्धेत विना परवानगी खेळून आला होता. म्हणून त्याला बंदीचा सामना करावा लागला.

 

२ बॉलवर ३ विकेट घेणारा बहाद्दर....निवृत्त होण्याच्या वयात त्याने मैदान गाजवले होते!!

५. हरभजन सिंग

टर्मिनेटर, भज्जी अशा नावांनी प्रसिद्ध असलेला हरभजन सिंग आपल्या तापट स्वभावासाठी प्रसिध्द आहे. २००७-०८ दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्याचा आणि अँड्रू सायमंडसमध्ये वाद झाला होता. त्याच्या या रागीट स्वभावाचा अनुभव त्याच्या इतकाच तापट असलेल्या श्रीसंतला देखील भोगावा लागला. आम्ही त्याच प्रसिद्ध 'थप्पड की गुंज' घटनेबद्दल बोलत आहोत, हे तुम्हाला कळले असेलच. श्रीसंत पंजाबकडून खेळत होता तर हरभजन मुंबईकडून. ज्या सामन्यात ही घटना घडली तेव्हा सचिन जखमी असल्याने हरभजन कॅप्टन होता. श्रीसंतने चिडवले म्हणून चिडलेल्या हरभजनने थेट त्याच्या कानाखाली वाजवली. नंतर श्रीसंतचा रडण्याचा फोटो जगभर वायरल झाला होता. पण थापडीमुळे मात्र हरभजनला बंदीचा सामना करावा लागला.

सबस्क्राईब करा

* indicates required