हे आहेत IPL स्पर्धेत सर्वाधिक वेळेस क्लीन बोल्ड झालेले महारथी... अंदाज लावा कोण कोण असेल यादीत..

आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. यादरम्यान जे काही पाहायला मिळालं आहे ते आजवर कधीच घडलं नव्हतं. जे संघ आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करत होते, ते संघ या हंगामात पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. तर नवखे संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे दिग्गज फलंदाज देखील या हंगामात पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. विराट कोहली या हंगामात दोन वेळेस गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला आहे. दरम्यान या लेखातून आम्ही त्या फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांच्या नावे आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस त्रिफळाचित होण्याचा विक्रम आहे.
१) विराट कोहली ( Virat Kohli)

या यादीत सर्वोच्च स्थानी आहे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माजी कर्णधार विराट कोहली. आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीच्या नावे अनेक मोठमोठ्या विक्रमांची नोंद आहे. त्यापैकीच एक म्हणजे सर्वाधिक वेळेस त्रिफळाचित होण्याचा विक्रम. आतापर्यंत तो आयपीएल स्पर्धेत ३६ वेळेस त्रिफळाचित झाला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण २१८ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने १२९.२६ च्या स्ट्राइक रेटने एकूण ६४९९ धावा केल्या आहेत. यात ५ शतक आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे.
२) शिखर धवन ( Shikhar Dhawan)

या यादीत दुसऱ्या स्थानी आहे भारतीय संघाचा गब्बर म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन. आयपीएल २०२२ स्पर्धेत तो पंजाब किंग्स संघासाठी अप्रतिम कामगिरी करत आहे. शिखर धवन आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस त्रिफळाचित होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तो आतापर्यंत एकूण ३५ वेळेस त्रिफळाचित होऊन माघारी परतला आहे. शिखर धवनने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण २०२ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १२६.५१ च्या स्ट्राइक रेटने ६१५२ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ शतक आणि ४७ अर्धशतक झळकावले आहेत.
३) शेन वॉटसन (Shane Watson)

या यादीत तिसऱ्या स्थानी आहे ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फलंदाज शेन वॉटसन. आयपीएल स्पर्धेत त्याने राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये तो एकूण ३५ वेळा त्रिफळाचित होऊन माघारी परतला आहे. तसेच त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १४५ सामन्यात १३७.९१ च्या स्ट्राइक रेटने ३८७४ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ४ शतक आणि २१ अर्धशतक झळकावले होते.
आता या यादीत आणखी कोण कोण येतं हे पुढचे सामने ठरवतीलच...