computer

शेन वॉर्नने केलीय आपल्या सचिनवर चिखलफेक... नक्की प्रकरण काय आहे??

सचिनबद्दल  बोलताना आपण भारतरत्न सचिन तेंडुलकर असं कधीच म्हणत नाही. तो आपल्या काही जणांसाठी 'सच्या' तर काही जणांसाठी 'तेंडल्या' आहे...कारण सरळ आहे.. त्याला आपण अगदी आपलाच माणूस समजतो!!

सचिन जसा क्रिकेटच्या दुनियेत थोर माणूस आहे, तसाच तो त्याच्या सार्वजनीक जीवनात  साधेपणासाठी  प्रसिध्द आहे . हो, हा साधेपणा म्हणजे त्याचे दाखवायचे दात नाहीत तर खरोखरच एकदम 'जंटलमन'आहे. अशा या आपल्या झंटलमनने 'रगीला रतन' हे एकच नाव फिट्ट बसेल अशा शेन वॉर्नसोबत एकदा पार्टनरशिप केली आणि फसला. फसला असंच म्हणायला हवं कारण त्या ड्यांबीस शेन वॉर्नने त्याच्या 'नो स्पिन' या आत्मचरित्रात पार्टनरशिप तुटल्याचं खापर सचिनच्या डोक्यावर फोडलंय. तर, मंडळी शेन वॉर्नच्या क्रिकेट करीअरबद्दल  आणखी काही सांगायचं म्हणजे फुक्कटचा टाइम पास होईल, पण या तुटलेल्या पार्टनरशिपची गोष्ट मात्र तुम्हाला सांगायलाच हवी.

सचिन आणि शेन वॉर्न यांनी भागीदारी केली होती  क्रिकेट ऑल स्टार्स या मालिकेसाठी! आता या मालिकेचा फारसा गाजावाजा भारतात झाला नाही. कारण ही तीन सामन्यांची मालिका अमेरिकेत  आणि तीही अमेरिकन लोकांसाठी खेळली गेली होती. हे झालं होतं वॉर्न आणि सचिन या दोघांनीही इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर! या सिरीजमध्ये अमेरिकेत तीन २०-२० सामने खेळले गेले होते. आता या सामन्यांची मूळ संकल्पना माझीच होती असं शेन वॉर्नचं म्हणणं आहे. अमेरिकेत बरीच आशियातली जनता  आहे, त्यांना ही आयडिया   आवडेल आणि क्रिकेटचा प्रचार होईल.  झालंच तर पुढेमागे केवळ बेसबॉल खेळणारी अमेरिका क्रिकेट खेळायला लागेल या उद्दीष्टाने हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. 

कल्पना सुंदरच होती यात शंका नाही. पण हे सामने आयोजित करायचे कोणी आणि पैसे गुंतवायचे कोणी हा प्रश्न होताच. स्पॉन्सर करण्यासाठी शेन वॉर्ननं गाठला ऑस्ट्रेलीयातला मोठा बिल्डर लॉइड विल्यम्स. लॉइड विल्यम्सची गुंतवणूक फक्त रिअल इस्टेटमध्येच नाही तर रेसचे घोडे, घोड्याच्या शर्यती आणि कॅसिनोंमध्ये पण आहे. या सामन्यात पैसे गुंतवायलाही लॉइड विल्यम्स एका पायावर तयार झाले.  पण अट एकच होती " तेंडुलकर पाहिजे".

(लॉइड विल्यम्स)

यानंतर वॉर्नने सचिनला फोन केला. सचिनच्या मनातही अशीच काही कल्पना घोळत होती म्हणून सचिननेही  वॉर्नसोबत काम करण्याचे मान्य केलं. अशा रितीने दोघं एकत्र आले आणि क्रिकेट ऑल स्टार्सचा जन्म झाला.

