गौतम गंभीर बोले तो विषय गंभीर!! बड्डेदिनी पाहा गंभीरचे गाजलेले ३ किस्से...

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) साठी आजचा दिवस अतिशय खास आहे. आज (१४ ऑक्टोबर) गौतम गंभीर आपला ४१ वा वाढदिवस साजरा करतोय. १९८१ मध्ये जन्मलेल्या गौतम गंभीरने आपल्या कारकीर्दीत अनेकदा भारतीय संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली आहे. २०११ चा वनडे विश्वचषक असो किंवा २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धा, दोन्ही स्पर्धांमध्ये गौतम गंभीरने मोलाची भूमिका बजावली होती. आपल्या फलंदाजीसह तो तापट स्वभावासाठी देखील अनेकदा चर्चेत आला आहे. मुख्य म्हणजे सामना पाकिस्तान संघाविरुध्द असल्यास गौतम गंभीरचे रौद्ररूप पाहायला मिळायचे. आज आम्ही तुम्हाला अशा ३ घटना सांगणार आहोत, जेव्हा पाकिस्तान संघाला गौतम गंभीरचे रौद्ररूप पाहायला मिळाले होते.

२००७ मध्ये तोडले पाकिस्तानचे स्वप्नं...

जेव्हा जेव्हा आपण आयसीसी टी -२० विश्वचषक २००७ स्पर्धेचा उल्लेख करतो त्यावेळी आपल्या समोर युवराज सिंगचे ६ षटकार आणि जेतेपद मिळवल्याचे चित्र उभे राहते. मात्र या पलीकडे देखील खूप काही घडलं होतं, जे आपण विसरू शकत नाही. भारतीय संघ जेव्हा फलंदाजी करण्यासाठी उतरला त्यावेळी संघातील मुख्य फलंदाज बाद होऊन माघारी परतले होते. मात्र गौतम गंभीर खेळपट्टीवर टिकला आणि ५४ चेंडूंमध्ये ७५ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला १५७ धावा करण्यात यश आले होते. हा सामना भारतीय संघाने ५ धावांनी आपल्या नावावर केला होता. जर गौतम गंभीरने महत्वपूर्ण खेळी केली नसती, तर कदाचित भारतीय संघ ऐतिहासिक विजय मिळवू शकला नसता.

गंभीर सोबत नडणं आफ्रिदीला पडलं महागात..

गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात २००७ मध्ये कानपूरच्या मैदानावर झालेली लढत सर्वांना नेहमी लक्षात राहील. या सामन्यात शाहिद आफ्रिदीने असे काही केले होते, ज्यामुळे गौतम गंभीर केवळ संतापला नव्हता तर त्याने शाहिद आफ्रिदीला खूप काही ऐकवलं देखील होतं. तर झाले असे की, गौतम गंभीरने चौकार मारल्यानंतर शाहिद आफ्रिदी तापला होता. त्यामुळे बदला घेण्यासाठी तो धाव पूर्ण करत असलेल्या गंभीरच्या वाटेत येत होता. त्यानंतर दोघांमध्ये सुरू असलेलं प्रकरण इतकं वाढलं होतं की, शेवटी पंचांना मध्यस्थी करावी लागली होती.

अकमलला घडवली होती अद्दल...

ही घटना २०१० आशिया चषक स्पर्धेतील आहे. यष्टीमागे उभा असलेला कामरान अकमल सतत अपील करून गौतम गंभीरला बाद करण्यासाठी पंचांवर दबाव टाकत होता. या सामन्यात भारतीय संघ २६८ धावांचा पाठलाग करत होता. गौतम गंभीर उत्तम फलंदाजी करत होता. त्यावेळी सईद अजमल गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याच्या गोलंदाजीवर कामरान अकमलने जोरदार अपील केली. हे षटक संपल्यानंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक झाला, त्यावेळी गौतम गंभीर आणि कामरान अकमल यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. 

भारतीय संघाला २०११ वनडे विश्वचषक स्पर्धेत आणि २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवून देण्यात गौतम गंभीरने मोलाची भूमिका बजावली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required