भारतीय संघाचे भविष्यातील स्टार खेळाडू! वनडे WC २०२३ स्पर्धेसाठी आहेत परफेक्ट चॉईस...
नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघातील युवा खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिका संघावर २-१ ने विजय मिळवला. मुख्य बाब म्हणजे भारतीय संघातील मुख्य खेळाडू टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. त्यामुळे बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करणं ही भारतीय संघासाठी सकारात्मक बाब आहे. कारण येत्या २०२३ मध्ये भारतीय संघाला वनडे विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला असे ५ स्टार खेळाडू मिळाले आहेत, जे भारताला तिसऱ्यांदा जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावू शकतात.
१) श्रेयस अय्यर (Shreyas iyar) :
भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज सध्या जोरदार कामगिरी करत आहेत. सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर जोरदार कामगिरी करताना दिसून आला आहे. सध्या तो जोरदार फॉर्ममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने या मालिकेतील ३ सामन्यांमध्ये १९१ धावा केल्या. या मालिकेत त्याने जोरदार शतक देखील झळकावले.
२) ईशान किशन (Ishan kishan)
भारतीय संघातील अनुभवी खेळाडू शिखर धवन केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येतोय. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. हेच कारण आहे की, शुबमन गिलला डावाची सुरुवात करण्याची वारंवार संधी दिली जात आहे. तसेच ईशान किशन देखील सलामीसाठी उत्तम पर्याय असू शकतो. आक्रमक फलंदाजी करणारा ईशान किशन संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकतो. मालिकेतील पहिल्या सामन्यात तो २० धावा करून माघारी परतला होता. तर दुसऱ्या सामन्यात त्याने ९३ धावांची तुफानी खेळी केली होती.
३) संजू सॅमसन (Sanju Samson)
संजू सॅमसनला टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्याची जोरदार मागणी केली जात होती. मात्र त्याला पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं गेलं आहे. असे असताना देखील त्याने आपली जोरदार कामगिरी सुरू ठेवली आहे. न्यूझीलंड ए संघाविरुद्ध दमदार कामगिरी केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने मालिकेतील पहिल्या सामन्यात ८६ तर दुसऱ्या सामन्यात ३० धावांची खेळी केली होती.
४) मोहम्मद सिराज (Mohammad Siraj)
दुखापतग्रस्त होऊन संघाबाहेर झालेल्या जसप्रीत बुमराहच्या जागी स्थान मिळवण्यासाठी मोहम्मद सिराज जोरदार मेहनत घेताना दिसतोय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला गडी बाद करण्यात अपयश आले होते. मात्र त्याने दुसऱ्या सामन्यात ३ आणि तिसऱ्या सामन्यात २ गडी बाद करत जोरदार पुनरागमन केल्याचे पाहायला मिळाले होते.
५) कुलदीप यादव (kuldeep yadav)
टी -२० संघातून बाहेर झाल्यानंतर आता कुलदीप यादव साठी पुन्हा एकदा टी -२० संघात पुनरागमन करणं जरा कठीण दिसून येत आहे. मात्र वनडे क्रिकेटमध्ये तो फलंदाजांचा चांगलाच समाचार घेत आहे. डाव्या हाताचा चाईनामॅन गोलंदाज कुलदीप यादव या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. त्याने ३ सामन्यांमध्ये ६ गडी बाद केले.
काय वाटतं? या ५ खेळाडूंपैकी कुठला खेळाडू आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.




