वर्ल्डक्लास गोलंदाज अन् टॉप फलंदाज असूनही भारतासाठी खेळण्याची संधी न मिळालेले ५ अनलकी खेळाडू...

भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. लाखो खेळाडू भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्नं पाहत असतात. या स्तरावर पोहचण्यासाठी त्यांना वयोगटातील स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. काही वर्षांपूर्वी भारतीय संघात स्थान मिळवणं जरा कठीणच होतं. कारण खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करून स्वतःला करावं लागायचं.
मात्र आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून हा मार्ग जरा सोपा झाला आहे. आयपीएलच्या एका हंगामात चांगली कामगिरी केली, की भारतीय संघात नाहीतर भारतीय अ संघात स्थान मिळून जातं. पुढे खेळाडूची क्षमता पाहून तो संघात टिकून राहतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही खेळाडूंची माहिती देणार आहोत, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली मात्र तरीदेखील भारतीय संघात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
५)धीरज जाधव( Dheeraj Jadhav):
महाराष्ट्र क्रिकेट संघाचा जेव्हा उल्लेख केला जातो, त्यामध्ये धीरज जाधव या खेळाडूचा प्रामुख्याने केला जातो. मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या धीरज जाधवने १९९९ साली महाराष्ट्र संघासाठी पदार्पण केले होते. सुरुवातीला तो सलामीवीर फलंदाज म्हणून खेळायचा. मात्र नंतर त्याला मधल्या फळीत फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यावेळी वीरेंद्र सेहवाग भारतीय संघासाठी ओपनिंग करायचा. भारतीय संघ वीरेंद्र सेहवाग सोबत फलंदाजीला पाठवण्यासाठी सलामीवीर फलंदाजाच्या शोधात होता. ही जागा आकाश चोपडाला मिळाली . मात्र तो हवी तशी कामगिरी करू शकला नाही. २००३-०४ च्या रणजी हंगामात चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली होती. मात्र गौतम गंभीर डावाची सुरुवात करणार असल्यामुळे त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
४) श्रीधरन शरथ (Shreedharan sharath)
श्रीधरन शरथच्या नावे तामिळनाडू संघासाठी १०० पेक्षा अधिक रणजी ट्रॉफी सामने खेळण्याचा विक्रम आहे. १९९२ मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या शरथने १३९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८७०० धावा कुटल्या. मात्र भारतीय संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि वीवीएस लक्ष्मण सारखे फलंदाज संघात असल्याने त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही.
३) मिथुन मन्हास (Mithun manhas) :
दिल्लीने आतापर्यंत भारतीय संघाला विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग आणि रिषभ पंत सारखे खेळाडू दिले आहेत. यामध्ये मिथुन मन्हास सारख्या क्लास खेळाडूचा देखील समावेश आहे. १९९८ मध्ये तो दिल्ली संघासाठी मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज होता. २००७-०८ हंगामात झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत दिल्ली संघाला विजय मिळवून देण्यात मिथुनने मोलाची भूमिका बजावली होती. मात्र सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड सारखे खेळाडू चांगली कामगिरी करत असल्यामुळे त्याला भारतीय संघासाठी खेळायची संधी मिळाली नाही.
२) राजिंदर गोयल (Rajindar Goel) :
राजिंदर गोयल हे देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज होते ज्यांना भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. सुनील गावस्कर सारख्या दिग्गजांनी देखील राजिंदर गोयल यांच्या कौतुकाचे पुल बांधले होते. १५७ सामन्यांमध्ये त्यांनी ७५० गडी बाद केले होते. यामध्ये त्यांनी ५९ वेळेस ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी बिशन सिंग बेदी देखील जोरदार कामगिरी करत होते. त्यामुळे राजिंदर गोयल यांना भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. जर राजिंदर गोयल यांना भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नसती तर नक्कीच ते भारताचे यशस्वी फिरकीपटू होऊ शकले असते.
१) अमोल मुजुमदार ( Amol Muzumdar) :
भारतीय संघात खेळण्यासाठी पात्र असलेला मात्र संधी मिळाली नसलेला सर्वात अनलकी खेळाडू म्हणजे अमोल मुजुमदार. सध्या मुंबई संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत असलेल्या अमोल मुजुमदारने आपल्या कारकीर्दीत जोरदार फलंदाजी केली होती. त्याने १७१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ११,१६७ धावा केल्या होत्या. मात्र सचिन, राहुल आणि लक्ष्मण सारखे खेळाडू जोरदार कामगिरी करत असताना, अमोल मुजुमदार सारख्या खेळाडूला दुर्लक्ष केलं गेलं. अमोल मुजुमदार देखील भारतीय संघात खेळण्यासाठी प्रमुख दावेदार होता.