वॉर्नच्या म्हणण्याप्रमाणे संकल्पना त्याची होती आणि तो अर्धी भागीदारी सचिनला देत होता. सचिनने ही मालिका त्याचा सल्लागार संजय आणि बेन  स्टर्नर हाताळतील असे सांगीतले. शेन वॉर्नच्या दृष्टीने ही दोघंही सज्जन होती पण असा मोठा कार्यक्रम करण्याच्या लायकीची नव्हती. वॉर्न पुढे म्हणतो की "सचिनच्या हट्टापुढे मी नमते घेतले."

(क्रिकेट ऑल स्टार्स)

"सचिनच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या सल्लागाराच्या हातात हे काम दिले ही माझी घोडचूक होती."असे म्हणताना वॉर्न पुढे म्हणतो की यामुळे हा "सगळा घाट्याचा सौदा झाला". आयसीसीने या सामन्यांना मान्यता दिली. पण बदल्यात लाखो डॉलर वसूल केले. अमेरिकन क्रिकेट असोसिएशनने ऐनवेळी खोडा घातला आणि आमच्या परवानगीशिवाय सामने होणार नाहीत अशी भूमिका घेतली. 

सचिनच्या मॅनेजमेंटवर टिका करताना वॉर्न पुढे म्हणतो की त्याच्या मदतनिसांनी कराराचे मुद्दे बारकाईने वाचले नाहीत आणि त्यामुळे 'ड्रॉप इन पिच ' म्हणजे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी हलवता येईल असे पिच भयंकर महाग पडले आणि त्यामुळे अडीच लाख डॉलर्सचा भुर्दंड भरावा लागला. मी वारंवार माझ्या बाजूने दोन आणि तुझ्या बाजूने दोन असे मॅनेजर घ्यावे असे सुचवत होतो पण सचिनने प्रत्येक वेळी नकार दिला. "

वॉर्न केवळ सचिनच्या मॅनेजरवरच टीका करून  थांबलेला नाही.  सोबत भारतीयांवरही त्याने शेरे मारले आहेत.  तो म्हणतो, "भारतीयांना उशीर करण्याची सवयच आहे , ते तिकडे भारतात चालते पण इकडे नाही." हॉटेल बुकींग- जाहिराती- किट्स सगळे काही शेवटच्या क्षणी व्हायचे. त्यानंतर राज नावाचा एक गृहस्थ मदतीला आला आणि सगळे काही  सुरळीत पार पडले.  शेवटी वॉर्न म्हणतो की "न्युयॉर्कच्या सामन्यासाठी लावलेलं १७५ डॉलरचे तिकीट फारच महाग होतं, त्यामुळे फक्त ३७००० प्रेक्षक आले. स्टेडीयम भरले नाही."

क्रिकेटऑल स्टार्सचे एकूण  तीन सामने अमेरिकेत झाले.  अमेरीकेच्या लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला.  पण " कमाई झाली नाही" असं वॉर्नचं म्हणणं आहे. या सगळ्या फियास्कोबद्दल तो दोष देतो सचिनच्या टीमला त्याच्या म्हणण्याप्रमाणे, 'सचिन चांगला आहे, पण त्याची माणसं चांगली नव्हती.'

तर मंडळी, नक्की काय घडले हे कळायला मार्ग नाही पण वॉर्नने या नंतर जे आरोप सचिनवर केले आहेत ते मात्र गंभीर आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे नंतर " सचिनने त्याचे फोन घेणे बंद केले. भारतात अनेक खेळाडूंशी परस्पर करार करायला सुरुवात केली. ऑल स्टार्सचे माझं स्वप्न भंगलं."

शेन वॉर्नच्या क्रिकेट बाहेरच्या 'रंगीत' आयुष्यावर नजर टाकली तर हे सहज कळेल की हा इसम खोटे बोलण्यात पटाईत आहे. सज्जन सचिनने वॉर्नच्या टिकेवर काहीही भाष्य केलं नाहीय. हे त्याच्या स्वभावाला धरूनच आहे  नाही का?  तुम्हाला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required