computer

दिनविशेष : अरबी समुद्रात सिक्सर मारणारा तडाखेबाज क्रिकेटर संदीप पाटील!!

संदीप पाटील नावाच्या मराठमोळ्या क्रिकेटपटूचा आज वाढदिवस!!! आपल्या स्टाईलने अनेकांना भुरळ घालणाऱ्या संदीप पाटीलने केलेला मुंबईतले शिवाजी पार्क ते भारतीय निवड समिती अध्यक्षाचा प्रवास कौतुकास्पद आहे.

मुंबईने अनेक धुरंधर क्रिकेटर देशाला दिले, त्यातलेच एक नाव म्हणजे संदीप पाटील!!! संदीप पाटीलचा जन्म १८ ऑगस्ट १९५६चा. मुंबईचा मुलगा आणि तोडफोड बॅटिंग नसली तर नवलच!! या गड्याने एकाच सीझनमध्ये तब्बल १०२ सिक्स ठोकले होते.

संदीप पाटीलच्या बॅटिंगचा तत्कालीन बॉलर्सनी अक्षरश धसका खाल्ला होता. तो आला म्हणजे धुवांधार बॅटिंग झालीच म्हणून समजा!! एकदा मरीन ड्राइव्हनजिकच्या पारशी जिमखान्यात बॅटिंग करत असताना या भावाने मारलेला सिक्स चक्क अरबी समुद्रात जाऊन पडला होता.

त्याच्या बॅटिंगची दहशत जबरदस्त होती. सहा बॉल्सवर सहा चौकार मारण्याचा विक्रम देखील संदीप पाटीलच्या नावावर आहे. या भावाने टेस्ट मॅचमध्ये सहा बॉल्सवर सहा चौकार मारले होते.

त्याचा करिष्मा फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नव्हता. भारतीय टीमकडून क्रिकेट खेळण्याआधी तो नॅशनल लेव्हलचा बॅटमिंटन प्लेयर होता. तसेच टेनिस आणि फुटबॉलसुद्धा तो चांगला खेळत असे. यावरूनच कळते की संदीप पाटील आणि खेळ हे समीकरण किती अतूट आहे.

संदीप पाटीलचे वडील देखील फर्स्ट क्लास क्रिकेट प्लेयर होते. वडिलांचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न मुलाने पूर्ण केले. १९८३ सालच्या विश्वविजेता टीमचासुद्धा तो महत्वाचा खेळाडू होता. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमधील त्याची वादळी ३२ बॉल्समध्ये ५२ रन्सच्या खेळीने भारताला सेमिफायनलध्ये विजय मिळवून दिला होता. त्याकाळी एवढी मुसळधार आणि तडाखेबाज बॅटिंग क्वचितच कोणी करीत असे.

संदीप पाटीलने क्रिकेटबरोबरच मोठ्या स्क्रीनवरसुद्धा आपली छाप सोडली आहे. 'कभी अजनबी थे' नावाच्या सिनेमात पूनम ढिल्लोंबरोबर तो रोमान्स करताना दिसला होता. या सिनेमाची विशेष गोष्ट म्हणजे यात व्हिलन म्हणून आणखी एक क्रिकेटर सय्यद किरमानी यांनी भूमिका केली होती.

आजच्या दिवशी संदीप पाटीलना बोभाटाकडून वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा!!

सबस्क्राईब करा

* indicates required