Babar Azam Birthday Special: खास विक्रमांच्या बाबतीत विराट कोहली अन् रोहितलाही देतो टक्कर; पाहा विक्रमांची यादी...
पाकिस्तान संघाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज बाबर आजमसाठी (Babar Azam) आजचा (१५ ऑक्टोबर) दिवस अतिशय खास आहे. आज तो आपला २८ वा वाढदिवस साजरा करतोय. त्याचा जन्म १५ ऑक्टोबर १९९४ रोजी लाहोरमध्ये झाला होता. अनेक मोठ मोठ्या विक्रमांच्या बाबतीत तो रोहित शर्मा आणि विराट कोहली पेक्षा देखील पुढे आहे. यावरून आपण त्याच्या क्षमतेचा अंदाज लावू शकतो. केवळ हेच एक कारण नाहीये, तर त्याने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. चला तर पाहूया त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही खास विक्रमांबद्दल अधिक.
कसोटी पदार्पणात दमदार अर्धशतकी खेळी..
बाबर आजमने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात ३१ मे २०१५ रोजी झिम्बाब्वे विरुध्द झालेल्या वनडे सामन्यातून केली होती. तर पहिला टी -२० आंतरराष्ट्रीय सामना त्याने ७ सप्टेंबर रोजी २०१६ रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळला होता. याच वर्षी त्याची पाकिस्तानच्या कसोटी संघात निवड करण्यात आली होती. वेस्ट इंडिज विरुध्द झालेल्या सामन्यात त्याने कसोटी पदार्पण केले होते. मिस्बाह अल हकच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याने ६९ धावांची तुफानी खेळी केली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबर आजमची कामगिरी..
बाबरने टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४३.६६ च्या सरासरीने ३२३१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि २९ अर्धशतके झळकावली आहेत.
बाबरने वनडेमध्ये ५९.७९ च्या सरासरीने ४,६६४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १७ शतके आणि २२ अर्धशतकांची नोंद आहे.
तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ४७.३० च्या सरासरीने ७ शतके आणि २३ अर्धशतके झळकावली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबरच्या नावावर एकूण ११,०१७ धावा आहेत.
या विक्रमांच्या बाबतीत बाबर सर्वात पुढे..
बाबर आजम एका वनडे मालिकेत सर्वाधिक शतके (६ शतके) झळकावणारा फलंदाज आहे.
कर्णधार म्हणून सर्वाधिक टी -२० (४८) सामने खेळणारा कर्णधार आहे.
क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये तो सर्वात जलद ३००० धावा करणारा फलंदाज आहे.
सलग ९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तो ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा एकमेव फलंदाज आहे.
बाबर आजम यावेळी देखील आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचे नेतृत्व करणार आहे. गतवर्षी झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता.




