Eoin Morgan Retirement: दोन देशाचे प्रतिनिधित्व अन् वनडेत सर्वाधिक षटकार; हे आहेत मॉर्गनने केलेले टॉप -५ विक्रम...

अखेर इंग्लंड संघाला वनडे विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार ओएन मॉर्गन (Eoin Morgan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Eoin Morgan Retirement) जाहीर केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या फॉर्म बाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. गेल्या २८ सामन्यांमध्ये त्याला केवळ २ अर्धशतक झळकावता आले आहेत. ही निराशाजनक कामगिरी पाहता त्याने टोकाचं पाऊल उचललंं आणि मंगळवारी (२८ जून) आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. २००६ ते २००९ पर्यंत त्याने आयर्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर तो इंग्लंड संघासाठी क्रिकेट खेळू लागला. त्याने इंग्लंड संघाचे नेतृत्व करत इंग्लंडला विश्वचषक देखील जिंकून दिला. मॉर्गनने आपल्या क्रिकेट अनेक विक्रम बनवले. त्यापैकीच ५ विक्रमांचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत. (Top 5 records of Eoin Morgan)

) अंडर -१९ वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा :

ओएन मॉर्गन कोण आहे ? हे इंग्लंड संघाकडून खेळण्यापूर्वी खूप कमी लोकांना माहीत होतं. इंग्लंडकडून खेळण्यापूर्वी त्याने आयर्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच २००४ आणि २००६ मध्ये त्याने अंडर -१९ वर्ल्ड कप स्पर्धेत आयर्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेतील १३ सामन्यांमध्ये त्याने ६०६ धावा केल्या होत्या. यासह तो अंडर १९ - वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.

) वनडेमध्ये दोन देशांसाठी शतक झळकावणारा फलंदाज :

ओएन मॉर्गनने वनडेतील पहिले शतक आयर्लंड संघाकडून खेळताना कॅनडा संघाविरुद्ध झळकावले होते. त्यानंतर जेव्हा त्याने इंग्लंडकडून खेळायला सुरुवात केली त्यावेळी त्याने बांगलादेश संघाविरुद्ध तुफानी शतक झळकावले होते. यासह तो वनडेमध्ये दोन देशांसाठी शतक झळकावणारा एकमेव फलंदाज ठरला होता.

) वनडेतील एकाच डावात सर्वाधिक षटकार:

२०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ओएन मॉर्गन जोरदार फॉर्ममध्ये होता. त्याने अफगाणिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या ७१ चेंडूंमध्ये १४८ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने गोलंदाजांची धुलाई करत १७ षटकार मारले होते. हा विक्रम आतापर्यंत कोणालाही मोडता आला नाहीये.

) टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने :

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होताच मॉर्गनच्या नावे टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याच्या बाबतीत एमएस धोनीची बरोबरी केली आहे. मात्र मॉर्गनच्या विजयाची सरासरी ही एमएस धोनी पेक्षा चांगली आहे. मॉर्गनने कर्णधार म्हणून ७२ सामने खेळले आहेत, ज्यात त्याला ४२ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर २७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एमएस धोनीला ७२ सामन्यांपैकी ४१ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर २८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

५) वनडेमध्ये सर्वाधिक धावसंख्या असताना नेतृत्व करणारा कर्णधार :

मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळताना इंग्लंड संघाने नेहमी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचा अंदाज तुम्ही यावरून घेऊ शकता की, वनडे क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडने टॉप -३ सर्वाधिक धावसंख्या या ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली केल्या आहेत. इंग्लंडने नेदरलँड विरुद्ध झालेल्या सामन्यात ४ गडी बाद ४९८ धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेल्या सामन्यात ६ गडी बाद ४८१ धावा केल्या होत्या. तसेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३ गडी बाद ४४४ धावा केल्या होत्या.

ओएन मॉर्गन हा इंग्लंडला वनडे विश्वचषक जिंकून देणारा एकमेव कर्णधार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required