computer

क्रिकेट वर्ल्डकप २०१९ : इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका..पहिल्याच सामन्यात चक्क अंपायरलाच दुखापत ? सामन्यात आणखी काय काय घडलं ??

काही लोकांसाठी क्रिकेट म्हणजे जीव की प्राण असतो. आणि भारतासारख्या देशात तर क्रिकेट म्हणजे धर्म आणि क्रिकेटर्स म्हणजे देव असे समजले जाते. मंडळी, तुम्हाला माहीत असेलच भारतात नेते आणि सिनेस्टार्स एवढीच प्रतिष्ठा आणि प्रेम क्रिकेटर्सना मिळते. जगभरातल्या क्रिकेटर्सच्या मानाने आपले क्रिकेटर्स नशीबवान आहेत. कारण आपल्या बिचाऱ्या हॉकी किंवा फुटबॉल प्लेयर्सना भारतात कुणी विचारत नाही. पण भारतात क्रिकेटला मिळणाऱ्या या प्रेमामुळेच अगदी लहानपणापासून मुलांना क्रिकेटर बनवायचे म्हणून लोक त्यांना ग्राऊंडवर पाठवतात.

तर मंडळी, अशा या आपल्या लाडक्या क्रिकेटच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सुरुवात झालेली आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा संपलेली आहे आणि वर्ल्डकप सुरू झालेला आहे. काल वर्ल्डकपची पहिली मॅच पार पडली. सहसा ज्या देशात वर्ल्डकप आयोजित केलेला असतो ते पहिली मॅच खेळतात.

वर्ल्डकप यावेळी इंग्लंडमध्ये आयोजित केलला असल्याने पहिली मॅच इंग्लंडविरुद्ध साऊथ आफ्रिका अशी खेळली गेली. टॉस जिंकून साऊथ आफ्रिकेने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इंग्लंडची टीम तयारीनेच मैदानात उतरली होती. आफ्रिकन कॅप्टन फाफ डु प्लेसिसने पहिली ओव्हर इम्रान ताहिरला दिली. हा ताहिरबाबाने आपल्या अफलातून स्पिन बॉलिंगने चांगल्या चांगल्या बॅट्समनना अस्मान दाखवलं आहे. ताहिर बॉलिंगला आला आणि त्याचा जलवा दाखवायला सुरुवात केली. मंडळी, या भाऊचं वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्या पहिल्या ओव्हरपासूनच फॉर्मात येऊन बॉलिंग करतो. पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर ताहिरने ओपनर जॉनी बेयरस्टो याला पॅवेलीयनचा रस्ता दाखवला.

बेयरस्टो चांगली सुरुवात करण्याच्या नादात विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या हातात कॅच देऊन बसला. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये अंपायर धर्मसेना जखमी झाले. स्ट्राईकवर जेसन रॉय होता आणि बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मैदानात होता इम्रान ताहिर !!

ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर जेसनने समोर जोरदार शॉट मारला. बॉल सरळ अंपायरच्या दिशेने गेला. अंपायर धर्मसेना यांनी त्या बॉलपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न तर केला. पण त्यांचा प्रयत्न सफल झाला नाही आणि त्यांच्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली. जर धर्मसेनामध्ये आले नसते तर बॉल सरळ बाऊंड्रीकडे गेला असता आणि चौकार झाला ठोकला गेलाअसता. पण धर्मसेना यांना बॉल लागल्याने बॉलचा बॅलन्स बिघडला. मंडळी, क्रिकेटचा बॉल साधासुधा नसतो. बॉल किती आणि कसा लागतो हे ज्यांना बॉल लागला असेल त्यांना विचारा. धर्मसेना यांना झालेली दुखापत किती आहे हे अजून समजू शकले नसले तरी बॉल लागल्यानंतर त्यांनी बॉल लागला तिथे दुसरा हात ठेवला होता. याच्यावरून अंदाज लावला जात आहे कि त्यांचा हात दुखत असल्याने ते दुसऱ्या हाताने आपला हात चोळत होते. पुढच्या मॅचमध्ये ते अंपायरिंग करतील कि नाही हे त्यांच्या मेडिकल चेकअपनंतरच कळू शकेल.

मंडळी, अजून दिड महिना वर्ल्डकपच्या मॅचेस चालणार आहेत. धर्मसेना यांच्यासारख्या नावाजलेल्या अंपायरना दुखापत होऊन त्यांना जर वर्ल्डकपमधून अंग काढून घ्यावे लागले तर योग्य होणार नाही. म्हणून आयसीसीने त्यांना पुढच्या मॅचमध्ये आराम द्यावा जेणेकरून ते पुन्हा तंदुरुस्त होऊन पुन्हा अंपायरिंग करण्यासाठी तयार होतील. कुमार धर्मसेना हे श्रीलंकेचे माजी खेळाडू आहेत. त्यांनी आतापर्यंत ९६ वन डे मॅचेसमध्ये अंपायरिंग केली आहे. त्यांचे आजवरचे रेकॉर्ड पाहिला तर जगातील चांगल्या अंपायर्सपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. सोशल मीडियावर या बातमीने सुरुवातीला खळबळ माजवून दिली होती. पण नंतर धर्मसेना यांना झालेली दुखापत ही चिंताजनक नसल्याचे कळल्यावर सोशल मीडियामधून त्यांनी आता काही काळ आराम करायला हवा अशी मागणी होत आहे. काही लोकांनी तर धर्मसेना यांनी आता जीम जॉईन करून फिट होण्यासाठी प्रयत्न करावा असा पण सल्ला दिला आहे. धर्मसेना यांना बॉल लागल्याने मात्र इंग्लंडचा एक चौकार कमी झाला.

मंडळी, कालच्या मॅचमध्ये तुम्हांला आवडलेला किंवा लक्षात राहिलेला प्रसंग कोणता? आम्हांला कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा!!

सबस्क्राईब करा

* indicates required