computer

सातच्या आत घरात, लय भारी, दृश्यम ते भावेश जोशी!!निशिकांत कामतांच्या कामाची व्याप्ती तर पाहा!!

काही सिनेमे असे असतात जे त्यातील नायकामुळे प्रसिद्ध होतात. अशा सिनेमांमध्ये शक्यतो एक प्रसिद्ध नट (मेगा स्टार) असतो. कथा शक्यतो फुल्टू कमर्शियल, गल्लाभरू असते. बॉक्स ऑफिसवर तो तुफान चालतो किंवा आपटतोही. त्या सिनेमाचा विषय निघाल्यावर 'अरे त्या अमुक अमुक हिरोचा पिच्चर' असा उल्लेख होतो. त्या सिनेमांचा दिग्दर्शक कोण असतो हे आपल्याला गुगल केल्यावरच समजतं. पण चित्रपट यशस्वी करण्यासाठी फक्त त्या हिरोचा चेहरा पुरेसा नसतो तर त्या दिग्दर्शकाचं कसब महत्त्वाचं असतं. दुर्दैवाने असे दिग्दर्शक फारसे लोकांना माहित नसतात. निशिकांत कामत हे अशा दिग्दर्शकांच्या यादीतील नाव. काल त्यांचं निधन झालं. 

हिंदी, मराठी आणि तामिळ अशा तीन भाषांमध्ये त्यांचं करियर पसरलंय. कोणकोणते सिनेमे केले त्यांनी? मराठीत सातच्या आत घरात, डोंबिवली फास्ट, लय भारी, हिंदीत दृश्यम, फोर्स, मदारी. 

या यादीतील अर्ध्याहून अधिक सिनेमे हे आपण सगळ्यांनीच पहिले असतील. डोंबिवली फास्ट तर मराठीतला अत्यंत गाजलेला सिनेमा. त्या सिनेमाला २००५ चा सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कारही  मिळाला. डोंबिवली फास्टनंतर निशिकांत कामत यांनी इरफान खानला घेऊन मुंबई मेरी जान तयार केला. तो फारसा चालला नाही, हा मधला काळ थोडा संथ होता.

त्याच दरम्यान डोंबिवली फास्टचा तामिळ रिमेक स्वतः निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर त्यांनी २०११ साली जॉन अब्राहमचा माचो लुक प्रसिद्ध करणारा फोर्स दिग्दर्शित केला. हा सिनेमाही बॉक्सऑफिसवर कमाल करू शकला नाही, पण २०१४ साली आलेल्या लय भारीने जादू केली. मराठीत कमर्शियल सिनेमे कमी आणि कलात्मक सिनेमेच जास्त तयार होतात या समजुतीला फाटा देत लय भारी मराठीतला ब्लॉकबस्टर ठरला. दिग्दर्शन, संवाद, कथा सगळंच लय भारी. 

हे करत असताना निशिकांत कामत अभिनयातही मागे नव्हते. डॅडी, फुगे, रॉकी हँडसम, भावेश जोशी सारख्या सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. 

सिनेमा हा एक व्यवसाय मानला तर निशिकांत कामत हे एक यशस्वी दिग्दर्शक आणि अभिनेते होते यात वादच नाही. लय भारी असो किंवा दृश्यम, या सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. एका मोठ्या प्रेक्षकवर्गाचं मनोरंजन करणारा दिग्दर्शक आज आपल्यातून गेला आहे. त्यानिमित्ताने त्यांचे गाजलेल्या ५ सिनेमांची यादी आम्ही तुमच्या समोर ठेवत आहोत. यातला तुमचा आवडता सिनेमा कोणता हे आम्हाला नक्की सांगा. 

१. डोंबिवली फास्ट

२. दृश्यम

३. लय भारी

४. मदारी

५. फोर्स 

निशिकांत कामत जाण्यापूर्वी दरबार नावाच्या त्यांच्या सिनेमावर काम करत होते. हा सिनेमा २०२२ साली रिलीज होणार होता. आता ती आशा मावळली आहे.

बोभाटातर्फे निशिकांत कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सबस्क्राईब करा

* indicates required