३० वर्षांपूर्वी शेन वॉर्नने टाकला होता जादुई चेंडू; पाहा ' बॉल ऑफ द सेंच्युरी'ची एक झलक...

Subscribe to Bobhata

४ जून १९९३ हा तोच दिवस आहे ज्या दिवशी लेग स्पिन गोलंदाजीचा जादूगार म्हटल्या जाणाऱ्या शेन वॉर्नने (Shane Warne) अप्रतिम चेंडू टाकला होता. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने असा काही चेंडू टाकला होता की, फलंदाजी करत असलेल्या माईक गॅटिंगसह संपूर्ण क्रिकेट विश्व आश्चर्यचकित झाले होते. अनेकांना हे खरं वाटत नव्हतं. मात्र जादूगार अशाच गोष्टी करून दाखवण्यासाठी प्रसिद्ध असतात ज्या अनेकांना असंभव वाटतात. शेन वॉर्नने टाकलेल्या या चेंडूला 'बॉल ऑफ द सेंच्युरी' देखील म्हटले गेले होते.(Shane Warne ball of the century)

ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळत असते. या मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २८९ धावा केल्या होत्या. तर इंग्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना शेन वॉर्नच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २१० धावांवर संपुष्टात आला. शेन वॉर्नने या सामन्यातील पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात देखील ४ गडी बाद केले. या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने १७९ धावांनी आपल्या नावावर केला होता.

ऑस्ट्रेलिया संघाने २८९ धावा केल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला धावसंख्या ७१ असताना पहिला धक्का बसला. त्यानंतर शेन वॉर्न गोलंदाजी करण्यासाठी आला. शेन वॉर्नने वाइड चेंडू टाकला होता मात्र तो चेंडू इतका फिरला की,थेट फलंदाजाचा ऑफ स्टंप उडवून गेला. माईक गॅटिंग काही सेकंदांसाठी स्तब्ध झाला होता. त्याला कळतच नव्हतं की, नक्की काय झालंय. या चेंडूनंतर संपूर्ण विश्वाला खात्री पटली की, हा गोलंदाज लेग स्पिन गोलंदाजीमध्ये क्रांती घडवून आणू शकतो.

१९९० मध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या शेन वॉर्नने कसोटीत ७०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर २००७ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ७०८ गडी बाद केले होते. तर वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २९३ गडी बाद केले होते.

मात्र ४ मार्च २०२२ हा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट दिवस ठरला. या दिवशी शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला. वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. तो जरी आपल्यात नसला तरीदेखील त्याने क्रिकेटला दिलेले योगदान नेहमीच युवा पिढीला प्रेरणा देत राहील.

सबस्क्राईब करा

* indicates required