computer

चित्तथरारक नेहरू बोट रेस ट्रॉफीबद्दल फारशी चर्चा होत नाही पण या वर्षी हा मोका चुकवू नका !

भारतात अनेक पारंपरिक खेळ खेळवले जातात. भौगोलिक रचनेनुसार अनेक स्पर्धा राज्यांत घेल्या जातात. केरळमध्ये अशीच एक भव्य बोटींची स्पर्धा दरवर्षी भरवली असते. दरवर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या शनिवारी नेहरू ट्रॉफी बोट रेस आयोजित केली जाते. केरळच्या अलाप्पुझाजवळ पुन्नमदा तलावावर या शर्यतीचे आयोजन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ करण्यात येते. आजूबाजूच्या सर्व गावातील लोक येतात आणि त्यात सहभागी होण्यासाठी कुट्टनाडमध्ये जमतात. एरवी शांत दिसणारे हे सरोवर शर्यतीच्या दिवशी जणू युद्धभूमी बनते. प्रत्येक स्पर्धक जिंकण्यासाठी या स्पर्धेत जीव ओततो.

ही स्पर्धा जरी या दिवशी खेळवली गेली तरी याची तयारी खूप आधीपासून केली जाते. या प्रतिष्ठेच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी तयारीही एक महिन्याआधीपासून करावी लागते. या शर्यतीसाठी दोन लाखांहून अधिक लोक पुन्नमदा तलावाभोवती जमतात. भारताशिवाय जगभरातून पर्यटकही येतात. हा रेस कोर्स १३७० मीटरचा असतो. वेगवेगळ्या बोटींसाठी अनेक ट्रॅक बनवले जातात.

नेहरू बोट रेस ट्रॉफी स्पर्धेचा इतिहास

या स्पर्धेचा इतिहास खूप रंजक आहे. १९५२ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू केरळच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कोट्टायम ते अलाप्पुझापर्यंत बोटीने प्रवास केला. त्यावेळी अलाप्पुझा हा त्रावणकोर राज्याचा भाग होता. अलाप्पुझाला हे नाव त्याच्या भौगोलिक स्थानाच्या आधारावर मिळाले. अलाप्पुझाला म्हणजे जिथे अनेक नद्या वाहतात अशी समुद्राजवळची जमीन. त्यावेळी तिथे पंडितजींच्या बोटीसह अनेक बोटी धावत होत्या.
तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू येणार होते म्हणून तात्पुरती बोट रेस आयोजित करण्यात आली होती. ८ बोटींनी या शर्यतीत भाग घेतला होता. पंडित जवाहरलाल नेहरू ती बोटींची कामगिरी आणि समुद्री प्रवासाचे कौशल्य पाहून खूप प्रभावित झाले. ती स्पर्धा नादुभागोम चंदन नावाची सर्पबोट जिंकली. नेहरूंनी उत्साहाने त्या विजेत्या बोटीत बाकीचा प्रवास पूर्ण केला, तेही कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय.

जवाहरलाल नेहरू नंतर दिल्लीला गेले आणि तेथून बोट रेसच्या विजेत्याला चांदीची ट्रॉफी पाठवली. ट्रॉफी सापाच्या आकारात होती. त्यावर लिहिले होते - “बोट रेसच्या विजेत्यासाठी. हे त्रावणकोर समुदाय जीवनाचे वैशिष्ट्य आहे". तेव्हापासून दरवर्षी अलाप्पुझा येथे नेहरू करंडक बोट रेस सुरू झाली.

या स्पर्धेसाठी स्पर्धक अशी तयारी करतात:

१. संपूर्ण बोटीला सार्डिन फिश ऑइल लावले जाते, जेणेकरून ती पाण्यात सहजपणे आणि वेगाने पुढे जाऊ शकेल.
२. वेगवेगळ्या गावांचे १५० स्पर्धक या स्पर्धेसाठी निवडले जातात.
३. ही शर्यत संपेपर्यंत ब्रह्मचर्य पाळणे आणि मांसाहार वर्ज्य करणे बंधनकारक असते.
४. नव्या नाविकांना जुन्या आणि अनुभवी नाविकांकडून प्रशिक्षण दिले जाते

प्रशिक्षण चालू असताना या नाविकांना दररोज नदीच्या काठावर रात्रीचे जेवण दिले जाते. यासाठी गावातील श्रीमंत कुटुंबे पुढे येतात आणि याची व्यवस्था करतात.

नेहरू करंडक बोट रेसचे प्रमुख आकर्षण म्हणजे सर्प बोट. या बोटीचे वैशिष्ट्य म्हणजे ही बोट तब्बल १०० फूट लांब असते. हिला चंदन वल्लम किंवा सापाची बोट असे म्हणतात. स्नेक बोट हे नाव ब्रिटिश काळात देण्यात आले आहे. खरंतर नॉर्वेमध्ये अशा बोटींना स्नेक बोट म्हटले जाते, तर केरळमध्ये त्यांना चंदन वल्लम म्हटले जाते. या बोटीत १०० पेक्षा जास्त खलाशी, आचारी आणि २५ चीअर लीडर बसू शकतात. या बोटीशिवाय शर्यतीत भाग घेणाऱ्या केरळच्या इतर बोटींमध्ये चुरुलन, वेप्पू आणि ओडी यांचा समावेश आहे

या शर्यतीच्या वेळेस सरोवराचा संपूर्ण किनारा सजवला जातो. तसेच बोटीही आकर्षक रूपात सजतात. या बोटींवर बहुरंगी आणि सुंदर छत्र्या लावलेल्या असतात. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कलाकार यात सहभागी होतात. ही केवळ बोटींची शर्यत न राहता केरळचा सांस्कृतिक सोहळाच इथे अनुभवता येतो. केरळच्या सांस्कृतिक वारशावर कथकली, थेयम, पंचवध्याम, आणि पाडयानी कलाकार आपली कला येथे सादर करतात. ढोल वाजवल्यावर ही स्पर्धा सुरू होते. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक जोरजोरात आवाज करून बोट वेगाने पुढे नेतात तेव्हा वातावरणात एकच जल्लोष होतो. पाहणारे जोरजोरात आवाज देत, टाळ्या देत सर्वाना प्रोत्साहन देतात. सापासारखे सळसळत पुढे जाणारे नाविक पाहणे खूप आनंददायी असते.

या शर्यतीने नेहमीच समाजात एकता आणि बंधुत्वाला प्रोत्साहन दिले आहे. नेहरू करंडक बोट शर्यती दरम्यान, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, जात, धर्म आणि पंथाच्या आधारावर निर्माण झालेले अंतर नाहीसे होते. येथे प्रशिक्षणादरम्यान जेव्हा सर्व स्पर्धक एकत्र बसतात तेव्हा कोणताही भेदभाव केला जात नाही. हिंदू, अनुसूचित जाती, ख्रिश्चन आणि मुस्लिम एकत्र बसून एकत्र जेवतात. ही स्पर्धा म्हणजे सर्वधर्मसमभाव याची प्रचिती देते.

यावर्षी ६९वी बोट रेस खेळवली जाणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी याचे आयोजन केले आहे. मनोरमा, अशियानेट या टीव्ही चॅनेल वर याचे थेट प्रक्षेपण केले जाते. तसेच Home - Official Website of Nehru Trophy Boat Race वेबसाईटवर ही थेट प्रक्षेपण दाखवले जाते. प्रत्यक्ष पाहण्यासाठी याची तिकीटविक्री bookmyshow द्वारे केली जात आहे. तुम्हीही हा थरार अनुभवू शकता.
 

सबस्क्राईब करा

* indicates required