वाढदिवस विशेष : एकाच डावात १० गडी बाद करण्यासह अनिल कुंबळेंच्या नावे आहे 'या' विक्रमांची नोंद...
क्रिकेटच्या इतिहासात अनेक दिग्गज फिरकी गोलंदाज होऊन गेले. त्यापैकीच एक गोलंदाज म्हणजे भारतीय संघाचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे. सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असणारे अनिल कुंबळे आज (१७ ऑक्टोबर) आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनिल कुंबळे यांचा जन्म १७ ऑक्टोबर, १९७० रोजी बंगळुरू येथे झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात १० गडी बाद करण्याचा विक्रम हा अनिल कुंबळेंच्या नावे आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या नावे आणखी काही खास विक्रमांची नोंद आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेऊया त्यांच्या काही खास विक्रमांबद्दल.
कसोटी सामन्यातील एकाच डावात घेतले होते १० बळी...
१९९९ मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर (अरुण जेठली स्टेडियम) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना पार पडला होता. या सामन्यात अनिल कुंबळे यांनी अप्रतिम गोलंदाजी करत एकाच डावात १० गडी बाद केले होते. असा पराक्रम करणारे ते भारताचे पहिले आणि क्रिकेट इतिहासातील दुसरे गोलंदाज ठरले होते. यापूर्वी इंग्लिश गोलंदाज जिम लेकरने हा पराक्रम केला होता.
कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज..
अनिल कुंबळे हे कसोटी क्रिकेटमध्ये संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज आहेत. त्यांनी १३२ कसोटी सामन्यांमध्ये २९.६५ च्या सरासरीने ६१९ गडी बाद केले आहेत. तर एकूण कसोटी क्रिकेटमध्ये ते सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी त्यांनी २७१ सामन्यांमध्ये ३०.८९ च्या सरासरीने ३३७ गडी बाद केले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरे सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज...
कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे यांनी ३०.०९ च्या सरासरीने एकूण ९५६ गडी बाद केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ते तिसऱ्या स्थानी आहेत. या यादीत श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन सर्वोच्च स्थानी आहे. मुथय्या मुरलीधरनने सर्वाधिक १३४७ गडी बाद केले होते. तर १००१ गडी बाद करत शेन वॉर्न दुसऱ्या स्थानी आहे.
गोलंदाजी सह अनिल कुंबळे उत्तम फलंदाज देखील होते. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना २५०६ धावा केल्या होत्या. २००७ मध्ये त्यांनी इंग्लंड संघाविरुद्ध फलंदाजी करताना कसोटी कारकिर्दीतील एकमेव शतक झळकावले होते.




