४ जुलै अन् सचिनचं खास कनेक्शन! वाचा नेमकं काय घडलं होतं या दिवशी...

क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये रोज नवनवीन विक्रम होता आणि तसेच ते मोडतातही.. आपण क्रिकेटमध्ये केलेल्या विक्रमांबद्दल बोलत असतो तेव्हा एक नाव आवर्जून घेतलं जातं. ते म्हणजे दिग्गज फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( sachin tendulkar). सचिन तेंडुलकरच्या नावे अनेक मोठमोठ्या विक्रमांची नोंद आहे. त्याने क्रिकेटला रामराम करून काही वर्षं उलटून गेली आहेत. मात्र त्याने केलेले विक्रम हे अजूनही अबाधित आहेत. ४ जुलै हा दिवस सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? काय घडलं होतं या दिवशी? तर याच दिवशी (On This Day) मास्टर ब्लास्टरने ३ शतक झळकावले होते. चला तर पाहूया याबाबत अधिक माहिती.

१) ४ जुलै १९९६ (इंग्लंड विरुद्ध १७७ धावा) :

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) हा इंग्लंडमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करायचा. ४ जुलै १९९६ म्हणजे आजच्याच दिवशी त्याने नॉटिंगहॅमच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. त्याने या सामन्यात १७७ धावांची खेळी केली होती. हे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील १८ वे शतक होते. या सामन्यातील दोन्ही डावात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पहिल्या डावात त्याने १७७ तर दुसऱ्या डावात ७४ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर सामना तर ड्रॉ झाला होता. मात्र भारतीय संघाला ही मालिका १-० ने गमवावी लागली होती.

२) ४ जुलै २००१ (वेस्ट इंडिज विरुद्ध १२२ धावा) 

सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा शतक झळकावण्यासाठी ४ जुलै ही तारीख निवडली. दिवस तोच होता, मात्र ठिकाण, विरोधी संघ आणि वर्ष वेगळं होतं. ४ जुलै २००१ रोजी (on this day) त्याने वेस्ट इंडिज विरूद्ध खेळताना शतक झळकावले. त्यावेळी कोको कोला कप स्पर्धेतील सामना झिम्बाब्वेमध्ये सुरू होता. या स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद १२२ धावांची खेळी केली होती. हा सामना भारतीय संघाला जिंकून देत त्याने सामनावीर पुरस्कार देखील पटकावला होता.

३) ४ जुलै २००२ ( इंग्लंड विरुद्ध १०५ धावा )

सचिन तेंडुलकरने एक वर्षानंतर म्हणजे ४ जुलै २००२ रोजी इंग्लंड विरुध्द झालेल्या सामन्यात शतक झळकावले होते. इंग्लंड विरुद्ध झालेल्या नेटवेस्ट वनडे मालिकेत त्याने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. त्याने १०८ चेंडूंचा सामना करत १०५ धावांची खेळी केली होती. ज्यात ८ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. मात्र पावसाने अडथळा निर्माण केल्याने हा सामना अनिर्णीत राहिला होता.

यापैकी कुठला सामना तुम्ही लाईव्ह पाहिला होता? कमेंट करून नक्की कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required